तडका : अशी असते संक्रांत | पुढारी

तडका : अशी असते संक्रांत

शहरी भागात संक्रांत अत्यंत निरस असते. संक्रांत ते रथसप्तमी हा कालावधी नागरी भागात महिला चैतन्य पंधरवडा असतो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही. गावभर साड्यांचे चालते बोलते प्रदर्शन असते. आमची माता भगिनी भर दुपारी अंदाजे अडीच-तीन वाजता कामाला लागते. अत्यंत उत्साहात भगिनीवर्गाच्या झुंडीच्या झुंडी दुपारी तीन वाजल्यापासून भणभण, भणभण गावभर फिरत असतात. दररोज नवी साडी, हातात पर्स आणि पायात चपला घातल्या की माऊली जे निघते ते पार रात्री आठ वाजता खिचडी टाकायलाच घरी पोहोचते. बरे, दुपारी निघतानाचा आविर्भाव ‘र्‍याम्प’ (म्हणजे तो नाही का फ्याशन शो मध्ये असतो) वर चालण्याचा असतो. संध्याकाळी घरी परतेपर्यंत कपाळ जगदंबेसारखे कुंकवाने माखलेले असते. साडी जमिनीला टेकून खराब होऊ नये म्हणून उचलून धरताना हात दुखतात तिचे; पण वेदना जाणवत नाहीत घरी पोहोचेपर्यंत.

दरम्यानच्या काळात कुंकवाचा धनी आणि लेकरेबाळे हवालदिल झालेली असतात. ते बिचारे काल-परवाच्या आईच्या वाणात काही खायचे आले आहे का याचा निष्फळ शोध घेतात. त्या दिवशीचे हळदी-कुंकू संपवून घरी परत आल्यानंतर बोलून बोलून, बोलून बोलून तिच्या घशाला कोरड पडलेली असते. आपण शांतपणे पिण्यासाठी पाणी आणून द्यावे. हाश्यहुश्य झाले की संपूर्ण वृत्तांत ऐकून घ्यावा लागतो. म्हणजे ‘अमुक एक बाई, किती श्रीमंत… पण वाणात लुटले (वाटले) काय तर रुपड्याच्या शाम्पूच्या पुड्या…’ किंवा ‘तमुक बाईकडे दिलेले दूध इतके पांचट होते की, मला तर तिथेच कसेतरी होऊ लागले. संपूर्ण पिऊच शकले नाही मी.’ पुढचा डायलॉग संपूर्ण कुटुंबाला सुखावणारा असतो, कधी एकदा रथसप्तमी येते असे झाले आहे. त्यामुळे कधी एकदाची रथसप्तमी येते, असे घरातील मुलांना आणि पुरुषवर्गालाही झालेले असते. हे थकव्याचे वैराग्य जेमतेम 12 तास टिकते. नवा दिवस, नवी साडी आणि तोच उत्साह दुसर्‍या दिवशी असतोच असतो.

या दिवसांत एखादा मध्यमवयीन (म्हणजे हिंदीमध्ये याला ‘अधेड उम्र का’ असे म्हणतात, म्हणजे ‘कुणी बाळा म्हटले तरी याला राग येतो आणि कुणी काका’ म्हटले तरी राग येतो) पुरुष सायंकाळच्या वेळी विमनस्कपणे रस्त्यावर फिरताना दिसला तर हमखास समजावे की, ‘आज याच्या घरी हळदी-कुंकू आहे’ म्हणून. म्हणजे ज्याच्या नावाने कुंकू लावले जाते त्यालाच घराबाहेर काढणारा सण म्हणजे संक्रांत होय. आता कळाले का आपली संस्कृती महान का आहे ते? आपल्याच घरी जाण्याची सोय नसलेला हा कुटुंब प्रमुख (?) मग नियंत्रण सुटलेल्या उपग्रहासारखा भरकटत राहतो. या दिवसांत थेटरात संध्याकाळी सहाच्या शो ला आलेले एकटे पुरुष हे असेच ‘हळदी-कुंकू के मारे’ असतात.

संबंधित बातम्या

अर्थात सगळेच विवाहित पुरुष काही इतके पापभिरू नसतात. चाणाक्ष मंडळी घरी हळदी-कुंकू कधी आहे याची अधाशासारखी वाट पाहात असतात. दिवसभर घरी सहकार्य करणारी अशी मंडळी साधारण चार-साडेचारच्या सुमारास जे फरार होतात ते थेट रात्री बारा वाजता, उगवला चंद्र पुनवेचा, अशा अवतारात घरी अवतीर्ण होतात.

Back to top button