चक्रीवादळांच्या तडाख्याचे आव्हान  | पुढारी

चक्रीवादळांच्या तडाख्याचे आव्हान 

के. जे. रमेश, हवामानतज्ज्ञ

मिचाँग चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील काही शहरांना पावसाचा आणि वादळाचा तडाखा बसला. तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून 80 ते 100 किलोमीटर अंतरावर मिचाँग चक्रीवादळ सक्रिय असताना त्याचा व्यापक परिणाम दक्षिण भारतात जाणवू लागला. एवढेच नाही, तर चारशे किलोमीटरवरील बंगळूर शहरातदेखील थंड वारे वाहू लागले. 3 डिसेंबर रोजी चेन्नईला पावसाने झोडपून काढले, तर बंगळूर येथे 3 आणि 4 डिसेंबर रोजी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.

प्रत्यक्षात पावसाळा ओसरल्यानंतरच्या हवामानात म्हणजेच पोस्ट मान्सूनमुळे बंगालच्या खाडीत चक्रीवादळाचे सावट नेहमीच दिसून आले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात त्याची तीव्रता अधिक राहते आणि डिसेंबरमध्ये कमी; परंतु आता डिसेंबर महिन्यातही त्याचा प्रभाव जाणवत आहे आणि त्यामागचे कारण म्हणजे समुद्र उष्ण होणे. हवामान बदलामुळे वातावरणाप्रमाणेच समुद्राचे तापमान वाढत आहे, त्यामुळे कधी कधी चक्रीवादळ येते. कमी दाबाच्या पट्ट्यातून तयार झालेले चक्रीवादळ हे समुद्रातून निर्माण होणार्‍या ऊर्जेने अधिक नुकसानकारक बनते. यंदा एक महिन्यापासून बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र कायमच राहिले आहे. ‘अल निनो’चा प्रभाव असलेल्या वर्षात ईशान्य मान्सूनमध्ये असमतोलपणा राहील, असे बोलले जात होते. मिचाँग चक्रीवादळ हा त्याचाच एक परिणाम होय. तामिळनाडूत केवळ चेन्नईच्या भागात 1 ते 4 डिसेंबरदरम्यान अनेक ठिकाणी 50 ते 60 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडला, जो तुलनेने अधिक होता.

या चक्रीवादळामुळे मच्छीमारांना तसेच दक्षिणेतील शेतकर्‍यांचेही बरेच नुकसान झाले आहे. सध्या खरीप पिकाच्या काढणीचा काळ आहे. शेतातील धान शेवटच्या एक-दोन आठवड्यांसाठी वाळविण्यासाठी ठेवण्यात येते; परंतु या चक्रीवादळामुळे पिके उन्मळून पडली. गोदावरी, कावेरी, कृष्णा, नेल्लोरसारख्या आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीचा भाग हा भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे; परंतु शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे. याप्रमाणे नारळ पपई, केळी, भाजीपाला, फूलशेतीचीही हानी झाल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने कृष्णा, गोदावरी जिल्ह्यात या पिकांचे बरेच नुकसान झाले आहे.आता तेलंगणातील शेतकर्‍यांनाही चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाचा फटका बसला आहे.

अशा चक्रीवादळांपासून संरक्षण करता येऊ शकेल का? अर्थात, प्रारंभी आपल्याला हवामान बदलाचा सामना करावा लागेल. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम कमी करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. कार्बन उत्सर्जनाचे सर्व स्तरांवर व्यवस्थापन करावे लागेल; मात्र काही प्रयत्न लगेच सुरू करावे लागतील. चक्रीवादळाची पूर्वसूचना देणे म्हणजे सायक्लोजेनेसिस. हे वेळेवर जारी करण्याबराबेरच सर्व भागापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. साधारणपणे अशा प्रकारची पूर्वसूचना आठवड्यातून एकदा दिली जाते; परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात महिन्यात किमान दहा दिवस अगोदर पूर्वसचूना मिळाली, तर शेतकर्‍यांना उभे पीक कापणी करण्याचे किंवा त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अवधी मिळू शकतो.

यासाठी कृषी विभाग आणि हवामान विभागाच्या समन्वयातून एक व्यवस्था तयार करायला हवी. म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनाप्रमाणेच ही व्यवस्था असणे अपेक्षित आहे. या काळात ज्याप्रमाणे नागरिकांना सूचना दिल्या जातात, त्याचप्रमाणे अलर्ट जारी करणे आवश्यक आहे. या आधारे ज्या भागात चक्रीवादळ किंवा पावसाचा फटका बसणार आहे, अशा भागातील नागरिकांना, जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास मदत मिळू शकते. बाधित भागातदेखील निवारागृह बांधायला हवीत. प्रत्यक्षात किनारपट्टीवरील भागात मच्छीमार राहणे हेदेखील एक प्रकारचा नाइलाज असतो. गावात पक्के घर असतानाही ते किनारपट्टीच्या भागातच कच्च्या घरात राहतात. चक्रीवादळाची सूचना मिळताच त्यांना निवारागृहात पाठविल्यास आणि ते निवारागृहे चक्रीवादळांपासून संरक्षण करणारे असतील, तर मनुष्यहानी कमी करता येऊ शकते. म्हणूनच वेळेत उपाय करणे काळाची गरज आहे.

Back to top button