भरारी – एक व्यक्ती : २८ सुवर्णपदके, २० पदव्या, ४२ विद्यापीठं | पुढारी

भरारी - एक व्यक्ती : २८ सुवर्णपदके, २० पदव्या, ४२ विद्यापीठं

देविदास लांजेवार

ज्यांचा जन्म 2004 नंतर झाला आणि आयएएस-आयपीएस परीक्षा देणारे जे तरुण-तरुणी 19-20 वर्षांचे आहेत, त्यांना डॉ. श्रीकांत जिचकार हे नाव कदाचित माहीत नसावे. परंतु, 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात अचाट बुद्धिमत्ता लाभलेला एक माणूस विदर्भातील काटोल तालुक्यात जन्माला आला. एकाचवेळी शिक्षण, राजकारण, धर्मशास्त्रात पारंगत झाला आणि अभिजात संस्कृत भाषेत त्याने पांडित्यही मिळवले. एका व्यक्तीला एक ध्येय साध्य करण्यासाठी अनेक वर्षे खर्ची घालावी लागतात. आयुष्यात एकदा आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्यासाठी अपार कष्ट उपसावे लागतात, कित्येक वर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तेव्हा कुठे यश हाती लागते.

महाराष्ट्रात कुठेही संस्कृत विषयावर व्याख्यान असल्यास डॉ. श्रीकांत जिचकार एका संस्कृत सुभाषिताने व्याख्यानाची सुरुवात करीत. ‘विदर्भ विषय: सरस्वती जन्मभु।’ विदर्भ ही सरस्वतीची जन्मभूमी आहे, असा या सुभाषिताचा अर्थ. संस्कृत ही अभिजात भाषा जनसामान्यांची भाषा व्हावी, यासाठी डॉ. जिचकार यांनी रामटेकमध्ये देशातील एकमेव कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली. देशभरातील विद्यार्थी या विद्यापीठात संस्कृत शिकत आहेत. डॉ. जिचकार यांनी 49 वर्षांच्या अल्प आयुष्यात त्यांची 30 ध्येये पूर्ण केली होती.

एकच माणूस डॉक्टर, वकील, आयएएस, आयपीएस अन् कीर्तनकारही कसा बनू शकतो, हा प्रश्न कमालीची उत्सुकता निर्माण करणारा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आभासी दुनियेतील ही व्यक्ती असावी, असा भास कुणालाही होऊ शकतो. परंतु, डॉ. जिचकार हा माणूस खराखुरा आहे, त्याची बुद्धिमत्ताही अस्सल जन्मजात, नैसर्गिक अन् त्याने संपादन केलेल्या 20 पदव्या, 28 सुवर्णपदके खरीखुरी आणि अस्सल अशीच आहेत. अशा सर्वज्ञानी, अष्टावधानी जिचकारांना अवघा महाराष्ट्र ज्ञानयोगी म्हणून ओळखत असे.

डॉ. जिचकार हा एक असा माणूस होता जो एमबीबीएस, एमडी डॉक्टर होता, तो एलएलबी, एलएलएम झालेला वकीलही होता. तो आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. ‘नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी’ अस म्हणत नाचणारा तो कीर्तनकारही होता.
आयएएस असो वा आयपीएस, एम. ए. असो वा डी.लिट. देशातील बहुतांश सर्वच पदव्या संपादन करण्याचा विक्रम डॉ. जिचकार यांनी नावावर केला आहे. जिचकारांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्ये डीबीएम, एमबीए, जर्नालिझम, वैद्यकीय आणि विधी क्षेत्रातील एमडी, एलएलएम या पदव्यांचा समावेश आहे.

1973 ते 1990 या कालावधीत जिचकार यांनी 42 विद्यापीठांच्या परीक्षा दिल्या. त्यांनी 10 विषयांत एम. ए. केले होते. यात लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व, मानसशास्त्र, मानव वंशशास्त्रचा समावेश आहे. या सर्व विषयांत त्यांनी प्रथम श्रेणीत प्रावीण्य मिळवले आहे. या विषयांत त्यांना 28 सुवर्ण पदके मिळाली होती. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये डॉ. जिचकार यांच्या नावाची नोंद भारतातील सर्वाधिक पदव्या मिळविणारे व्यक्ती अशी करण्यात आली आहे. जगातील 10 विद्वान आणि सर्वाधिक पदव्या संपादन करणार्‍यांमध्ये त्यांची गणना होते. महाभारत आणि रामायणातील वचने त्यांना मुखोद्गत होती.

52 हजारांहून अधिक पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय त्यांच्याकडे होते. राजकारण असो, अर्थशास्त्र असो वा विदर्भाचा अनुशेष! कोणत्याही विषयावरील पुस्तकाच्या पृष्ठांवर जिचकारांनी नुसती नजर फिरवली, तरी त्यात काय लिहिलेय हे ते अचूकपणे सांगत, एवढे अचाट बुद्धिसामर्थ्य त्यांच्या ठायी होते. 1980 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वांत तरुण आमदार म्हणून ते विधानसभेवर गेले. त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेतही ते सदस्य होते. 1992-1998 या कालावधीत ते राज्यसभेत निवडून गेले. याच काळात केंद्रीय राज्यमंत्री असताना त्यांनी सादर केलेला झिरो बजेट अर्थसंकल्प अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. यावेळी 14 पोर्टफोलिओंसह ते शक्तिशाली मंत्री होते. शिक्षणक्षेत्रातील अशा या महामेरूची अखेर 2004 मध्ये कोंढाळीवरून नागपूरला परत येत असताना कार-बस अपघातात झाली. विसाव्या शतकातील हा ज्ञानयोगी 21 व्या शतकाने अकाली हिरावून घेतला.

Back to top button