पुतीनशाहीचा वरवंटा | पुढारी

पुतीनशाहीचा वरवंटा

जगातील सर्वात स्टायलिश नेत्यांपैकी एक म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ओळखले जातात. त्यांचे मोठे बंधू दुसर्‍या महायुद्धात रशियाकडून लढताना शहीद झाले. एका सामान्य कुटुंबातून येणारे पुतीन ‘केजीबी’ या रशियन गुप्तचर संस्थेत काम करत होते. त्यांच्या कामगिरीमुळे तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष येल्त्सिन एवढे खूश झाले की, त्यांनी त्यांना आपला राजकीय वारसदार घोषित केले. रशियात पुतीन यांना हीरो म्हटले जाते. ते अजरामर असल्याच्या भाकडकथाही समाजमाध्यमातून पसरवल्या जातात. 1920 च्या सुमारास ते लष्करी पोशाखात वावरत होते. त्यांनी दुसर्‍या महायुद्धातही भाग घेतला आणि ते कधीच मरणार नाहीत, अशा सचित्र दंतकथा पसरवल्या जात असतात. प्रत्यक्षात पुतीन हीरो नव्हे, तर व्हिलनप्रमाणे वागत आहेत. रशियातील ताज्या घडामोडींमुळे त्यांची ही राक्षसी वृत्ती ठळकपणे समोर आली आहे. त्यांचे राजकीय विरोधक अ‍ॅलेक्सा नेव्हलानी यांचा तुरुंगात मृत्यू झाला असून, त्यांची हत्याच झाली, असा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी व इतर अनेकांनी केला आहे. पुतीन यांना कोणाच्या जगण्या-मरण्याने काहीही फरक पडत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

नेव्हलानी यांनी पुतीन यांच्यावर भ—ष्टाचाराचे आरोप करत मोठे आंदोलन केले होते. जर्मनीतील कथित विषप्रयोगामुळे उद्भवलेल्या आजारपणातून बाहेर पडल्यानंतर नेव्हलानी मॉस्कोला परतले होते आणि त्यांनी सरकारविरोधात चळवळ सुरू केली होती. पॅरोलचे उल्लंघन, फसवणूक आणि न्यायालयाचा अवमान या आरोपांवरून त्यांना नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दहशतवादी संघटना स्थापन करण्याच्या आरोपात दोषी ठरवून आणखी 19 वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळेही समाधान झाले नाही म्हणून की काय, रशियातील राजवटीने नेव्हलानी यांना गेल्या डिसेंबरात रशियातील तुरुंगातून आर्टिक सर्कलवर असलेल्या विशेष तुरुंगात हलवले होते. हे कारागृह मॉस्कोपासून 1,900 किलोमीटर अंतरावर असून, तेथे सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था तैनात असते.

नेव्हलानी हे लोकशाहीसाठी, रशियन जनतेच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि असा लढा देणार्‍या विरोधात पुतीन कोणती पातळी गाठू शकतात, हेच या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे वृत्त खरे असेल, तर पुतीन यांच्या क्रौर्याचे हे आणखी एक उदाहरण, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी व्यक्त केली, ती उगीच नव्हे. पुतीनशाहीच्या राजवटीत विरोध तसूभरही सहन केला जात नाही. म्हणूनच मॉस्कोत नेव्हलानी यांना आदरांजली वाहण्यासाठी ज्या मेणबत्त्या पेटवण्यात आल्या, त्या रात्रीच्या रात्री हटवण्यात आल्या. त्यांच्या स्मृतीनिमित्त काढण्यात आलेल्या मोर्चातील 177 जणांना स्थानबद्ध करण्यात आले. एडवर्ड कँ्रकशॉ हे सोव्हिएत रशियातील प्रख्यात इतिहासकार आणि भाष्यकार. प्रदीर्घ अभ्यासानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला होता की, रशियाचा भूतकाळ हा शोकान्त होता आणि क्रांतीनंतरही या भूतकाळाचे ओझे नेते वाहत होते. दुष्टपणा, भीती व प्रमाद यांचा वारसा त्यांनी आजतागायत चालवला. यामुळे स्वतःच्याच लोकांना खोटे सांगून नेते त्यांची दिशाभूल करतात. कँ्रकशॉ म्हणतात ते शंभर टक्के सत्य आहे. मोलोटोव्ह हे स्टॅलिन यांचे उजवे हात होते. सोव्हियत रशियाचे पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री म्हणूनही मोलोटोव्ह यांनी नाव मिळवले. स्टॅलिनने जेव्हा पक्षशुद्धीकरणाच्या नावाखाली लाखो लोकांना,

 

सहकार्‍यांना व कार्यकर्त्यांना ठार मारले, तेव्हा त्या कामात मोलोटोव्ह यांचा पुढाकार होता. ज्यांचा बळी द्यायचा, अशा विरोधकांच्या याद्याच त्यांनी तयार केल्या होत्या. त्या काळात पूर्व युरोपात हंगेरी, पूर्व जर्मनी, पोलंड येथे जे उठाव झाले, ते निर्घृणपणे चिरडण्याच्या कामात मोलोटोव्ह आघाडीवर होते. इतके करूनही मोलोटोव्ह यांच्या पत्नीलाच संशयावरून स्टॅलिनने तुरुंगात डांबले होते. स्टॅलिन व मोलोटोव्ह हे पुतिन यांचे आदर्श आहेत. त्यामुळे ते विरोधातील नेत्यास शिल्लकच ठेवत नाहीत. 1990 च्या दशकात नेमेत्सोव्ह हे रशियातील तरुण सुधारणावादी नेते पुढे आले आणि त्यांना उपपंतप्रधानपद लाभले; मात्र त्यांना डावलून येल्त्सिन यांनी पुतीन यांची राष्ट्राध्यक्षपदासाठी निवड केली. नेमेत्सोव्ह यांनी या निवडीला पाठिंबा दिला होता; परंतु देशात जेव्हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच झाला, तेव्हा नेमेत्सोव्ह यांनी त्यास रस्त्यावर येऊन विरोध केला.

युक्रेनच्या अंतर्गत कारभारात रशियाने ढवळाढवळ केली, तेव्हाही नेमेत्सोव्ह यांनी विरोध प्रकट केला. त्यानंतर लगेचच एका अज्ञात व्यक्तीने त्यांना गोळ्या घालून ठार मारले. पुतीन यांचे नेतृत्व प्रकाशात आणण्यात बोरिस बेरेझोव्हस्की या उद्योगपतीचा वाटा मोठा होता; परंतु पुतीन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काही काळातच त्यांचे पुतीन यांच्याशी मतभेद झाले. त्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक होऊन, बेरेझोव्हस्की यांनी पुतीन यांना खाली खेचण्याची गर्जना केली. 2009 मध्ये एका माजी गुप्तचर अधिकार्‍याची हत्या सरकारनेच घडवून आणली होती, असा आरोपही बेरेझोव्हस्की यांनी केला. त्यानंतर लवकरच ते बाथरूममध्ये मृतावस्थेत सापडले.

चेचेन नागरिकांच्या मानवी हक्कांची प्रकरणे लढवणारा वकील मार्केलोव्ह याची क्रेमलिनजवळच एका बुरखाधारी इसमाने हत्या केली. चेचेन्यातील अपहरण आणि हत्यांची प्रकरणे शोधून काढणार्‍या नताल्या एस्टेमिरोव्हा या महिला पत्रकारालाही गोळ्या घालून संपवले होते. क्रेमलिनने संपूर्ण देशाचे रूपांतर पोलिसी राज्यात केल्याचा आरोप अ‍ॅना पोलित्कोव्हस्काया या महिला पत्रकाराने ‘पुतीन्स रशिया’ या पुस्तकात केला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण करून जगाला युद्धाच्या खाईत लोटले. अन्य युरोपियन देशांनाही रशियाच्या विस्तारवादाची भीती वाटत आहे; मात्र रशियाला महान राष्ट्र बनवण्याच्या नावाखाली पुतीन यांनी लोकशाहीवर वरवंटा फिरवणे सुरू केले आहे. त्यांचा खरा चेहरा उघड होत असून रशियातील जनता अस्वस्थ आहे. आज ना उद्या या हुकूमशाहीचा अंत जनताच घडवून आणेल, यात शंका नाही.

Back to top button