तडका : हॅलेंटाईन डे..! | पुढारी

तडका : हॅलेंटाईन डे..!

आज सकाळी सकाळी रामपारी म्या आमच्या खटल्याला म्हनलं, आय लव यू. ती येकदम लाजली आन् आजूबाजूला जाऊ लागली. लेकरं पार तिकडं वडाच्या झाडाखाली इट्टी दांडू खेळत बसले व्हते. बायकूनं पदरात तोंड झाकून घेतलं आन् लाजाय लागली, मुरक्या मुरक्या हासाय लागली. मी म्हंलो, ‘आज हॅलेंटाईन डे हाय. त्येच्या नियमाप्रमानं या दिवशी तसं म्हनावं लागतंय.’

पन पुना म्या विचार केला की, आपन आपल्याच बायकूला आय लव यू म्हनलं तर काही बिघडतं का काय? आन पुन्हा हॅलेंटाईन डेलाच आसं का म्हनायचं? काय कुनाची भीती है का काय? हजार मानसांसमोर आपलं भवल्यावर लगीन लागलंय. तवा आभाळातून देव आन् गावातले लोक आशीर्वाद द्यायला व्हतेच की. पन काय बी म्हना राजे हो, खाजगीत सांगतो, आय लव यू म्हनायला लैच डेरिंग लागते. बघाय गेलं तर लयच सिम्पल हाये. हातात फूल घ्यायचं, गुडघ्यावर वाकायचं आन् बायकूला फूल देऊन आय लव यू म्हनायचं. शिटीमधी न्हाई का, कुनी बी कुनालाबी फूल देतंय आन् आय लव यू म्हंतय.

तरुनपणीची गोष्ट येगळी होती. आपण फुलाचा गुच्छा घेऊनच निघायचो. दिसली चांगली पोरगी की, फूल द्यायचं आन् आय लव यू म्हनायचं. लै फुलं वाटली पन आपला काय टाका कुठं भिडलाच न्हाई. म्हंजे राजेहो, आपल्याला जिंदगीत लव काय जमलंच न्हाई. तुम्ही म्हनताल आता दोन लेकरं झाल्यावर जुन्या गोष्टी काऊन सांगायले म्हनून.

जवानीत कोशिश केली न्हाई असं न्हाई. लय कोशिश केली. गावातल्या एक-दोन पोरी लाईन बी देत होत्या. त्या दिसल्या की, काळजात नुसतं लकलक व्हायचं. पुन्हा कळालं की, त्या पोरी समद्या गावालाच लाईन देत्यात. येवढ्या गर्दीत आपला नंबर लागायचा म्हंजे बीजेपीचं, न्हाई तर अजितदादांचं घड्याळीचं तिकीट मिळवन्याइतकं अवघड होतं. आपन नादच सोडला. खाल्ल्या आळीत आनशी नावाची एक झ्याक पोरगी र्‍हात हुती. तालुक्याला जाऊन शिनेमा बगायचा तिला लय नाद होता. ती र्‍हायची पन झ्याकपाक. टापटिपिनं र्‍हायची म्हनून मला लय आवडायची. तिच्या येन्या-जान्याच्या रस्त्यावर मी डोळं लावून बसलेलो असायचो.

दहावीच्या अभ्यासाचं पुस्तक काढलं की, मला त्याच्यात तीच दिसायची. कितीबी पान उलटली तरी तिचा चेहरा पानावरनं हटायचाच न्हाई. राजेहो, तुमाला वाटलं आसन प्रकरन पुढं सरकलं आसल म्हनून. छ्या, छ्या. प्रकरन जाग्यावरच र्‍हायलं आन् आनशीच पुढं सरकली. ती दहावी पास होऊन कालेजात शिकायला गेली आन् आपन इंग्रजी आन् गणितात डुबकी खाल्ली. लय कोशिश केली, पन हे दोन ईशय काय किलीयर झालंच न्हाईत. आपन मॅट्रिक झालो न्हाई, पन नॉन मॅट्रिक तर झालो. पुढं आनशी गाव सोडून निघून गेली. या हॅलेंटाईन डेच्या नादात पोरींकडं बघता बघता मी त्याच वर्गात राहिलो आन् बघता बघता पोरी पुढच्या वर्गात निघून गेल्या. पुन्हा गाव सोडून लगीन करून निघून गेल्या. लगीन झालं, बायकू लय चांगली है आपली. निगुतीनं संसार सुरू हाये. दोन लेकरं होऊन, त्येबी मोठं होऊन शाळेत चाललेत. टीव्हीवर पाहून आपल्याला बी वाटतं का हॅलेंटाईन डे साजरा करावा म्हनून.

Back to top button