तडका : धूमशान..! | पुढारी

तडका : धूमशान..!

नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचे टीटीपीपी न्यूज चॅनेलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. टीटीपीपी म्हणजे त त प प हे तुम्हाला माहीत आहेच. जे तुमच्या मनात तेच तुमच्या कानात हा आमच्या चॅनेलचा मूलमंत्र आहे. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत, कोकण विभागातील आमचे वक्ते. चला, त्यांच्याकडून आपण कोकणामधील राजकारणाचा आढावा घेऊया. नमस्कार संदेश, लोकसभा निवडणुकीसाठी कोकणात वातावरणनिर्मिती कशी झाली आहे, याविषयी दर्शकांना माहिती दे.

होय दीपाली, लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे कोकणामध्ये धूमशान सुरू आहे. कोकणातील कार्यकर्त्यांना मुंबईतील नेते मार्गदर्शन करत असतात. मुंबईवरून जसे आदेश येतील, त्याप्रमाणे कोकणातील कार्यकर्ते काम करत असतात. सर्व कार्यकर्त्यांची सध्या लगबग सुरू आहे. कोकणामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर असे लोकसभा मतदारसंघ येतात. अजून आचारसंहिता लागलेली नसल्यामुळे अडकलेली, नडलेली आणि करायची राहिलेली कामे मंजूर करून घेण्यासाठी कोकणातील कार्यकर्ते सातत्याने मुंबई मंत्रालय वार्‍या करत आहेत. त्याच वेळेला सर्व पक्षांचे मोठमोठे नेते कोकणामध्ये सभा घेऊन गेले आहेत. सभा कुणाचीही असली तरी जनता तीच असल्यामुळे प्रत्येक सभेला गर्दी होत आहे. सभा झाल्यानंतर संध्याकाळी नागरिकांना एकच काम उरलेले आहे आणि ते म्हणजे गजाली करत गप्पा रंगवणे. कोण निवडून येईल आणि कोण पडेल, याविषयी छातीठोकपणे जनता आपले मत मांडत असते. या गजाली ऐकल्या तरी कोकणच्या मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे, हे समजू शकते.

संदेश, कोकणातील राजकारणाचे वेगळेपण नेमके कसे सांगता येईल? तू आता जनतेमध्ये मिळून मिसळून पत्रकारिता करत आहेस, त्यामुळे नेमके वैशिष्ट्य काय आहे ते तुला सांगता येईल का?

हो, निश्चितच. निवडणूकपूर्व वातावरणामध्ये कोकणामध्ये भरपूर राडे होत आहेत. नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडत आहेत. राडे झाल्याबरोबर पोलिस स्टेशनला तक्रारी आणि पोलिसांसमोरच मारामार्‍या पाहायला मिळत आहेत. मुळातच कोकणी माणूस हा त्वेषाने झुंजणारा आणि लढणारा माणूस असल्यामुळे तो प्रत्यक्ष मैदानात उतरतो आणि थेट राडा करून ठेवतो. सामान्य कोकणी माणूस ही चाललेली गंमत दुरून बघत आहे. उन्हाळा असल्यामुळे शेतीत फारसे काम नाही, त्यामुळे दिवस अन् दिवस राजकारणावर गप्पा अहोरात्र सुरू आहेत.

दीपाली, कोकणात हातांना फारसे काम नसल्यामुळे बोलण्यात कोकणी लोक स्वतःला बिझी ठेवत असतात. बोलण्यासाठी चित्रपटातील ग्लॅमर, तारे-तारका हे विषय कोकणातील लोकांना फारसे आवडत नाहीत. फार तर अलीबागमध्ये कोणाचे बंगले आहेत, याविषयी थोडी बहुत चर्चा होते; परंतु मुख्य विषय राजकारण हाच असतो. स्थानिक राजकारणामध्ये काय बदल होतील, यावर निवडणुकांचे निकाल ठरत असतात. खासदार कोणीही होवो, पण आपल्याला सहज उपलब्ध झाला पाहिजे, यावर कोकणी लोकांचा भर असतो. या चारपैकी कोणत्या जागा कोणता पक्ष जिंकेल, हे सांगता येत नाही.

Back to top button