दळभद्री ‘राजा’! | पुढारी

दळभद्री ‘राजा’!

ब्रिटिश  साम्राज्याखालील  अनेक देश स्वतंत्र झाले, तसतसे ते सार्वभौम व स्वावलंबी देश म्हणून ओळखले जाऊ लागले; मात्र ऑटोमन साम—ाज्याचा अस्त झाला, तेव्हा त्या साम—ाज्यातील वेगवेगळे भूभाग हे एकच देश म्हणून उभे राहू शकले नाहीत. भारत प्राचीन काळापासून एकच होता, फक्त त्या-त्या काळाप्रमाणे वेगवेगळे राजे आणि सम—ाट यांच्या सत्तेखाली तो होता. तरीसुद्धा आपण सर्वजण एकच आहोत, ही भावना सुप्तपणे शेकडो वर्षांपासून भारतात अस्तित्वात होती. स्वातंत्र्यानंतर तयार झालेल्या राज्यघटनेच्या पहिल्या मसुद्यात ‘भारत’ हा शब्द नव्हता. त्यात ‘इंडिया शॅल बी अ युनियन ऑफ स्टेटस्’ असे म्हटले होते. त्यानंतर जवळपास वर्षभराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या. त्यात एक दुरुस्ती म्हणून, ‘इंडिया, दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेटस्’ असे प्रस्तावित करण्यात आले. म्हणजे भारत हा राज्यांचा संघ आहे, असे मान्यच करण्यात आले आहे. हा देश हे जरी संघराज्य असले, तरी वेद आणि पुराणातही ‘भारत’ हे नाव आहे. ऋग्वेद व ब—ह्मपुराणातही त्याचा उल्लेख असून, भारताच्या सीमा परिभाषित करण्यात आलेल्या आहेत. चिनी अभ्यासक युआन च्वांग यांच्याही पुस्तकात ‘भारत’ असा उल्लेख आहे.

हे सर्व कथन करण्याचे कारण म्हणजे, द्रमुक नेते आणि माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी काढलेले संतापजनक उद्गार. “भारत हा कधीच ‘देश’ नव्हता. देश म्हणजे एक भाषा, एक संस्कृती आणि एक परंपरा. मग त्याला देश म्हणतात,” असा जावईशोध राजा यांनी लावला आहे. हे राजा म्हणजे टूजी घोटाळाफेम. याच राजा यांच्यामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्राची प्रगती थांबली. दूरसंचार क्षेत्राचा बाजा वाजवणार्‍या या राजांची आता भारताचे विघटन व्हावे अशी इच्छा आहे का? राजा हे पूर्वीचे बि—टिश पंतप्रधान चर्चिल यांच्या भाषेतच बोलत आहेत. बि—टिशांनी हिंदुस्तान सोडला, तर इथली संपूर्ण राज्यव्यवस्था कोसळून पडेल आणि देश पुन्हा मध्ययुगीन रानटी अवस्थेत जाईल, असे ते म्हणाले होते. भारतात बि—टिश अंमल जारी करण्यासाठी मदतनीस ठरलेले सर जॉन स्ट्रॅची यांनी केंबि—जमध्ये ‘भारत’ या विषयावर अनेक व्याख्याने दिली आणि ती पुस्तक रूपाने ‘इंडिया’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली आहेत. इतिहासकाळात भारत नावाचे राष्ट्र कधीही नव्हते आणि भविष्यातही ते कधीच असणार नाही, असे ते म्हणाले होते. युरोपीय देशांतील विविधतेच्या तुलनेत हिंदुस्तानातील प्रादेशिक विवधता कितीतरी पटीने अधिक आहे. स्कॉटलंड आणि स्पेनमध्ये जितके साम्य आहे, तितके साम्य काही पंजाब आणि बंगालमध्ये नाही. हिंदुस्तानातील जाती-जमाती, वंश, भाषा, धर्म यांची संख्या खूप मोठी आहे. युरोपात जशी राष्ट्ररचना आहे, तशी ती या प्रदेशांमध्ये नाही. त्याचप्रमाणे या प्रदेशांची स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण अशी राजकीय व सामाजिक ओळख नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. जगद्विख्यात लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी हिंदुस्तान हा एक देश कधीही नव्हता आणि होणार नाही, असे वाक्ताडन केले होते. प्रत्यक्षात 1947 पासूनचा भारताचा इतिहास हा एक अभूतपूर्व असा राजकीय प्रयोगाचा इतिहास आहे.

अठराव्या शतकाच्या अखेरीस उदयास आलेल्या अमेरिकन आणि फ्रेंच लोकशाहीच्या प्रयोगानंतर त्या रांगेतील भारत हा तिसरा यशस्वी प्रयोग ठरला आहे. प्रचंड लोकसंख्या आणि विविधता असूनही, हा देश एका धाग्यात गुंफण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अनेक राज्यांचा समूह असला, तरी देशातील प्रत्येक राज्य म्हणजे स्वतंत्र राष्ट्र नसून, ते जणू एकाच वस्त्राचे धागे आहेत. संविधान विधिमंडळाची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी झाली. तेव्हा त्यात बि—टिश भारतातील प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधी होते. जसजशी संस्थाने भारताला जोडली जात होती, तसतसा त्यांच्या प्रतिनिधींचाही त्यात समावेश करण्यात येत होता. म्हणजे संविधाननिर्मितीची ही प्रक्रियाही अत्यंत व्यापक आणि देशातील बहुविधतेचा आदर करणारी होती, याची माहिती या बोलघेवड्या राजा यांना आहे काय? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच भाषेच्या पायावर देशाची पुनर्रचना केल्यास भारतीय संघराज्यच फुटण्याला प्रोत्साहन मिळेल की काय, अशी भीती नेहरू यांना वाटत होती; कारण देशाची नुकतीच धर्माच्या पायावर फाळणी झाली होती. त्यामुळे तातडीने भाषावार प्रांतरचना केल्यास देश विस्कटेल असे नेहरूंना वाटत होते. म्हणूनच भाषावार प्रांतरचना त्यांना मान्य असली, तरी तिची अंमलबजावणी त्यांनी पुढे का ढकलली होती, हे नीट समजून घेतले पाहिजे.

संबंधित बातम्या

‘भारत हा एक उपखंड असून, तामिळनाडू हा देश आहे त्याचप्रमाणे केरळ, ओडिशा हेदेखील जणू काही वेगवेगळे देश आहेत,’ अशा आशयाचे उद्गार या अतिशहाण्या राजा यांनी काढले. या देशातील विविध भाषा व संस्कृतींचा आदर केला पाहिजे आणि एकसाचीपणा नाकारला पाहिजे, यात चुकीचे असे काहीच नाही; परंतु प्रत्येक राज्य म्हणजे स्वतंत्र देश आहे, असे म्हटले तर या देशाची अवस्था सोव्हिएत रशियाप्रमाणे होईल. सोव्हिएत संघराज्य विस्कटून गेले; मात्र भारत प्राचीन काळापासूनच एका समान सूत्रात बांधला गेला आहे. 1947 नंतर आधुनिक राष्ट्राची म्हणून ओळख, अस्मिता आणि जाणीव निर्माण झाली. या देशात आस्तिक आहेत, त्याप्रमाणे नास्तिकही; परंतु एकमेकांच्या धर्माचा, भाषेचा व संस्कृतीचा आदर करणे हेच खरे भारतीयत्व आहे. मात्र, हिंदुधर्मीयांचा अपमान करण्यात राजा यांना धन्यता वाटत असावी. ते अभिव्यक्तीचा अतिरेक करत आहेतच, शिवाय प्रादेशिक, भाषिक अस्मितेच्या नावावर आणि केवळ राजकीय अजेंडा रेटण्याच्या हेतूने देशापासून वेगळे होण्याच्या कथित कल्पनेला प्रोत्साहनही देत आहेत, हे अधिक गंभीर. असल्या दळभद्री विचार प्रवृत्तींच्या फुटीरतावादी लोकांना हा देश कधीही माफ करणार नाही.

Back to top button