दहशतवादाचे आव्हान | पुढारी

दहशतवादाचे आव्हान

कोणत्याही संघर्षात अंतिम निकाल महत्त्वाचा असतो. काश्मीर खोर्‍यात अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी आठवडाभर चाललेल्या धुमश्चक्रीत, भारतीय सुरक्षा दलांनी पार पाडलेली मोठी कामगिरी सीमेपलीकडील दहशतवादाकडे बोट दाखवतेच. पाकिस्तानच्या कारवाया अखंडितपणे सुरू असल्याचेही ती स्पष्ट करते. अलीकडच्या काळातील सुरक्षा दलाचे हे मोठे यश आहे. दहशतवाद भारतासाठी नवा नाही आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाशी तर भारताची कायमचीच गाठ बांधली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे हैदोस सुरू आहे. भारतासाठी ती मोठी डोकेदुखी ठरत आली आहे. दहशतवादावर नियंत्रण मिळवायचे, तर त्या विरोधात कठोर पावले उचलायला हवीत आणि ती उचलायची असतील, तर काश्मीरमध्ये कोणतेही हितसंबंध नसलेल्या घटकांकडे सत्ता किंवा सत्तेचे नियंत्रण हवे. याच उद्देशाने जम्मू-काश्मीरमधील 370 वे कलम रद्द करण्यात आले आणि काश्मीर खोर्‍यातील नियंत्रण लष्कराकडे देण्यात आले.

लष्कराने दहशतवादावर नियंत्रण मिळवले आणि तसा दावा केंद्र सरकारकडून केला जाऊ लागला. परंतु दहशतवादाची ही कीड सहजासहजी नष्ट होणारी नाही, हे ताज्या घटनेवरून दिसून आले. अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांबरोबर तब्बल आठवडाभर सुरू असलेल्या चकमकीनंतर, सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाचा (एलइटी) कमांडर उजैर खान या दहशतवाद्याचा खातमा करून मोठे यश मिळवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लष्कराने ही कारवाई केली. तीन अधिकारी आणि दोन जवान या कारवाईदरम्यान शहीद झाल्यामुळे सुरक्षा दलाचेही मोठे नुकसान झाले. या हल्ल्याने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या धोक्याचे आव्हान पुन्हा एकदा नजरेस आणून दिले. आजवरच्या चकमकींमधील एक दीर्घकाळ चाललेली चकमक म्हणून ही घटना विशेष महत्त्वाची. अनंतनागमध्ये 13 सप्टेंबरला सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवली जात असताना, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात डीएसपी हुमायून भट, कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौंचक आणि दोन जवान शहीद झाले.

तीन अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य वाढले होते. सुरक्षा दलांसाठी हा मोठा धक्का होताच, जवानांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकताही होती. त्यानुसार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. कोकरनागच्या घनदाट जंगलांमध्ये सुमारे 20 फूट खोल गुहेमध्ये दहशतवादी लपले असल्यामुळे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान सुरक्षा दलांपुढे होते. शोधमोहिमेसाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेण्याची वेळ आली. ठार झालेला उजैर खान हा लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर. त्याच्यासह दहशतवाद्यांविरोधातील या मोहिमेसाठी पॅरा कमांडो आणि सुरक्षा दलांच्या दहा कंपन्यांची मदत घेण्यात आली. कोकरनाग हा डोंगराळ प्रदेश असून, घनदाट जंगलात एका बाजूला सुमारे 70 ते 80 अंशांमध्ये सरळ चढण आणि दुसर्‍या बाजूला खोल दरी, अशी आव्हानात्मक परिस्थिती. उंचावर बसलेले दहशतवादी आणि जवानांना खालून त्यांच्यापर्यंत पोहोचायचे होते, यावरून एकूण प्रतिकूलतेची कल्पना येऊ शकते.

दहशतवाद्यांच्या बंदुकीच्या निशाण्यावर आणि टप्प्यात राहून म्हणजे जिवावर उदार होऊन जवानांनी परिस्थितीचा सामना केला. आपले तीन अधिकारी आणि दोन सहकारी जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी सुरक्षा दलाने जिद्दीने ही मोहीम राबवली. एका अर्थाने हे छोटेसे युद्धच होते आणि प्रमुख दहशतवाद्याचा खातमा करून सुरक्षा दलांनी ते जिंकले. सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार दहशतवाद्यांनी आपली कार्यशैली बदलली असून, अलीकडच्या काळात ते घनदाट जंगलांचा प्रदेश निवडत आहेत. राजौरी पूंछ भागातही अशाच प्रकारची रणनीती पाहावयास मिळाली होती. या नव्या रणनीतीमागे पाकिस्तानची फूस असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. 2017 मध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरू केले तेव्हा शेकडो दहशतवादी मारले गेले आणि नंतर त्यांना होणारा शस्त्रपुरवठाही मंदावला. आता दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केले आहे. छोट्या पिस्तुलाचा वापर करून काश्मिरी स्थलांतरित, पंचायतीचे सदस्य तसेच विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करण्यात येऊ लागले. अनंतनाग जिल्ह्यातील ताज्या दहशतवादी हल्ल्याने काश्मीरमधील दहशतवादी कारवाया थांबल्या नसल्याची जाणीव करून दिली आहे.

जम्मू- काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर सशस्त्र दहशतवाद संपुष्टात आल्याचे आणि जम्मू-काश्मीरने विकास, शांतता आणि समाधानाच्या नव्या युगात प्रवेश केल्याचा दावा लष्कर, पोलिस आणि प्रशासनाच्यावतीने करण्यात येत होता. अर्थात या काळात दहशतवाद्यांकडून कारवाया होत होत्या; परंतु त्यांचे स्वरूप आधीच्यासारखे हादरवणारे नव्हते. काश्मीर खोर्‍यात गेल्या वर्षभरापासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून, भारताचे हे नंदनवन देश-विदेशातील पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे आश्वासक चित्र आहे. यावर्षी दोन कोटी पर्यटक काश्मीर खोर्‍यात येतील, असा दावा काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी केला आहे. दहशतवाद कमी झाल्याचे आणि परिस्थिती सुधारल्याचेच हे निदर्शक. याच पुराव्याच्या आधारे दहशतवादावर नियंत्रण मिळवल्याचे दावे करण्यात येतात.

जम्मू-काश्मीरच्या पोलिस प्रमुखांनी अलीकडेच सोपोर येथील एका समारंभात बोलताना, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद नव्हे, तर व्यापार आणि शिक्षणासंबंधी घडामोडी सुरू असल्याचे वक्तव्य केले होते. हिंसक निदर्शने आणि दगडफेक हा भूतकाळ बनला असल्याचेही सांगण्यात येते. यावर्षी काश्मीरमध्ये 46 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्यापैकी 37 विदेशी होते. स्थानिक तरुण आता दहशतवादाकडे आकर्षित होत नसल्याचेच हे सुचिन्ह मानले जाते. काश्मीरमध्ये शांतता निर्माण झाल्यावर पाकिस्तानचे पित्त खवळते आणि अशा घटनांचे नियोजन केले जाते. आतासुद्धा नियंत्रण रेषेवरून घुसखोरीला प्रोत्साहन दिले जात आहे, त्यामागे हेच दुखणे आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर पाहिले तर संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेच संकेत मिळत आहेत.

Back to top button