प्रभु आले मंदिरी | पुढारी

प्रभु आले मंदिरी

दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला?
राम जन्मला गं सखी राम जन्मला

ज्या दिवशी तमाम भारतवासीयांना प्राणप्रिय असलेल्या श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला, तेव्हा अवघ्या सृष्टीत जणू असेच सूर उमटले.

बुडुनी जाय नगर सर्व नृत्यगायनी
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी
डोलतसे तीही, जरा शेष डोलला

आज अवघ्या भारतविश्वात असा आल्हाद, असा आनंद आहे. अयोध्येत रामलल्लाची आज अभूतपूर्व अशा दिमाखात, थाटात आणि डौलात प्राणप्रतिष्ठा होत आहे. ‘आम्ही भावनांनी ओथंबून गेलो आहोत. आयुष्यात प्रथमच मी अशा भावना अनुभवत आहे. जे स्वप्न अनेक पिढ्यांनी संकल्पाप्रमाणे आपल्या हृदयात जपले, ते स्वप्न जसेच्या तसे साकारण्याचे सौभाग्य मला प्राप्त होत आहे,’ अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर यानिमित्ताने व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठानही केले. पूर्वी स्वामी विवेकानंदांनी भारताच्या आत्म्याला साद घातली होती. मर्यादा पुरुषोत्तम राम हा भारताचा आत्मा आहे, तो केवळ हिंदू नव्हे, तर भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. विवेकानंदांना जो हिंदू धर्माबद्दल आत्मविश्वास वाटत होता, तो अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या रूपाने आज पाहायला मिळत आहे. रामायण आणि महाभारत हे आपले दोन प्राचीन काव्यग्रंथ. पतनाच्या गर्तेत असलेले राष्ट्र पुन्हा वर काढण्याच्या कामी या कथांचा उपयोग झाला.

‘महाभारतातील पाशुपतास्त्रप्राप्तीसाठी जिवाचे रान करणारा अर्जुन आणि शतयोजने सागर ओलांडून जाणारा हनुमन्त, दोघेही जणू स्फूर्तीचे सागरच!’ असे ख्यातनाम साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी आपल्या ‘श्रीरामायण’ या ग्रंथात म्हटले आहे. मूळ रामायणकथा ऋषी वाल्मीकींनी लिहिली. तिची प्रत्येक भाषेत संस्करणे निघाली. मराठीतही संत एकनाथांचे भावार्थ रामायण, संत रामदास्वामींनी केलेली रामायणात्मक रचना, मोरोपंतांची विविध रामायणे आहेत. तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’ तर भारतीयांच्या कंठीचा मणी होऊन बसले आहे. रामकथा ही परमपावन आहे. तिच्या पठनाने, मननाने चिंतनाने मन उन्मन होते. सर्व कोषांचा भेद करून पुरुषार्थ प्रकट होतो. वृत्ती स्थिरावते. सर्व प्रकारच्या संकटांशी झुंजण्याचे सामर्थ्य अंगी निर्माण होते; कारण श्रीरामचंद्र आणि त्रिभुवनपावनी जानकी, अशा अद्वितीय युगुलाने असंख्य दुःखे झेलली होती. अनेक काव्ये निर्माण होतील; पण श्रीरामायणाचे अलौकिकत्व अभंग, अक्षय राहील! श्रीरामाच्या राज्यात सर्वजण नीतिनियमांचे पालन करत.

रामराज्यात चोरी, बलात्कार, अपहरण, खोटे बोलणे इत्यादी दुर्गुणांना थारा नव्हता. एखाद्या सामान्य मनुष्याने हावेच्या पोटी काहीतरी मिळवायची कामना केली व तसे अपकृत्य केले, तर त्याला उचित दंडही दिला जाई. सीतेने सांगितलेल्या निरोपाप्रमाणे रघुकुलाच्या कीर्तीला साजेल अशाच पद्धतीने श्रीरामचंद्रांनी अयोध्येचे परिपालन अतिशय न्यायाने केले. मानसरोवर, गंगोत्री, हरद्वार, अमरनाथ, प्रयागराज, नर्मदा, गोकर्ण अशा विविध स्थळांवरून आणलेल्या जलाने श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक होईल. शरयू नदीकाठी असलेले एक पवित्र स्थान म्हणजे गुप्तार घाट. अयोध्येत अध्यात्माचा आणखी एक थर जोडणारे हे स्थान. भगवान श्रीराम यांनी स्वर्गात जाण्यासाठी याची निवड केली होती. ते प्रस्थानबिंदू म्हणून समजले जाते. म्हणूनच याला गहन असे आध्यात्मिक महत्त्व आहे. सामान्यजनांना तेथे गेल्यावर लोकविलक्षण असा अनुभव मिळतो.

विविध ठिकाणांहून जल, मृदा, सोने, चांदी, वस्त्रे अयोध्येस आणण्यात आलेली आहेत. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर देशभर शंखध्वनी आणि प्रसादवाटप होईल; परंतु या निमित्ताने देशातील सर्व मंदिरे कायमस्वरूपी स्वच्छ राहतील, याची दक्षता घ्यायची आहे. देशातील गोरगरिबांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे देवळांबाहेर भिकारी नसतील, अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. प्रत्येक हाताला काम मिळवून दिले गेले, तर मंदिरांत दिसणार्‍या रिकामटेकड्यांची संख्या कमी होत जाईल. अयोध्येतील राम मंदिर ही केवळ उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेली वास्तू नसून, ते भारतीय संस्कृतीच्या प्रवासाचे एक पवित्र प्रतीक आहे. शरयू नदी, हनुमान गढी आणि श्रीराम जन्मभूमी ही ठिकाणे सामान्य जनतेला शुद्ध आचरण आणि कर्तव्यपालनाची प्रेरणा देणारी स्थळे आहेत. सन 1528 मध्ये अयोध्येत मुघल सम—ाट बाबराचा सेनापती मीर बांकी याने ‘बाबरी मशीद’ बांधली; पण त्याच जागेवर श्रीरामाचा जन्म झाला होता, अशी हिंदूंची श्रद्धा होती.

1953 मध्ये या जागेवरून प्रथम दोन समुदायांत वाद उद्भवला व दंगल पेटली. सन 1946 मध्ये बाबरी मशिदीवरून शिया व सुन्नी या दोन मुस्लिम समुदायांमध्ये वाद पेटला. बाबर सुन्नी असल्याने निर्णय शिया मुस्लिमांविरोधात झाला. डिसेंबर 1949 मध्ये मशिदीत श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्ती आढळल्या. त्यानंतरचा सर्व इतिहास उगाळत बसण्याचे कारण नाही. तो वाद, तणाव, दंगली, कोर्टबाजीचा आहे. एवढेच नव्हे, तर 2005 मध्ये तेव्हा ‘वादग्रस्त’ मानलेल्या जागेवर अतिरेकी हल्लाही झाला; मात्र 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन हिंदूंची असून, ती त्यांच्याकडे सोपवण्याचा व तेथून पंचवीस किलोमीटरवर पाच एकरांत मशीद उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय दिला. केवळ राजाच नाही, तर अवघे राजघराणे संशयातीत असले पाहिजे, रामाने तो आदर्श घालून दिला.

आजच्या राज्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. राजा असूनही श्रीराम एखाद्या संन्यस्ताप्रमाणे जीवन जगले. शबरी, बिभीषण, निषादराज, सुग्रीव, केवट अशा समाजातील सर्व घटकांना त्यांनी समानतेने वागवले. राम हे न्यायाचे, सभ्यतेचे, सुसंस्कृतपणाचे व नैतिकतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे, हे ध्यानात ठेवून, आता केवळ सत्ताधार्‍यांनीच नव्हे, तर प्रजेनेही व्यवहार केला, तर रामराज्य दूर नाही. मंदिर झाले आता रामराज्य साकारण्याचे आव्हान मोठे आहे. श्रीरामाच्या व गांधीजींच्या संकल्पनेतील ‘रामराज्य’ आम्ही साकारू, अशी प्रतिज्ञाच ‘प्रभु आले मंदिरी’च्या निमित्ताने समस्त भारतवासीयांनी केली पाहिजे.

Back to top button