तारतम्याची ऐशीतैशी | पुढारी

तारतम्याची ऐशीतैशी

अभिनेता रितेश देशमुख याचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच खूप गाजला. या चित्रपटामध्ये शीर्षकगीताचे बोल, ‘वेड लागलंय, मला वेड लागलंय’ अशाप्रकारचे होते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दररोज कोणी तरी प्रवक्ता किंवा तथाकथित नेता बोलायला लागला की, अमुकतमुक व्यक्तीला वेड लागले आहे, असे म्हणायला लागतो. एखाद्याची मन:स्थिती ढासळली आहे म्हणजेच ती व्यक्ती मनोरुग्ण झाली आहे आणि त्याच्या पुढची पायरी वेड लागण्याची असते. काही लोकांचे रोजचे भोंगे टी.व्ही.वर वाजतात तेव्हा खरोखरच अशी शंका यायला लागते. बोलण्याचे तारतम्य सुटलेल्या व्यक्तीला वेड लागले की काय, अशी शंका येणे साहजिक आहे.

राज्याच्या राजकारणात सहजगत्या बोलली जाणारी बाब म्हणजे विशिष्ट व्यक्ती पिसाळली आहे, असे म्हणणे. खरे तर पिसाळणे हा श्वानांचा गुणधर्म आहे, तो एकप्रकारचा रोग आहे. या रोगामध्ये श्वान समोर दिसेल त्या व्यक्तीला, प्राण्याला, वाहनाला चावायचा प्रयत्न करते. राजकारणामध्ये असे काही प्रत्यक्ष घडत नसले, तरी शाब्दिक चावे घेण्याचे प्रकार मात्र भरपूर वाढले आहेत, हे निश्चित. एखाद्याची मन:स्थिती ढासळली आहे, असा आरोप दुसर्‍या व्यक्तीने करावा आणि याच्या उलट उत्तरात पहिल्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीला तो पिसाळला आहे, असे म्हणावे हे राजकारणाचे झालेले अवमूल्यनच आहे.

महाराष्ट्र राज्याला आपण अभिमानाने पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य आहे, असे म्हणतो. समाजसुधारकांनी केलेल्या संस्कारांमुळे आजवर राज्यातील राजकीय नेत्यांचे बोलणे अतिशय सुसंगत आणि एकमेकांचा सन्मान ठेवणारे होते. सध्या बडबड करणार्‍या वाचाळवीरांवर असे संस्कार झालेले नाहीत की काय, याचा शोध घेतला पाहिजे.

संबंधित बातम्या

खासगीत बोलताना परस्परांवर यथेच्छ गालीप्रदान होत असे; परंतु आजकाल थेट जाहीररीत्या आणि घराघरांत पोहोचणार्‍या टी.व्ही.वरही अशीच भाषा वापरली जात आहे, हे पाहून वाईट वाटावे अशीच सामान्य माणसाची परिस्थिती आहे. दैनंदिन जीवनामध्ये अशाप्रकारच्या शिव्या फारशा कानावर पडत नाहीत; परंतु राजकीय मंडळी मात्र शिवीगाळ करण्यात मश्गूल आहे.

काही राजकीय चालींमुळे एखाद्या व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होत असेल, हे आपण समजू शकतो. विशेषत:, पक्ष सोडून गेलेल्या लोकांवर संताप असणे साहजिक आहे; परंतु तो संताप जाहीररीत्या आणि गलिच्छ शब्दांमध्ये व्यक्त होतो तेव्हा त्याचा निषेध केला पाहिजे. या सगळ्या प्रकारामुळे सर्वसामान्य लोकांना राजकारणाचा उबग आला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. बरे एकमेकांना वेडे म्हणणारे लोक पुढील सहा महिन्यांत गळ्यात गळे घालून पुन्हा एकाच पक्षात दिसतात. हे सगळे पाहून राज्यातील जनता ‘वेड लागलंय, आम्हाला वेड लागलंय’ असे म्हणू लागेल, हे निश्चित आहे.

एकमेकांना वेडे ठरवताना आपण जनतेलाच वेडे ठरवत आहोत, हे या लोकांच्या लक्षात येईल तो सुदिनच म्हणावा लागेल. लोकांनाही आता कळून चुकले आहे, हे लोक टी.व्ही.वर दिसण्यासाठी वाचाळता करत असतात. रोज रोज तीच ती भाषा आणि एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम ही राजकीय मंडळी करत आहे. बोलण्यातील नैतिकता इतकी घसरली आहे की, हे लोक संस्कारी आहेत की नाहीत, असा विचार करावा लागत आहे. राजकारण जरूर करावे; पण त्यासाठी विवेकवादी भाषा वापरण्याची गरज आहे. विनाकारण तोंडसुख घेण्यात काहीच अर्थ नाही.

Back to top button