नवे प्रकाशपर्व | पुढारी

नवे प्रकाशपर्व

सम्राट विक्रमादित्याने शकांवरील विजयानंतर विक्रम संवत ही दिनदर्शिका सुरू केली. त्यानुसार आपल्याकडे विक्रम संवत्सराचा प्रारंभ कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच दिवाळी पाडव्याला होतो. दिवाळीतील दिव्यांच्या झगमगाटाने अवघा आसमंत उजळून निघतो आणि या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मनामनातील अंधकार दूर होऊन उजेडाची वाट निर्माण होते. दिवाळी म्हणजे अंधकार दूर सारून प्रकाशाकडे घेऊन जाणारा, मनावरची काजळी झटकून टाकणारा उजेडाचा उत्सव असतो. मोठ्या आर्थिक उलाढालीचा सण असतो. रस्त्यावरील फेरीवाले, हंगामी विक्रेत्यांपासून ते मोठ्या व्यापार्‍यांपर्यंत विविध घटकांना आर्थिक दिलासा देणारा हा सण असतो. दिवाळीच्या आधी गणेशोत्सव आणि दसर्‍याचा सणही मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

गणपतीपाठोपाठ येणारा दसरा शेतकरी वर्गाच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असतो. पावसाळा संपलेला असतो. पिकांची कापणी होऊन धान्य घरात आले असते. समृद्धी ओसंडून वाहत असते. अशा वातावरणात दसरा साजरा केला जातो. पावसाळा संपून थंडीचे आल्हाददायक पर्व सुरू झालेले असते आणि सगळीकडे उत्साह भरून वाहत असतो. अशा वातावरणात दिवाळीचे आगमन होते आणि बघता बघता घरातले आणि बाहेरचेही वातावरण बदलून जाते. गणपतीपासून सुरू झालेला धार्मिक माहौल दसरा संपेपर्यंत कायम राहतो. दिवाळीला मात्र हा धार्मिक ज्वर ओसरून निखळ सणाचा आनंद भरभरून वाहत असतो.

दिवाळीच्या याच वैशिष्ट्यामुळे दिवाळीला सणांचा राजा म्हटले जाते. धार्मिक प्रथा-परंपरांच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मीय लोक दिवाळीच्या उत्साहात सामील होत असतात. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. पारंपरिकरीत्या शुभकार्यासाठीचा उत्तम दिवस म्हणून त्याचे महत्त्व असते. बहीण-भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणून भाऊबीजेचे महत्त्व आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, गुजरात, गोवा आदी राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्येही भाईतिहार म्हणून या दिवशी बहीण-भावांच्या नात्यांचा उत्सव साजरा केला जातो. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक व्यवधानांमुळे व्यस्त असलेले कुटुंबीय यानिमित्ताने एकत्र येत असतात. दिवाळीच्या उत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. सर्वसामान्य माणसांसाठी आणि व्यापारी वर्गासाठीही या दिवसाचे विशेष महत्त्व असते. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधत असते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील आणि गुणवंत लोक असतात, अशा घरी वास्तव्य करायला देवी लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या सायंकाळी केली जाते, म्हणून हा लक्ष्मीपूजनाचा दिवस. व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. यादिवशी वहीपूजन केले जाते. त्यामुळे दिवाळीच्या काळातील हा दिवस व्यापार्‍यांचा म्हणून ओळखला जातो. व्यापारीही तो जल्लोषात साजरा करतात आणि पूजेनंतर फटाक्यांची आतषबाजी करीत असतात.

आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि बळीराजाला या कृषी परंपरेचा अग्रदूत मानले जाते. बहुजनांच्या संस्कृतीवर आक्रमण करून ती पाताळात गाडण्याचे प्रयत्न म्हणजेच नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले. त्याची प्रातिनिधिक कथा म्हणून बळीराजाची कथा सांगितली जाते. आजही शेतकर्‍याला बळीराजा असे संबोधले जाते, यावरून त्याचे कृषी संस्कृतीमधील महत्त्व लक्षात येते. शेतकर्‍यांची काळजी घेणार्‍या या राजाचे राज्य पुन्हा यावे यासाठी ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे आजही म्हटले जाते. याचा सरळ साधा अर्थ असतो की, शेतकर्‍यांची काळजी घेणारे राज्यकर्ते सत्तेवर यावेत.

आजवर महाराष्ट्राच्या सत्तेत आलेल्यांपैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक शेतकर्‍यांचीच मुले होती. अलीकडच्या काळात प्रशासनामध्ये मंत्रालयातील कारकुनांपासून सचिवांपर्यंत आणि तहसीलदारापासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत वेगवेगळ्या पदांवर शेतकर्‍यांचीच मुले स्थानापन्न होतात. अभिमान वाटावा अशी ही गोष्ट असली तरी शेतकर्‍यांची मुले सत्तेत आणि प्रशासनात गेल्यामुळे प्रत्यक्षात शेतकर्‍यांना त्याचा काय फायदा झाला, हा संशोधनाचा विषय ठरावा. शेतकर्‍यांची पिळवणूक कोणत्याही टप्प्यावर थांबलेली दिसत नाही. शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चाललेले दिसतात आणि त्यांना कुणी वालीच उरलेला नाही, असे चित्र समोर येते.

राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी शेतकरी हा त्यांच्यासाठी राजकारणाचा विषय असतो. परंतु निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात आणि शेतकरी मागे ढकलला जातो. कर्जमाफीच्या योजनांचे निकष इतके कठोर ठेवले जातात की, गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. दिवाळीचा उत्साह शहरांमधून, बाजारपेठांमध्ये दिसत असला तरी खेडोपाडी चिंतेचे वातावरण आहे. यंदा पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिली. एरव्ही प्रारंभीच्या काळात ओढ देणारा पाऊस उत्तरार्धात मुबलक कोसळून भरपाई करीत असतो. धरणे भरून टाकतो, उन्हाळ्यातील पाण्याच्या प्रश्नाची चिंता त्यामुळे मिटत असते. परंतु यंदा कोकणाचा अपवाद वगळता राज्याच्या सर्व भागांमध्ये पाऊस तुलनेने कमी पडला आहे. मराठवाड्यात तर खूपच बिकट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. नजीकच्या काळात दुष्काळाची चाहूल लागली असून पिण्याच्या पाण्याबरोबर पिकांसाठी पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे. दिवाळीत बळीचे राज्य येण्याची प्रार्थना करताना बळीराजासमोरील या संकटांची जाणीवही ठेवायला हवी. दीपोत्सवामध्ये अंगणात दिवा लावत असताना मनातील जाणिवेचा एक दिवा तेवत ठेवायला हवा. त्यातून दिवाळीच्या प्रकाशपर्वात आपले माणूसपण अधिक उजळून निघेल!

Back to top button