देवेगौडांचा नवा घरोबा | पुढारी

देवेगौडांचा नवा घरोबा

भारतीय राजकारणात सतत विभाजन होणारा आणि विभाजनानंतर वेगळे झाल्यानंतर भूमिका बदलत राहणारा परिवार म्हणून जनता परिवाराची ओळख आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) या कर्नाटकपुरत्या दखलपात्र पक्षाने घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सामना करण्यासाठी कर्नाटकमध्ये जनता दल – धर्मनिरपेक्ष (जेडीएस) आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीएसने भाजपसोबत केलेल्या युतीला पक्षाच्या महाराष्ट्र, केरळसह अनेक राज्यांतील कार्यकर्त्यांनी विरोध केला असला तरी त्या विरोधाचा परिणाम होण्याची फारशी शक्यता नाही. मात्र त्यामुळे जेडीएस पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असून या फुटीतून नेमके काय निघते, हे कुतूहलाचे ठरेल.

भारतीय राजकारणाला नाट्यमय आणि निर्णायक वळण देण्यात जनता पक्षाने आजवर अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात विविध पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना करत काँग्रेसची तीस वर्षांची सत्ता उलथवून टाकली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आंदोलनातून जनता पक्षाचा जन्म झाला, त्यावेळी जनता पक्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा जनसंघसुद्धा होता. नंतर जनसंघ स्वतंत्र झाला. पुढे जनता पक्षाच्या समाजवादी परिवाराने भाजपच्या राजकारणाच्या विरोधात भूमिका घेतली.

कर्नाटकात देवेगौडा यांनी यापूर्वीही राज्याच्या पातळीवर भाजपसोबत आघाडी केली होती. परंतु आजच्या काळात भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची आघाडी उभी राहात असताना देवेगौडा यांनी घेतलेला भाजपसोबत जाण्याचा नवा निर्णय बहुचर्चित ठरला आहे. कर्नाटकातील राजकीय परिस्थिती आणि देवेगौडा तसेच त्यांचे पुत्र, माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची भूमिका पाहता जेडीएस भाजपसोबत जाईल, असाच राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेडीएस आणि काँग्रेसने एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. परंतु त्यांचे संबंध फारसे सौहार्दपूर्ण नव्हते. कुमारस्वामी यांचा राजीनामा, काँग्रेस तसेच जेडीएसच्या आमदारांनी पक्षाचे राजीनामे देऊन नव्याने लढविलेल्या निवडणुका, भाजपने राबवलेले ‘मिशन कमळ’ अशा अनेक घटना दरम्यानच्या काळात घडल्या. सर्व तर्‍हेचे प्रयत्न करून भाजपने कर्नाटकची सत्ता हस्तगत केली होती. मात्र संबंध बिघडत गेले ते काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील. कर्नाटकात अलीकडे झालेल्या निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असती आणि जेडीएसकडे निर्णायक भूमिका आली असती तर त्यांनी आपले वजन भाजपच्या पारड्यात टाकले असते.

जनता पक्षाने 1977 च्या निवडणुकीत यश मिळवल्यानंतर त्यांना जेमतेम दोन वर्षे सत्ता टिकवता आली. त्यानंतर जनता पक्षाचे तुकडे पडले. या तुकड्यांची संख्या वाढत गेली आणि वेगवेगळ्या नावांनी किंवा जनता परिवार म्हणून ते एकत्रही होत राहिले. हे एकत्र येणे तात्पुत्या स्वरूपाचेच ठरले. राजीव गांधी यांच्यावर भ—ष्टाचाराचे आरोप करून बाहेर पडल्यानंतर व्ही. पी. सिंह यांनी 1989 मध्ये जनमोर्चाची स्थापना केली. त्यासह चरणसिंग यांच्या नेतृत्वाखालील लोकदल, जगजीवनराम यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (जगजीवनराम) हे पक्ष विलीन करून जनता दलाची स्थापना करण्यात आली.

आज समाजवादी परिवारातील जे पक्ष दिसतात, त्या सगळ्यांची मुळे या जनता पक्षात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडवल्यानंतर भाजपने पाठिंबा काढून घेतला आणि व्ही. पी. सिंह यांचे सरकार पडले. त्यानंतर चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बनले. तेही फार काळ टिकू शकले नाही. 1991 च्या निवडणुकीत जनता दलाचा पराभव झाला. परंतु तो लोकसभेत तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष बनला. 1996 च्या निवडणुकीतही जनता दलाला बर्‍यापैकी यश मिळाले आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल हे दोन पंतप्रधान झाले.

जनता दलाने देशाला चार पंतप्रधान दिले ते या आघाडीच्या अस्थिर राजकारणातूनच! जनता दलात राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेले अनेक नेते असल्यामुळे आणि प्रत्येकाला नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे एका नेत्याच्या आणि एका पक्षाच्या छताखाली ते राहू शकले नाहीत. त्यातूनच मग जॉर्ज फर्नांडिस आणि नितीशकुमार यांचा समता पक्ष, चंद्रशेखर यांचा समाजवादी जनता पक्ष, देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल, लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, बीजू पटनायक यांचा बीजू जनता दल, मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष, शरद यादव यांचा लोकतांत्रिक जनता दल, देवीलाल यांचा इंडियन नॅशनल लोकदल, अजित सिंह यांचा राष्ट्रीय लोकदल, रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी असे अनेक पक्ष निर्माण झाले आणि संबंधित नेत्यांनी आपापल्या राज्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे पक्षही फुटून त्यातून पुन्हा काही नवे पक्ष निर्माण झाले.

देवेगौडा यांच्या जेडीएसची व्याप्ती राष्ट्रीय पातळीवर असली तरी प्रभाव कर्नाटकातच होता. महाराष्ट्रात जनता दलाचे जे अवशेष उरले, त्यांनी जेडीएस म्हणूनच आपली ओळख ठेवली. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, मृणाल गोरे अशी नेतृत्वाची तेजस्वी परंपरा असतानाही पुढच्या पिढीतील नेतृत्वाला ती टिकवता आली नाही. राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा विस्तार होत गेला. पाठोपाठ भाजपने हातपाय पसरले आणि त्यांच्या आक्रमक हिंदुत्वाच्या राजकारणापुढे समाजवादी परिवारातले हे नेते आणि त्यांचा पक्ष निष्प्रभ ठरला. शेतकरी कामगार पक्षाने रायगड, सांगोला असे गड टिकवले, तशीही कामगिरी कुठे जनता दलाला करता आली नाही. त्यामुळे त्यांचे अस्तित्व कागदापुरते मर्यादित राहिले. देवेगौडा यांनी घातलेल्या घावामुळे जनता परिवाराचे आणि त्यांच्या पक्षाचे कर्नाटकातील उरलेसुरले अस्तित्वही धोक्यात आले आहे.

Back to top button