तारुण्याचे रहस्य | पुढारी

तारुण्याचे रहस्य

देविदास लांजेवार

जे कष्ट करू शकत नाहीत, ज्यांच्यामध्ये कौशल्य नसते ते स्पर्धा करू शकत नाहीत. म्हणूनच जे स्पर्धा करू शकत नाहीत ते यशस्वी लोकांचा केवळ द्वेष करतात. त्यासाठी त्यांना नामोहरम करण्यासाठी ते साम-दाम-भेदाचा वापर करतात. अशा कपट-कारस्थानांनी त्यांना कदाचित यश मिळत असेलही; पण ते क्षणभंगुर असते. खाजवल्याने मिळणार्‍या आनंदाएवढेच ते क्षणभंगुर असते कारण असे यश शाश्वत नसते.

स्टॅन्डर्ड मोटार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री डीक यांनी एकदा आपल्या कंपनीतील कामगाराला विचारले, “तुझ्या कामात तू नेहमी उत्साही असतोस, याचे कारण मला सांगू शकशील?” त्यावर तो म्हणाला, “साहेब, थेट बोलतो याबद्दल माफी असावी; पण एक दिवस मला या तुमच्या खुर्चीवर बसण्याचे माझे ध्येय आहे.” आणि खरोखरच एक दिवस हा तरुण भविष्यकाळात कंपनीचा संचालक बनला.

उत्साह म्हणजे तारुण्य, तर निरुत्साह म्हणजे म्हातारपण. उत्साह हा वयावर अवलंबून नसतो. काही निरुत्साही तरुण अकाली म्हातारे झालेले दिसतात. कमालीची नकारात्मकता त्यांच्यात ठासून भरलेली असते. तर वयाच्या सत्तरीतही काही म्हातारे केवळ उत्साही वृत्तीमुळे तरणेबांड दिसतात. भल्या पहाटे उठून प्रार्थना करणारे महात्मा गांधी हे एक त्याचे उत्तम उदाहरण. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर अमिताभ बच्चन यांचे. त्यांना वयाचे बंधन नाही. भूमिका कोणतीही असू दे, त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी बिग बी अपार उत्साहाने प्रचंड मेहनत घेतात आणि व्यक्तिरेखा जिवंत करतात. म्हणूनच ते महानायक ठरले आहेत.

संबंधित बातम्या

यशस्वी-अयशस्वी व्यक्तींमध्ये महत्त्वाचा फरक एकच असतो. अयशस्वी लोक निरुत्साही असतात. उत्साह कार्याचा प्राण आहे. उत्साह नसेल तर आपल्या सर्व शारीरिक, मानसिक शक्ती शिथिल बनतात. उदंड उत्साहाच्या या बळावरच कोलबंसने अमेरिकेचा शोध लावला. उत्साह माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. उत्साह मनुष्यातील सुप्त सामर्थ्याला कार्यरत करतो. त्यामुळेच मानवाने चंद्रावर ठेवलेले छोटेसे पाऊल मानवजातीच्या प्रगतीचे महान पाऊल ठरले.

तारुण्यातील उत्साह दारू, गुटखा, सिगारेट, चित्रपट, फॅशन या अनाठायी गोष्टींवर खर्च केला जातो. म्हणून उत्साहाला विधायक वळण लावले पाहिजे. उत्साहाच्या भरात आपल्याकडून चुका होतील; पण जो चुकतो तोच शिकतो. अनुभव हा एक शिक्षक आहे. मात्र, अनुभव हा एक असा शिक्षक आहे, जो आधी कठीण परीक्षा घेतो आणि नंतर ज्ञान देतो. तेलसम्राट धनाढ्य रॉकफेलर यांनी जे नाव कमावले ते उत्साह, अनुभव आणि चिकाटीच्या बळावरच. उत्साही व्यक्ती एकापाठोपाठ एक ध्येय स्वत:पुढे ठेवतात. स्वत:वर व इतरांवरही विश्वास ठेवतात. नैराश्य त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही. आपले यश आणि अपयशापासून ते शिकत असतात. उत्साहाने मन लावून काम करण्यात किंवा अंगावर पडले म्हणून ते करण्यात जय वा पराजयाएवढेच अंतर ते समजतात. उत्साह अशक्य गोष्ट शक्य करून
दाखवतो.

उत्साहमूर्ती झाल्याशिवाय त्यागमूर्ती आणि ध्येयमूर्ती कसे होता येईल? मांजराला ज्याप्रमाणे अंधारात दिसते त्याचप्रमाणे उत्साहाची द़ृष्टी प्राप्त असलेल्यांना भविष्याच्या अंधारातही दिसू लागते. ज्याला दुसर्‍याची प्रगती सहन होत नाही, त्याच्यात उत्साह नसतो. म्हणूनच तो दुसर्‍याचा द्वेष करतो. उत्साहाच्या भांडवलावर उभारलेला धंदा; मग तो कोणताही असू दे, तो यशस्वी होतो.

Back to top button