गरिबांचे कल्याण हेच देशाचे कल्याण! | पुढारी

गरिबांचे कल्याण हेच देशाचे कल्याण!

निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी 58 मिनिटांत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, आम्ही सर्व व्यवहारांत पारदर्शकता आणली आहे. त्याशिवाय देशात महागाई आहे; पण ती माफक प्रमाणात असल्याचे म्हटले आहे. सीतारामन यांच्या भाषणातील ठळक मुद्दे…

देशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या द़ृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत. मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत खूपच प्रगती साधली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन मोदी सरकार वाटचाल करत आहे. नव्या योजना, रोजगारनिर्मितीवर आम्ही भर दिला आहे. ग्रामीण विकास, घर, पाणी, स्वयंपाकाचा गॅस तसेच बँक खाती उघडण्यासाठी आम्ही वेगाने कार्य केले आहे. देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुरवले आहे. ग्रामीणस्तरावर काम करणार्‍या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. सरकार आर्थिक सुधारणांवर भर देत आहे. 2047 पर्यंत भारत देश हा विकसित राष्ट्र असेल, यात काही शंकाच नाही. अत्याधुनिक भारत हेच विकसित भारताचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी काम करत असताना गरीब, महिला, अन्नदाता शेतकरी यांची प्रगती साधणे याला प्राधान्य आहे. गरिबांचे कल्याण हेच देशाचे कल्याण आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोक हे दारिद्य्ररेषेच्या बाहेर आले आहेत.

गेल्या दहा वर्षांत देशात सकारात्मक परिवर्तन होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भारतीय लोक खूपच आशावादी आहेत. आशावादाच्या जोरावर भविष्याकडे आम्ही वाटचाल करत आहोत. लोकांच्या आशीर्वादामुळेच 2014 मध्ये आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सत्तेत आलो. ‘सबका साथ, सबका विकास’चा मंत्र घेऊन आम्ही सर्व अडचणींचा सामना करायला सज्ज झालो. लखपती दीदींना प्रोत्साहन दिले जाणार असून, ‘लखपती दीदी’ योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. ‘लखपती दीदी’मुळे अनेक महिला स्वावलंबी बनल्या आहेत. कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जाणार नसून, प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. केंद्र सरकार देशातील पर्यटन क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक करेल, अशी घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपसह भारतातील इतर बेटांवर सहज ये-जा करता यावी, यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी, पर्यटन पायाभूत सुविधा आणि इतर गरजेच्या सुविधा पुरवण्यासाठीचे प्रकल्प सुरू केले जातील.

अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आले आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी लसीकरण करण्यात आले आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ‘मिशन इंद्रधनुष’मध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जाणार असून, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण केले जाणार आहे. नॅनो युरियानंतर आता नॅनो डीएपीचा वापर पिकांसाठी केला जाणार आहे. दुग्धविकास क्षेत्रात चांगले काम होणार असून, दुग्ध उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाईल. येत्या 5 वर्षांत विकासाची नवी व्याख्या तयार करू. आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तेलबियांवरील संशोधनाला चालना दिली जाणार आहे. दर महिन्याला तीन कोटी गरिबांना 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत.

पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचण्याची योजना आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. 78 लाख फेरीवाल्यांना मदत देण्यात आली आहे. शेतकर्‍यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकर्‍यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून 11.8 कोटी शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. देशात तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आली आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच देशात आता 7 आयआयटी आणि 7 आयआयएम स्थापन केली जाणार आहेत. इतकेच नाही, तर देशात आणखी 15 एम्स रुग्णालये उघडली जातील.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित केला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आणि महिला सक्षमीकरणाला बळ दिले. आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. आम्ही भ—ष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे. आमच्या सरकारने 2014 मध्ये सत्ता हातात घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शासन व्यवस्थेतही सुधारणा केली. लोकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे आणि नव्या सुधारणांसाठी आवश्यक असलेले सर्व बदल घडवून आणले. ‘सबका साथ, सबका विकास हेच तत्त्व समोर ठेवून सरकारने यशस्वी वाटचाल केली.

Back to top button