तडका : रील्सचा गुंता..! | पुढारी

तडका : रील्सचा गुंता..!

पूर्वी रीळ किंवा रील म्हटले की शिवण दोर्‍याचे रीळ डोळ्यासमोर येत असे. एखाद्या लग्न समारंभात चार-दोन मुली, मुले मिळून तोंड वाकडे करीत एखाद्या गाण्यावर नृत्य करत असतील, तर अजिबात विचलित होऊ नका. कारण ते रील तयार करत आहेत. असे रिल्स तयार करून ते तत्काळ सोशल मीडियावर टाकले जातात. या रील अत्यंत कमी वेळाच्या म्हणजे पंधरा सेकंद ती 30 सेकंद किंवा फार फार तर एक मिनिटाचे असतात. या सगळ्या प्रकारामुळे झाले असे आहे, की 30 सेकंद ते एक मिनिटाचे व्हिडीओ बघायची सवय झाली आहे.

आता भारतामधील मोबाईल वापरणार्‍यांची संख्या कशी आहे, ती पाहू या. आता मोबाईल म्हणजे साधे मोबाईल राहिले नाहीत, तर ते स्मार्टफोन झालेले आहेत. म्हणजे भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त असणे आणि प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असणे, यामुळे एकंदरीत समाज जीवनातही बदल होत गेले आहेत. आपल्या देशात 2013 साली पंधरा टक्के लोक इंटरनेटचा वापर करत होते; पण डिजिटल इंडियासारख्या सरकारी उपक्रमामुळे आणि विशेषत: कोव्हिडनंतर हे चित्र बदलत गेले. नुकत्याच प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 72 कोटी भारतीय लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. यांचे प्रमाण ग्रामीण भागात 38 टक्के, तर शहरी भागात 62 टक्के आहे. निम्म्याहून जास्त ग्रामीण भारतात आज इंटरनेट उपलब्ध आहे, त्यामुळे स्मार्टफोन वापरणार्‍या भारतीयांची संख्या 45 कोटींच्या घरात पोहोचली आहे.
इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅपवर आकर्षक आणि कमी वेळाचे कंटेंट पाहायला मिळते की त्यात वेळ कसा जातो, हे कळत नाही. परत यातून काही ज्ञानार्जन होते का? तर तसाही काही फारसा उपयोग नाही. शिवाय आपण काय पाहतो आणि ते कितपत लक्षात राहते याचा काही विषय नाही, कारण यापैकी काहीही लक्षात राहत नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज ना उद्या समाजमनावर झालेला दिसणार आहे. 30 सेकंद किंवा एक मिनिट हे याचे माप असताना दीर्घपल्ल्याच्या गोष्टी करणे किंवा चिंतन करणे किंवा दीर्घकाळासाठी नियोजन करणे, या गोष्टी हळूहळू संपुष्टात येत आहेत. या बाबीचे परिणाम सर्वच लोकांवर होत असल्यामुळे दीर्घकाळ चालणारे प्रकल्प करणार कोण? भविष्यात कोणी चिंतन करणार आहे की नाही? असे अनेक नवीनच प्रश्न उभे राहण्याची शक्यता आहे.

रील तयार करायची, त्याला म्युझिक द्यायचे आणि तितक्याच तत्काळ ते सोशल मीडियावर व्हायरल करून टाकायचे, ही प्रक्रिया तीन ते चार मिनिटांत पूर्ण केली जाते. त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने चमकदार असे कंटेंट सोशल मीडियावर येण्यास सुरुवात झाली आहे. हा एक प्रकारचा नाद आहे, असे म्हटले तर चूक होणार नाही. या नादाने पछाडलेले असंख्य नादी लोक तुमच्या आजूबाजूला सर्वत्र पाहायला मिळत आहेत. रील तयार करायला मिळावेत म्हणून लोक पर्यटनाला जात आहेत. अगदी साध्या हॉटेलमध्ये भजी खाल्ली तरी त्याचे रील तयार करून सोशल मीडियावर टाकले जात आहेत. त्यात काही क्रिएटिव्हिटी आहे की नाही, हा विषय नाही. ती आहेच परंतु ती कितपत उपयुक्त आहे, याविषयी शंका निर्माण व्हावी इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

                                                                                                                                                  कलंदर

Back to top button