आंतरराष्‍ट्रीय : चीनमध्ये गुंतवणुकीला ओहोटी! | पुढारी

आंतरराष्‍ट्रीय : चीनमध्ये गुंतवणुकीला ओहोटी!

कमलेश गिरी, आंतरराष्ट्रीय अभ्यासक

आधुनिक जागतिक अर्थकारणामध्ये चीनच्या आर्थिक विकासाच्या प्रतिमानाचा बराच गवगवा झाला. भारताआधी 20 वर्षे जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू करून, विदेशी गुंतवणूकदारांना पायघड्या घालून, त्या आधारे पायाभूत सुविधांच्या विकासाचे जाळे निर्माण करून चीनने औद्योगिक विकासामध्ये घेतलेली झेप उल्लेखनीय होती. यात शंकाच नाही. या आर्थिक शक्तीच्या जोरावर चीनने आपली विस्तारवादी भूमिका आक्रमक बनवल्याचे दिसून आले; पण कोरोनापश्चात चिनी अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे.

चीनमधील आर्थिक संकट आणखी बराच काळ राहणार, असे संकेत सध्या स्पष्टपणाने मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या आर्थिक प्रारूपाचा पाया असणारी विदेशी गुंतवणूक चीनमधून वेगाने माघारी जाऊ लागली आहे. ऑगस्ट महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी चीनच्या शेअर बाजारातून सुमारे 12 अब्ज डॉलरच्या शेअरची विक्री केल्याचे सांगितले जात आहे. काय आहेत याची कारणे? चीनची व्यापारी तूट वाढत चालली आहे. निर्यातदेखील निम्म्याने घटली आहे. चीनमधून श्रीमंत लोक हे आपले पैसे घेऊन कायमस्वरूपी देश सोडून जात आहेत. चीनमधील कारखान्यात काम करणारे मजूरदेखील व्हिएतनामला निघून जात आहेत. ते दक्षिण चीनच्या मार्गाने स्थलांतर करत आहेत आणि व्हिएतनाममध्येच राहण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे चीनमध्ये प्रत्येक क्षेत्रात घसरणीचा ट्रेंड पाहावयास मिळत आहे. यादरम्यान चीनबाबत आणखी एक निराशाजनक बातमी म्हणजे यावर्षी ऑगस्ट महिन्यात चीनमधून मोठ्या प्रमाणात डॉलर बाहेर पाठविण्यात आल्याचे वृत्त!

50 अब्ज डॉलर केवळ एका महिन्यातच चीनमधून बाहेर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाब चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारी आहे. अर्थात, या गोष्टी रोखण्यासाठी चीन सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत. या आधारावर चिनी चलन युआनचे अवमूल्यन रोखणे शक्य होईल; मात्र अत्यंत वेगाने देशातून पैसे बाहेर पाठविले जात आहेत. सध्याची स्थिती पाहता चीनमधून बाहेर गेलेला पैसा इतक्यात परत येईल, असे वाटत नाही. चीनचा एकमेव पक्ष सीपीसीचे अधिकृत आकडेदेखील हीच स्थिती सांगत आहे. ऑगस्ट महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी चीनच्या शेअर बाजारातून सुमारे 12 अब्ज डॉलरच्या शेअरची विक्री केल्याचे सांगितले जात आहे. याचा थेट अर्थ असा की, परकी गुंतवणूकदार चीनमधून आपला पैसा काढून बाहेर जात आहेत. या कारणामुळे गेल्या चार वर्षांत परकीय गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले चिनी बाँड नीचांकी पातळीवर आहेत.

चीनमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक तूट ही 16.8 अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. चीनच्या अंतर्गत गुंतवणूक क्षेत्राने 2016 नंतर प्रथमच खराब कामगिरी नोंदविली आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या माहितीनुसार चीनमध्ये थेट परकी गुंतवणूक ही 2022 च्या मधल्या काळापासूनच नकारात्मक पातळीवर गेली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे, चीनमध्ये तीन वर्षांपर्यंत असलेला कोरोनाचा काळ आणि त्यानंतर चीन सरकारने खासगी कंपन्यांबाबत घेतलेली कडक भूमिका! परिणामी, परकी गुंतवणूकदारांना चीनमध्ये बराच आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. याशिवाय यावर्षी ऑगस्ट महिन्यात चीनच्या कॅपिटल खात्यातून 50 अब्ज डॉलर बाहेर गेले. ही मोठी रक्कम असून डिसेंबर 2015 पासून प्रथमच एवढी रक्कम बाहेर जात असल्याचे पाहावयास मिळाले आहे. आतापर्यंत कॅपिटल इन फ्लो म्हणजे ठोस चलन चीनमध्ये यायचे; मात्र आता चीनच्या कॅपिटल खात्यातून पैसे बाहेर जात असून तेही मोठ्या संख्येने!

ऑगस्ट 2023 मध्ये प्रकाशित सीपीसीच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्स्चेंजने म्हटले की, यंदा चीनकडे परकी चलन साठा हा 3 खर्व 16 अब्ज अमेरिकी डॉलर राहिलेला आहे. तो यावर्षीच्या जुलैमधील परकी चलन साठ्याच्या तुलनेत 44.2 अब्ज डॉलर कमी आहे. हे प्रमाण 1.38 टक्के एवढे आहे. चीनमधून वेगाने कमी होणारा चलनसाठा हा परकी माध्यमांच्या नजरेत आला नसेल, तर नवलच. त्यानंतर संपूर्ण जगभरात एकच बातमी पसरली. चीनमधून सध्याच्या काळात मोठा परकी चलन साठा देशाबाहेर जात असून या समस्येचा चीन सामना करत आहे, असे वृत्त सर्वत्र पसरले. या परिस्थितीमुळे चीनचे चलन रनमिनबी म्हणजेच युआनचे अवमूल्यन होण्यासाठी दबाव वाढला आहे. परिणामी, युआनचे महत्त्व केवळ परदेशातच नाही, तर देशातदेखील वेगाने कमी होईल. त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. ‘ब्लूमबर्ग’मध्ये प्रकाशित 19 सप्टेंबरच्या बातमीनुसार, हा चिंताजनक ट्रेंड यंदा चीनच्या अधिकृत आकडेवारीतदेखील दिसत आहे.

चीनच्या आर्थिक बाजारातून परकी गुंतवणूक बाहेर जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे, आतापर्यंत जगात पुरवठा साखळीचे असणारे चित्र बदलत आहे. म्हणजे चीनमध्ये विविध क्षेत्रांत सक्रिय असलेल्या परकी कंपन्या बाहेर जाण्यामागचे कारण म्हणजे पुरवठा साखळी ही एका देशापुरतीच मर्यादित ठेवू इच्छित नाही. एकापरीने ते आपली गुंतवणूक ही अन्य देशांतही करू इच्छित आहे. भविष्यात कोरोनासारखी लाट आली, तर आपल्या कामावर परिणाम होणार नाही, यासाठी त्या खबरदारी घेत आहेत. चीनवरची अवलंबिता कमी करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनातून चीन लवकरच पूर्वपदावर येईल, असे वाटत होते; मात्र असे घडले नाही.

तेथील काही सेक्टर अजूनही कोरोना साथीचा सामना करत आहेत. त्याचबरोबर सेवा उद्योग आणि व्यापार उद्योगदेखील रुळावर आलेले नाहीत. त्याचा परिणाम चीनच्या चलनावर होत आहे. चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात 50 अब्ज डॉलर चीनमधून बाहेर गेले आहे. त्यापैकी 29 अब्ज डॉलर हे केवळ शेअर बाजारातील होते. चीनमध्ये अंतर्गत चलनसाठा वाढत असला, तरी त्या तुलनेत अधिक प्रमाणात चलन बाहेर जात आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, चीनमधून मोठ्या प्रमाणात चलन बाहेर जाण्याचे कारण म्हणजे, चीनमधील सुस्त अर्थव्यवस्था. शिवाय चीन आणि अमेरिकेच्या व्याजदरात बरेच अंतर आहे. त्यामुळे चीनचे चलन युआन हे गेल्या 16 वर्षांतील नीचांकी विनिमय पातळीवर आले आहे.

Back to top button