बनावट कॉल सेंटर्सचे आव्हान | पुढारी

बनावट कॉल सेंटर्सचे आव्हान

महेश कोळी, संगणकतज्ज्ञ

इंटरनेटच्या वाढत्या व्याप्तीबरोबर, ज्यांनी त्याला फसवणुकीचे साधन बनवले आहे, त्यांनी लोकांना आपल्या कृत्यांचे बळी बनविण्यास सुरुवात केल्याने एक नवीन प्रकारची गुंतागुंत निर्माण होत आहे. अलीकडेच समोर आलेल्या एका बातमीनुसार, नोएडामधील पोलिसांनी एका कॉल सेंटरचा भांडाफोड केला आणि परदेशी नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या त्याच्या चौदा कर्मचार्‍यांना अटक केली.

उत्तम साधनसंपत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॉल सेंटरच्या रूपात सेंद्रिय पद्धतीने हा व्यवसाय चालवणारे हे लोक प्रत्यक्षात अमेरिका आणि इतर देशांत राहणार्‍या लोकांना फसवून त्यांच्या संगणकांमध्ये मालवेअर, व्हायरस टाकायचे आणि नंतर ते ठीक करण्याचा प्रयत्न करायचे. इंटरनेटवर होणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटी सामान्यत: पारदर्शक असल्याचे मानले जाते; परंतु या प्रकारची फसवणूक करणारे गुन्हेगार प्रथम चुकीच्या पद्धतीने अमेरिका किंवा इतर देशांमध्ये राहणार्‍या लोकांशी संबंधित तपशील किंवा डेटा मिळवतात. मग ते त्यांना आर्थिक गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकण्याची भीती दाखवून, कधी संगणकात व्हायरस टाकून किंवा आर्थिक ऑफरचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. यानंतर या जाळ्यातून सुटण्याच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करतात. अशी अनेक प्रकरणे एकट्या नोएडामध्ये आढळून आली आहेत.

मध्यंतरी मुंबई गुन्हे शाखेने गोरेगाव येथील रॉयल पाम्स येथून कथितरीत्या कार्यरत असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आणि कॅनडाच्या नागरिकांची फसवणूक करणार्‍या सात जणांना अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अ‍ॅमेझॉन आणि कॅनडाच्या अ‍ॅटर्नी जनरल ऑफिसचे प्रतिनिधी असल्याच्या नावाखाली कॉल करण्याचे भासवून लोकांची फसवणूक केली. ऑनलाईन माध्यमातून होत असलेल्या कामात पारदर्शकता येईल आणि याच्या मदतीने आर्थिक गुन्ह्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा होती; परंतु वेगवेगळ्या मार्गांनी उभारलेल्या ऑनलाईन व्यवसायात ज्या प्रकारे फसवणुकीच्या घटना दररोज उघडकीस येत आहेत, त्यावरून या माध्यमातूनही फसवणूक करणारे नवनवीन मार्गांनी फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. अशा लुटारूंनी जनतेला घातलेला आर्थिक गंडा प्रचंड मोठा आहे. पोलिस विभागाच्या सायबर गुन्हे शाखा अशा घटकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी बनावट कॉल सेंटरद्वारे पसरणार्‍या फसवणुकीच्या जाळ्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे.

सायबर गुन्हे आणि स्पॅम कॉल रोखण्यासाठी केंद्र सरकारने चक्षू अ‍ॅप लाँच केले आहे. चक्षू अ‍ॅपच्या माध्यमातून लोक सहजपणे सायबर गुन्हे किंवा स्पॅम कॉलची तक्रार करू शकतात. दूरसंचार विभागाने गेल्या वर्षी मे महिन्यात उद्घाटन करण्यात आलेल्या संचार साथी पोर्टलचा एक भाग म्हणून डिजिटल गुप्तचर मंच सुरू केला आहे. वापरकर्त्यांचे क्रमांक, मेसेज इत्यादींसह फसवणूक किंवा स्पॅम कॉलची तक्रार करण्यासाठी नागरिक चक्षू अ‍ॅपचा वापर करू शकतात. वापरकर्ते संचार साथी पोर्टलवरील इनबिल्ट आय विंडोमध्ये लॉगइन करू शकतात आणि एसएमएस, कॉल किंवा व्हॉटस् अ‍ॅपसारख्या फसव्या माध्यमांद्वारे संबंधित तपशीलांसह फॉर्म भरू शकतात.

तथापि, वापरकर्त्यांना ते मेसेज सेक्सटॉर्शन, बनावट ग्राहक हेल्पलाईन, बनावट केवायसी यांसारख्या संवाद कोणत्या श्रेेणीत ते मेसेज बसतात, हे स्पष्ट करावे लागेल. वापरकर्ता ही तक्रार करताना स्क्रीनशॉट किंवा त्याच्या तक्रारीशी संबंधित इतर कोणतीही माहितीदेखील समाविष्ट करू शकतो. या व्यासपीठाच्या माध्यमातून 1008 कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक रोखली गेल्याचे सांगितले जाते. सरकारचा हा प्रयत्न स्वागतार्ह आणि आवश्यक असला तरी अशा गुन्ह्यांची व्याप्ती आणि गुन्हेगारांच्या नवनवीन क्लृप्त्या रोखण्यासाठी जनप्रबोधनासह सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. या गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या न आवळ्यास भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, हे नक्की!

Back to top button