आता फायनलची तयारी..! | पुढारी

आता फायनलची तयारी..!

काय म्हणतोस मित्रा, कसा आहेस? बर्‍याच दिवसात आला नाहीस? कशात बिझी होतास?
अरे विशेष असं काही नाही. आधी क्रिकेटचे म्यॅचेस संपले, त्यानंतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली. निकालाच्या दिवशी टी.व्ही.समोर बसून होतो. आपल्याला काय? मॅच असो की इलेक्शन रिझल्ट असो, आपण आपले टी.व्ही.समोर बसून काय चालले आहे, ते समजून घ्यायचे. आता या इलेक्शनचे पाहा ना, काही लोकांनी 2024 च्या लोकसभा इलेक्शनची सेमीफायनल, असे याला नाव दिले. तसे तर प्रत्येक इलेक्शन वेगळे असते. विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात, लोकसभेचे वेगळे असतात. सेमीफायनल म्हटल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती, त्यात पंतप्रधान मोदींनी बाजी मारली, असे म्हणावे लागेल. थोडक्यात सांगायचे, तर 2024 ला पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांचा रस्ता मोकळा झाला आहे.

अरे, असे कसे म्हणता येईल? विधानसभा निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर आणि आपला आमदार कोण आहे त्या चेहर्‍यावर लढवल्या जातात. याला लोकसभेची सेमीफायनल कसे म्हणता येईल?

हे बघ, या निवडणुकीमध्ये भाजपकडून कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार, असे जाहीर केलेले नव्हते. त्यामुळे त्या पक्षाचा एकच चेहरा होता आणि तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. मला या माणसाची कमाल वाटते. एकाचवेळी हा माणूस अर्थव्यवस्था सुधारण्याचे काम करतो, त्याचबरोबर इतर देशांशी संबंध मैत्रीचे ठेवून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढवतो, त्याचबरोबर देशात काय चालू आहे, त्यावरही त्यांचे बारीक लक्ष असते. सलग नऊ-नऊ वर्षे एकही सुट्टी न घेता दिवसाचे 18 ते 20 तास काम करणारा हा नेता फार वेगळा आहे, हे भारतीय जनमानसाने ओळखले आहे.

संबंधित बातम्या

नक्कीच. इतर पक्षांनी कितीही रेवड्या उधळल्या, तरी मोदींनी दिलेला एकच शब्द आणि तो म्हणजे ‘ये मोदी की गॅरंटी है,’ यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल पार बदलले. राजकीय विश्लेषक पालथे पडले. सर्वप्रकारच्या सर्वेक्षणाला चकवा देत तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजपने सत्ता आणली. या निवडणुकांना आगामी लोकसभेची सेमीफायनल असे म्हणण्याचे दुसरे कारण म्हणजे, ज्या तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता आणली आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश आणि एकंदरीतच उत्तरेतील जवळपास सर्व राज्यांमध्ये आता भाजपची सत्ता आलेली आहे. यामुळे या निवडणुकांना येत्या लोकसभेचे सेमीफायनल, असे म्हटले गेले.

तसे असेल, तर या निवडणुका जिंकून सेमीफायनल जिंकलेला भाजप आता फायनल खेळण्यासाठी तयार झाला आहे आणि त्याच वेळेला विरोधी आघाडी लढण्याचे नैतिक धैर्य गमावून बसली आहे, अशी चिन्हे आहेत. अशाप्रकारे देशातील जनतेच्या मनामध्ये आपल्या प्रामाणिक कामामुळे घर करून बसलेला मोदींसारखा अन्य नेता गेल्या कित्येक वर्षांत झालेला नाही. अर्थव्यवस्था मजबूत होत असताना, त्याचा फायदा प्रत्येक घटकाला होत असतो आणि असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झालेली जनता या नेत्याला आशीर्वाद देत असते, हेच या निवडणुकांमधून दिसून आले आहे. राजस्थान मतदारांनी आपली परंपरा पाळत सत्ताधार्‍यांना पायउतार करत भाजपला संधी दिली, तर मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार येणार ते स्पष्ट बहुमतात, अशा अटकळी निवडणूक निकालापूर्वी लावल्या होत्या; पण त्या फोल ठरत पुन्हा मतदारांनी भाजपच्या झोळीत मतांची टोपली टाकली. आता तरी इंडिया आघाडीला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, मित्रा! कारण 2024 ची फायनल जिंकण्यासाठी काही तरी करावे लागेल!

Back to top button