तडका : चूल आणि चूल..! | पुढारी

तडका : चूल आणि चूल..!

साधारण शंभर वर्षांपूर्वी आपल्या देशातील आणि विशेषत्वाने महाराष्ट्रातील स्त्रिया या ‘चूल आणि मूल’ या दोन्हीमध्ये अडकलेल्या होत्या. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी अनेक समाजधुरिणांनी प्रयत्न केले. परंतु, आज संपूर्ण कुटुंबालाच ‘चूल आणि चूल’ याच संकल्पनेकडे ढकलण्याचे काम सुरू आहे का, अशी शंका वाटते. कोणत्याही शहराबाहेर पडल्यास ‘चुलीवरचे हे मिळेल, चुलीवरचे ते मिळेल’ अशा प्रकारचे मोठे फलक दिसायला लागतात. चुलीवरची भाकरी, चुलीवरची मिसळ, चुलीवरच्या भाज्या, चुलीवरचा चहा, त्यात पुन्हा चुलीवरचा गुळाचा चहा असे अनेक पुरातन पदार्थ नव्याने मिळायला सर्वत्र सुरुवात झालेली दिसते. स्पर्धा आली की जाहिरात येतेच.

भागातील चुली बंद पडाव्यात यासाठी सरकारने गॅस सिलिंडर आणि शेगड्या देण्यास सुरुवात केली. याचा उद्देश चुलीसाठी लागणारे इंधन, म्हणजेच लाकूडफाटा अर्थात वनांचे संरक्षण व्हावे तसेच गृहिणीला धुराचा त्रास होऊन श्वसनाचे विकार होऊ नयेत असा आहे. तेच ते पदार्थ घरी किंवा हॉटेलमध्ये खाऊन कंटाळलेल्या गरम खिसा असणार्‍या ग्राहकांना काहीतरी नवीन देणे आवश्यक होते. यासाठी खरपूस भाजलेले चुलीवरचे पदार्थ येण्यास सुरुवात झाली असावी. त्यामुळे सर्वत्र चुलीचाच बोलबाला दिसून येतो. आमच्या माहितीप्रमाणे आता फक्त ‘येथे चुलीवरचा नवरा मिळेल’ एवढीच काय ती बाब शिल्लक आहे.

चुलीवरचे म्हणजे ताजे, नुकतेच बनवलेले, खरपूस भाजलेले आणि धुरकट म्हणजेच स्मोकी असे पदार्थ शहरी लोकांनी आवडीने न खाल्ले तरच नवल! म्हणजे, आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे पूर्ण कुटुंबाला चुलीकडे ढकलण्याचे कारस्थान यशस्वी झालेले आहे, असे आपल्या लक्षात येईल. आता पुढील काळात याची पुढील आवृत्ती येईल. म्हणजे ‘लोखंडी कढईमध्ये शिजवून चुलीवर तयार केलेल्या भाज्या’ किंवा ‘येथे आजीने हातावर थापून चुलीवर भाजलेल्या भाकरी मिळतील’ किंवा मिळण्यास सुरुवात होईल. म्हणजे शहरी लोकांना भले आपल्या स्वतःच्या आजीच्या दर्शनाचा योग नसला, तरी कुणाच्या तरी आजीने प्रेमाने थापलेल्या भाकरी खाण्यास मिळाल्या, तर त्यांच्या थंडगार पडलेल्या जीवनात चुलीमधील उब आल्याचा भास होईल. यामुळे त्यांचे जेवणच नाही, तर जीवनसुद्धा रसरशीत झालेले दिसेल.

संबंधित बातम्या

पण, चुलीवरचे काही खावयाचे असेल, तर तिथे जावे लागते. हॉटेलातील चुलीवरचे पदार्थ घरी मागविण्याची सोय झाली आणि आपली संस्कृतीच बदलून गेली आहे. पूर्वी वधू परीक्षेत स्वयंपाक येतो का, हा महत्त्वाचा निकष असायचा. अशात आधीच वधू मिळणे अवघड झालेले असताना हा प्रश्न विचारणे म्हणजे आपल्या मुलाला आजन्म अविवाहित ठेवणे होय. समजा एखाद्या नवविवाहितेला स्वयंपाक येत असेल; पण तो करण्याचा कंटाळा येत असेल, तर काही पर्याय नाही. अशा सहनशील पुरुषांसाठी मग झोमॅटो, स्वीगी पुढे आले आणि त्यांनी घरची नाळ हॉटेलच्या चुलीशी जोडून दिली. पूर्वी स्वयंपाक होण्याची वाट पाहावी लागायची, त्याऐवजी आता डिलिव्हरी बॉय येण्याची वाट पाहावी लागते. तो आला, त्याने पार्सल दिले आणि आम्ही जेवलो ही पद्धत रूढ झाली आहे. कढईत शिजणार्‍या भाजी किंवा वरणाचा खमंग वास घरभर पसरायचा. भुकेने मन सैरभैर व्हायचे.

Back to top button