सी-295 विमाने हवाई दलासाठी गेमचेंजर! | पुढारी

सी-295 विमाने हवाई दलासाठी गेमचेंजर!

- हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीने अलीकडेच भारतीय हवाई दलाकडे (आयएएफ) पहिले ‘सी- 295’ हे वाहतूक विमान सुपूर्द केले. भारतीय हवाई दलाचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने एअरबस कंपनीबरोबर दोन वर्षांपूर्वी झालेल्या 21 हजार 935 कोटी रुपयांच्या करारानुसार भारताला एकूण 56 ‘सी-295’ विमाने मिळणार आहेत. ही विमाने अत्यंत आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

सध्याच्या काळातील एकंदर बदलत्या जागतिक विश्वरचनेचा विचार करून आणि शेजारच्या शत्रूंची एकंदरीत धोरणे विचारात घेऊन भारतीय लष्कर सीमेवरील दोन्ही टोकांची ताकद वाढवण्याचे काम करत आहे. सागरी, जमीन आणि हवाई या तिन्ही सैन्यदलांना नवीन तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज केले जात आहे. एकीकडे एलएसी आणि एलओसीवर वेगाने रस्ते बांधले जात असताना दुसरीकडे भारतीय लष्कराच्या जवानांची एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक करता यावी, यासाठी नव्या विमानांची निर्मिती आणि आयात करण्यात येत आहे. एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीने अलीकडेच ‘सी-295’ हे मालवाहू विमान भारतीय हवाई दलाला सुपूर्द केले. या कंपनीबरोबर झालेल्या करारानुसार एकूण 56 ‘सी-295’ विमाने भारताला मिळण्यास सुरुवात झाली आहे.

हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी एअरबसच्या स्पेनमधील सेव्हिली येथील निर्मिती केंद्रावर जाऊन हे विमान स्वीकारले. भारतीय हवाई दल अधिक सुसज्ज करण्यासाठी एअरबस कंपनीबरोबर दोन वर्षांपूर्वी झालेल्या 21 हजार 935 कोटी रुपयांच्या करारानुसार भारताला एकूण 56 ‘सी-295’ विमाने मिळणार आहेत. पुढील दोन वर्षांत त्यापैकी 16 विमाने तयार अवस्थेत मिळणार आहेत. त्यानंतरची 40 विमाने ही टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स (टीएएसएल) कंपनीद्वारे भारतात उत्पादित केली जाणार आहेत. टीएएसएल आणि एअरबस यांच्यात झालेल्या औद्योगिक भागीदारीनुसार हे उत्पादन केले जाणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोदा येथे ‘सी-295’ विमानांची निर्मिती करणार्‍या केंद्राचे भूमिपूजन केले होते. भारतात प्रथमच एक खासगी कंपनी भारतीय हवाई दलासाठी विमान तयार करणार आहे. सुमारे 60 वर्षांपूर्वी हवाई दलाकडील एव्हरो-748 ही मालवाहू विमाने सेवेत दाखल झाली होती. त्यांची जागा ही नवी विमाने घेणार आहेत. भारतासाठी बनविलेल्या पहिल्या ‘सी-295’ विमानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. दुसरे विमानही तयार होण्याच्या टप्प्यावर असून पुढील वर्षी मे महिन्यात ते भारतीय हवाई दलाला मिळू शकेल, असे सांगितले जाते. यासाठी हवाई दलाचे सहा वैमानिक आणि 20 तंत्रज्ञांना सेव्हिली येथे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. बडोदा येथील निर्मिती केंद्रही पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या

‘सी-295’ हे विमान अत्यंत आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘सी-295’ हे एक अद्ययावत वाहतूक विमान मानले जाते. त्यातून 71 सैनिक अथवा 50 पॅराशूटरची वाहतूक युद्ध अथवा आणीबाणीच्या काळात करता येऊ शकते. याशिवाय ज्या ठिकाणी सध्याची अवजड विमाने पोहोचू शकत नाहीत अशा दुर्गम ठिकाणी लष्करी उपकरणे आणि रसद पुरवठा करण्यासाठी याचा वापर केला जातो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पीडित अथवा आजारी नागरिकांना तातडीने हलवण्यासाठीही या विमानांचा उपयोग होऊ शकतो. हे विमान विशेष मोहिमांशिवाय आपत्ती व आणीबाणीच्या स्थितीत सागरीत किनार्‍याच्या भागात गस्त घालू शकते. ‘सी-295’ हे विमान वायुसेनेसाठीच नव्हे, तर देशासाठीही गेमचेंजर ठरणारे आहे. कारण, या विमानांमुळे भारताच्या स्ट्रॅटेजिक एयरलिफ्ट क्षमतेत मोठी सुधारणा होणार आहे. ही बाब देशासाठी एका नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेनकडून 16 विमानांच्या खरेदीनंतर 17 वे विमान भारतातच बनवण्यात येणार आहे. यासाठी टीएएसएलला संपूर्ण एरोस्पेस औद्योगिक यंत्रणा तयार करावी लागेल. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्ली, टेस्टिंग आणि पात्रता ते पुरवठा आणि देखभाल या सर्व गोष्टींचा समावेश आहे. स्पेनमधील एअरबस कारखान्यात विमान बनवण्यासाठी लोक जेवढे तास काम करतात त्यापैकी 96 टक्के काम टाटा भारतात करेल, असे संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते. यामध्ये 13 हजार 400 मोठ्या आकाराचे सुटे भाग, 4 हजार 600 उपघटक आणि सर्व सात प्रमुख घटकांच्या जोडणीचे काम भारतात केले जाईल. एअरबस आणि भारतीय सरकारी अधिकार्‍यांचा विश्वास आहे की, यामुळे भारतीय वैमानिक क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल. या माध्यमातून येत्या दशकात 15 हजार कुशल नोकर्‍या आणि दहा हजार अप्रत्यक्ष नोकर्‍या निर्माण होतील.

‘सी-295’ ची वजनवहन क्षमता 5 ते 10 टन इतकी आहे. हे विमान एकाच वेळी 71 सैनिकांना किंवा 49 पॅराट्रूपर्सना घेऊन जाण्यास सक्षम आहे. 480 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने हे विमान 11 तासांपर्यंतचे उड्डाण करण्यास सक्षम आहे. जलद प्रतिक्रिया, सैनिकांना चटकन उतरता यावे, यासाठी या विमानामध्ये एक रियर रॅप दरवाजाही देण्यात आला आहे. अगदी 2,200 फूट लांबीच्या धावपट्टीवरून ते संचलित करता येते. रणनीतीच्या द़ृष्टीने अनेकदा कमी उंचीवरून उड्डाण मोहीम आखली जाते. अशा मोहिमेत ते 110 नॉटस् इतक्या कमी वेगात मार्गक्रमण करू शकते. वाळवंटी प्रदेशापासून ते समुद्रापर्यंतच्या क्षेत्रात दिवसा व रात्रीच्या मोहिमा ते संचलित करू शकते. त्याच्या आतील भागात या वर्गातील इतर विमानांच्या तुलनेत अधिक प्रशस्त जागा आहे. याखेरीज वैशिष्ट्यपूर्ण पंख्याच्या आकारामुळे इंधन वापरात चार टक्के बचत होते. या 56 विमानांमध्ये एक स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट बसवण्यात येणार आहे. या सूटची निर्मिती भेल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने केली आहे. यामध्ये शॉर्ट टेकऑफ म्हणजेच जलद टेकऑफ आणि लँडिंगच्या क्षमतेसह अविकसित धावपट्ट्यांचा वापर करण्याचे तंत्रज्ञानही असणार आहे. अशा प्रकारच्या धावपट्ट्या प्रामुख्याने लडाख आणि पाकिस्तानलगतच्या सीमेवर आहेत. त्यामुळेच सी-295 हे विमान पाकिस्तान आणि चीनची डोकेदुखी वाढवणारे ठरणार आहे.

Back to top button