सूर्यावर स्वारी | पुढारी

सूर्यावर स्वारी

कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक सुरेख कविता आहे. त्यात ते म्हणतात,
ही सारी फुले तुमची आहेत,
जे उमलतात,
त्यांचाच हक्क असतो फुलांवर.
या पुढचे सारे सूर्य
तुमच्यासाठी उगवतील
कारण तुमच्या कंठांत
नव्या प्रकाशाच्या ऋचा आहेत

सूर्याचा समग्र अभ्यास करण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच अंतराळात झेपावलेले ‘आदित्य-एल-1’ हे यान इप्सित स्थळी पोहोचल्यामुळे भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. लग्रांज बिंदू, म्हणजेच ‘एल-1’वर पोहोचलेले हे यान सूर्याचे निरीक्षण करणार आहे. भारतीय वैज्ञानिक कोठेही कमी नाहीत. त्यांच्या स्वप्नांना नवनवे पंख मिळत असतात आणि ते यशस्वी उड्डाण करत असतात, हे पुनःपुन्हा सिद्ध झालेले आहे. लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी ‘सूर्यावर स्वारी’ नावाचे पुस्तक वाचले असेल. ज्या गोष्टी केवळ स्वप्नातील वाटायच्या, त्या आता प्रत्यक्षात येऊ लागल्या आहेत. विकसित व समृद्ध भारत केवळ व्यापारी व उद्योजकांमुळे साकार होणार नाही, तर त्यामागे वैज्ञानिकांचे अथक परिश्रम असतील, हे लक्षात घेतले पाहिजे.

‘एल-1’ हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीच्या एकूण अंतराच्या केवळ एक टक्का असे हे अंतर असून, सूर्याच्या उष्णतेपासून लांब राहत या बिंदूवरून सूर्याचे निरीक्षण व अभ्यास करता येणार आहे. ‘आदित्य-एल-1’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करेल. दि. 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरिकोटा येथून यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. म्हणजे 126 दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर 6 जानेवारीला हे यान नियोजित स्थळी पोहोचले. आता या ‘एल-1’ बिंदूभोवती सौर प्रभामंडल (हॅलो) कक्षेत ते स्थापित करण्यात आले. लग्रांज बिंदू हा असा समतोल बिंदू आहे की, जेथे पृथ्वी व सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय होते. हॅलो कक्षा ही ‘एल-1’, ‘एल-2’ किंवा ‘एल-3’ या लग्रांज बिंदूजवळील एक नियमित त्रिमितीय कक्षा आहे. ‘एल-1’ बिंदूच्या चहूबाजूंनी हॅलो कक्षेतून हा उपग्रह सूर्याचे निरीक्षण करू शकतो. सौर वातावरणातील गतिशीलता, सौर वादळे, सूर्याच्या कोरोनाची उष्णता, सौर भूकंप तसेच सूर्याच्या पृष्ठभागावरील प्रभामंडल वस्तुमानाच्या उत्सर्जन प्रक्रियांचा अभ्यास तो करेल. सौर वातावरणातील घडामोडींचा पृथ्वीच्या जवळील अवकाशातील हवामानावर कसकसा परिणाम होतो, याच्याही नोंदी केल्या जाणार आहेत. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा एकमेव तारा आहे. हा वायूचा गोळा सौरमालेच्या केंद्रस्थानी आहे. सौरमालेतील सर्व ग्रहांसाठी तो ऊर्जेचा स्रोत आहे. त्याच्याच अस्तित्वामुळे पृथ्वीवरील जीवनासाठी अनुकूल वातावरण तयार होते.

सूर्याची किरणे, उष्णता, त्यातून उत्सर्जित होणारे कण आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रवाह पृथ्वीच्या हवामानावर सतत प्रभाव टाकत असतात. त्याचवेळी त्याचा अंतराळावरही प्रभाव पडतो. अवकाशातील हवामान हे उपग्रहांच्या प्रभावी कार्यात मोलाची भूमिका बजावत असते. सौर वादळे उपग्रहांवरील इलेक्ट्रॉनिक्सवर परिणाम करतात आणि त्यामुळे उपग्रहांवरील पॉवर ग्रीडस् उडवले जाऊ शकतात. ‘आदित्य-एल-1’ हे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर स्थित असल्यामुळे त्यातील उपकरणे कोरोनापासून उत्पन्न होणार्‍या अतिनील किरणोत्सर्गाचे निरीक्षण करू शकतात. मुळात सूर्यावरील उद्रेकांचे निरीक्षण करण्यासाठी सौर वातावरण आणि कोरोनाचा सतत अभ्यास करणे जरूरीचे असते.

‘आदित्य- एल-1’ हे महत्त्वपूर्ण काम करणार आहे. ‘एल-1’ हा पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणार्‍या रेषेवर आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि ‘एल-1’ बिंदूदेखील सूर्याभोवतीच फिरतो. आदित्य या सुनियोजित बिंदूभोवतीच्या कक्षेत भ—मण करत राहील. याचा अर्थ ते सूर्य आणि पृथ्वी यांच्यापासून सापेक्षरीत्या स्थिर राहील. ते आव्हान भारतीय शास्त्रज्ञांनी स्वीकारले आहे.या मोहिमेवरील खर्च 400 कोटी रुपयांच्या आतबाहेरचा असू शकतो. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळात तो विचारला जात असे; परंतु आता साक्षरता वाढली असून, राजीव गांधी यांच्या काळापासून भारताला एकविसाव्या शतकाचे वेध लागलेले होते.

भारताचे अंतराळात पन्नासहून अधिक उपग्रह आहेत. ते देशाला अनेक महत्त्वाच्या सेवा पुरवतात. उपग्रहांमुळे दळणवळण, हवामानाची माहिती, दुष्काळ आणि संभाव्य आपत्तींचा अंदाज लावता येतो. अंतराळात सुमारे 10 हजार 290 उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असून, त्यापैकी जवळपास 7 हजार 800 कार्यरत आहेत. भारतापूर्वी अमेरिका, जर्मनी आणि युरोपने सौर मोहिमा राबवल्या आहेत. अमेरिकेच्या ‘नासा’ने 1960 साली पहिल्यांदा सौर मोहीम (पायोनियर 5) हाती घेतली. त्यानंतर ‘नासा’ने आतापर्यंत अशा 14 मोहिमा पार पाडल्या. ‘नासा’ने धाडलेले बारा ऑर्बिटर सूर्याच्या भोवती विविध कक्षांमध्ये फिरत आहेत. ‘नासा’चा पार्कर सोलार प्रोब हा सध्या सूर्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रोबने सूर्याभोवती आतापर्यंत 26 वेळा प्रदक्षिणा घातली आहे. पायोनियर-ई ऑर्बिटर हे आपल्या ठरलेल्या कक्षेत पोहोचण्यास अयशस्वी ठरले होते; मात्र त्यानंतर ‘नासा’नेच लाँच केलेल्या ‘जेनेसिस’ यानाने सूर्याभोवती फिरून सौर हवेचे नमुने गोळा केले होते. जटिल आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमा यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी परिश्रम घेतले आहेत आणि ‘आदित्य-एल-1’ हे त्याचेच यश आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी भारताच्या मोहिमेचे कौतुक केले आहे. इस्रोच्या या यशामागे पुरुषांप्रमाणेच महिला वैज्ञानिकांचाही मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, सूर्यमोहिमेचे नेतृत्व तामिळनाडूतील निगार शाजी ही एक मुस्लिम महिला करत आहे. एकीकडे वैज्ञानिक उंच भरारी घेत असताना, देशात अंधश्रद्धा, जातवाद, धर्मवाद आणि सर्व प्रकारचे भेदभाव या वैगुण्यांचे दर्शन वारंवार घडत असते. सूर्यनारायणाकडे बघून तरी या देशास वैज्ञानिक द़ृष्टी लाभो, हीच अपेक्षा.

Back to top button