इराणी क्रांतीची 45 वर्षे | पुढारी

इराणी क्रांतीची 45 वर्षे

जगाला आणि इराणला मागे नेऊ पाहणार्‍या इस्लामिक क्रांतीस रविवारी 45 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा हजारो इराणी लोक जल्लोष साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेहरानमध्ये संपूर्ण शहरभर हवेत फुगे सोडण्यात आले. ठिकठिकाणी अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. इराणच्या लष्कराने अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचे तसेच उपग्रहाचे जनतेसमोर प्रात्यक्षिक घडवले. वास्तविक, राजसत्ता आणि धर्मसत्ता ही एकाच माणसाच्या हाती एकवटली, तर जनतेला अशा माणसामागे कसे फरफटत जावे लागते, याचे सय्यद अयातुल्ला खोमेनी हे उत्तम उदाहरण. दि. 4 नोव्हेंबर, 1979 रोजी इराणमधील अमेरिकन वकिलातीवर हल्ला झाला आणि कर्मचार्‍यांना ओलीस ठेवले गेले. पुढे 440 दिवसांनी 52 ओलिसांची सुटका करण्यात आली; मात्र त्या आधीच नऊ महिने इराणमध्ये 11 फेब्रुवारी, 1979 रोजी क्रांती झाली होती.

शाह पहलवी यांच्या हाती 1941 मध्ये देशाची सूत्रे आली. त्यांनी आपल्या हाती असलेल्या राजसत्तेच्या बळावर पुरुषांनी पाश्चिमात्य वेश परिधान करावेत आणि महिलांनी बुरखा घालता कामा नये, असे आदेश दिले. मुल्ला-मौलवींचे अधिकार कमी करण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. शाह यांनी जमीन सुधारणेचा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली, तेव्हा हा इराणवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे, असा युक्तिवाद करून खोमेनींनी या संघर्षाला वेगळ्या पातळीवर नेले.

खोमेनींना अटक झाली व नंतर त्यांना हद्दपारीचा आदेश देण्यात आला. ते देशातून परागंदा झाले. त्याचवेळी देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरगुंडी सुरू होती; मात्र जानेवारी 1978 मधील आपल्या दौर्‍यात तेहरान येथे बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी, आपण शाह राजवटीच्या मागे मजबूतपणे उभे आहोत, असे जाहीर केले होते. त्यानंतर शाह समर्थक व खोमेनीवादी यांच्यातील संघर्ष रस्त्यावर आला. पोलिसांचा गोळीबार व आंदोलकांची जाळपोळ यात देश भरडून निघाला. अखेर इराणच्या शाहांना 1979 च्या जानेवारीत सूत्रे खाली ठेवून देशाबाहेर जावे लागले आणि खोमेनी देशात परतले. शाहांना अमेरिकेने प्रचंड लष्करी मदत केली. याचे कारण रशियाविरोधी तळ म्हणून इराणचा अमेरिकेला उपयोग होता.

याखेरीज अमेरिका व पाश्चात्त्य राष्ट्रे इराणच्या तेलावर बरीच अवलंबून होती. शाहांनी उद्योगीकरणावर भर दिला. त्यातून एक नवा मध्यमवर्ग तयार झाला. सत्तेत भागीदारी मिळावी यासाठी हा मध्यमवर्ग अपेक्षा बाळगून होता. शाहांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. खोमेनी यांनी इस्लाम संकटात असल्याची हाक दिली, तेव्हा नेतृत्व त्यांच्याकडे गेले. शाहविरोधी उठावात मध्यमवर्ग व जहाल गटही सामील झाले. शाहांची सत्ता खाली खेचल्यामुळे अमेरिकेचा नक्षा उतरवला म्हणून अनेकजण नाचू लागले; परंतु इराणमध्ये धार्मिक पुनरुज्जीवनवाद फोफावला. अर्थात, शाह यांनीही आपल्या कारकिर्दीत तेलाचे भाव चौपटीने वाढवले. त्यातून पाश्चात्त्य राष्ट्रांना आपण सरळ करू, अशी अपेक्षा ते बाळगून होते. तेलदरवाढीमुळे शाहांची समृद्धी वाढली; परंतु इराण ही महासत्ता वगैरे बिलकुल बनली नाही, फक्त एकाधिकारशाही वाढली. शाह जाऊन इराणवर खोमेनींचे निरंकुश राज्य पुढील दहा वर्षे सुरू राहिले. खोमेनी यांनी मेहदी बझरगान यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती. ते उदारमतवादी आर्थिक धोरणांचे पुरस्कर्ते होते; पण त्यांनाही खोमेनींच्या वरवंट्याखालीच काम करणे भाग पडले. 83 मुल्ला-मौलवींच्या ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्टस्’नी इराणची घटना तयार केली आणि ‘गार्डियन ऑफ ज्युरिस्टस्’ म्हणून खोमेनींकडे अधिकार देण्यात आले.

इस्लामिक प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर अबुलहसन बानी सद्र यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली; पण खोमेनी यांच्या वर्चस्वामुळे कोणालाच राज्यकारभार करता येणे कठीण होऊन बसले होते. दररोज शेकडो लोकांना फासावर लटकावले जात होते. शेवटी बानी सद्र यांनाही फ्रान्समध्ये पळून जावे लागले. अर्थव्यवस्थाही कोसळून पडली. गैरसोयीच्या वाटणार्‍या गोष्टींना खोमेनींनी ‘इस्लामविरोधी’ ठरवले. विरोधकांच्या त्यांनी कत्तली केल्या. अमेरिकन वर्चस्वाला शह देण्यासाठी मुस्लिम पुनरुत्थानाचा प्रयत्न करणार्‍या खोमेनींनी इराणला विनाशकारी मार्गावर नेऊन ठेवले. त्यात इराकने इराणवर आक्रमण केल्यामुळे संकटात भरच पडली. खोमेनींनी ‘सॅटनिक व्हर्सेस’ लिहिणारे ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांच्याविरुद्ध फतवा काढल्यामुळे ब्रिटनने इराणबरोबरचे राजनैतिक संबंधच तोडून टाकले होते. ही राजवट निर्घृण होती.

कोणताही अशिक्षित वा मागासलेला समाज आधुनिक बनवताना घाईगर्दी केल्यास स्फोटक परिस्थिती निर्माण होते, याचे भान शाहांनी ठेवले नाही. आधुनिक समाज उभा करण्याच्या त्यांच्या कार्यक्रमाने पर्शियन संस्कृतीही हादरली. जमीन सुधारणांचा गाजावाजा करण्यात आला; पण प्रत्यक्षात कृषी उत्पादन वाढण्याऐवजी घटले आणि धान्य आयात करण्याची पाळी आली. धर्मपीठांना मिळणार्‍या देणग्यांबाबतही सरकारने ढवळाढवळ केल्यामुळे मौलवी विरोधात गेले. आधुनिकतेचा विरोध करताना इराणला त्यांनी थेट मध्ययुगात नेऊन ठेवले. आज इराणमध्ये अयातुल्ला सय्यद अली हुसैनी खामेनी सर्वोच्च नेते असून, 1989 पासून ते या पदावर आहेत. विरोधक, विद्यार्थी, कामगार यांची अनेक आंदोलने त्यांनी चिरडून टाकली.

अलीकडेच हिजाबवरून झालेले महिलांचे आंदोलनही चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला. सौदी अरेबियाच्या येमेनमधील हस्तक्षेपावरून इराणचा त्या देशाशी संघर्ष सुरू आहे. गाझा पट्टीतील हल्ल्यांमुळे अमेरिका व इस्रायलशी इराणचे संबंध आणखीच बिघडले. इराक, सीरिया व पाकिस्तानमध्येही इराणने हल्ले घडवून आणले. कट्टरतावाद आणि उदारमतवादातील हा उघड संघर्ष आहे. त्यामुळे तेलसंपत्तीने समृद्ध देश आज क्रांतीच्या पंचेचाळीस वर्षांनंतरही अस्थिर आहे. हा भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे, तर इराणच्या तेल व वायू उद्योगात भारत हा सर्वात मोठा विदेशी गुंतवणूकदारही आहे. धर्मसत्तेने राजसत्तेवर कुरघोडी करू नये हा इराणवरून घेण्यासारखा धडा असला, तरी अर्थकारणाच्या द़ृष्टिकोनातून भारताला इराणशी घट्ट संबंध ठेवणे भागच आहे!

Back to top button