भारताची मान उंचावली! | पुढारी

भारताची मान उंचावली!

बहुचर्चित जी-20 राष्ट्रप्रमुखांची परिषद दिल्लीत पार पडली. अपेक्षेपेक्षा जास्त प्रसिद्धी आणि प्रतिसाद मिळालेल्या या परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे जगात भारताची मान उंचावली गेली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परिषदेच्या घोषणापत्रावर सहमती मिळणार नाही आणि चीन-रशिया त्यात आडकाठी आणतील, असे म्हटले जात होते. तथापि, सर्वसहमतीने घोषणापत्रास मान्यता मिळाली. जागतिक स्तरावर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दहा प्रमुख मुद्दे निश्चित करण्यात आले होते. त्या मुद्द्यांवर यावेळी साधकबाधक चर्चा झाली, तर भारताच्या पुढाकाराने 55 देशांची संघटना असलेल्या आफ्रिकन युनियनला जी-20 चे पूर्ण सदस्यत्व देण्यात आले. ब्राझीलला अध्यक्षपद सुपुर्द करून या परिषदेची रविवारी सांगता झाली.

सशक्त, संतुलित आणि सर्वसमावेशी जगाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार जी-20 राष्ट्र प्रमुखांच्या परिषदेत करण्यात आला असला तरी हे काम तितके सोपे नाही, हेही याठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहे. चीन आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांनी परिषदेला गैरहजेरी लावली; पण त्यामुळे परिषदेवर फरक पडला नाही. हरित विकासासाठी परस्पर सहयोग वाढविण्याच्या मुद्द्यावर भारताने सर्व प्रमुख देशांना एकत्र आणले आहे, हे भारताच्या द़ृष्टीने मोठे यश आहे. गत पाच वर्षांच्या कालावधीत ज्या काही जी-20 परिषदा झाल्या, त्या तुलनेत दिल्लीमध्ये झालेल्या परिषदेची उत्पादकता कितीतरी जास्त होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, बि—टनचे ऋषी सुनाक, जपानचे फुमिओ किशिदा, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासह प्रमुख जागतिक नेते दोन दिवस भारतात होते. आर्थिक महासत्तेच्या द़ृष्टीने अग्रेसर होत असलेल्या नव्या भारताचे रूप त्यांच्यासह जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी पाहिले.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची मोहीम, ‘ग्रीन क्रेडिट’ पुढाकार, मल्टिलॅटरल संस्थेची आगामी काळात होणारी स्थापना, हेही जी-20 परिषदेचे यश म्हणावे लागेल. जी-20 च्या आयोजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारने प्रचंड मेहनत घेतली होती. ती मेहनत सफल झाली आहे. जागतिक राजकारण आणि अर्थकारणात आपला दबदबा वाढविण्यासाठी भारताला या परिषदेचे यशस्वी आयोजन नक्कीच लाभदायी ठरेल, यात शंका नाही.

‘इंडिया’ नाव बदलण्यासाठीचा संघर्ष…

देशाचे नाव बदलून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असे केले जाण्याची सध्या सर्वत्र जोरदार वदंता आहे. इंडिया हे नाव बदलण्याच्या या मोहिमेसाठी महाराष्ट्रातील चाळीसगावमधील एक वकील अहोरात्र लढत होते, हे याठिकाणी प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते. चाळीसगावचे अ‍ॅड. केदार चावरे यांनी 2008 साली सर्वप्रथम हा विषय छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात नेला होता. चावरे यांनी आपल्या याचिकेत इंग्लंड व अमेरिकेत अस्तित्वात असलेले 16 कायदे ज्यात ‘इंडियन’ हा शब्द जंगली व मागास वर्गातील लोकांसाठी वापरला जातो, हे निदर्शनास आणून दिले होते. अमेरिकेतील 25 प्रमुख जंगली जाती व जमातींना ‘इंडियन’ म्हटले जाते, हेही त्यांनी न्यायालयासमोर सप्रमाण मांडले होते. सोळाव्या शतकात बि—टिशांनी आपल्या देशाला ‘पूर्वेकडील मागासलेल्या जंगली लोकांचा प्रदेश’ असे संबोधले होते.

तेव्हा ‘इंडिया’ हा शब्दच अस्तिवात नव्हता, असेही याचिकेद्वारे सांगण्यात आले होते. हा विषय आपल्या कार्यकक्षेबाहेर असल्याचे सांगत, केंद्र सरकारकडे दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने चावरे यांना दिले होते. त्यानुसार चावरे यांनी 2014 साली पंतप्रधान कार्यालयाकडे या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर सरकारने केलेल्या छाननीत धक्कादायक बाबी निष्पन्न झाल्या होत्या व याचिकाकर्त्याचे म्हणणे खरे असल्याचे दिसून आले. हे प्रकरण नंतर कायदा व गृह मंत्रालयाकडे सुपुर्द करण्यात आले. पंतप्रधान कार्यालय तसेच गृह मंत्रालय 2016 सालापासून काही कार्यवाही करत नसल्याचे सांगत चावरे यांनी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मात्र, तिथेही फार काही घडले नाही.

वास्तविक, इंडिया आणि इंडियन हे शब्द बि—टिशांनी भारतवासीयांना कमी लेखण्यासाठी वापरले होते, हे वास्तव आहे. अशा वेळी देशाचे नाव बदलून ते जर ‘भारत’ असे होणार असेल, तर त्याचे स्वागतच करावयास हवे. संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव येणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय सुंदोपसुंदीचे नवे विषय…

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी, स्टॅलिन यांच्याच द्रमुकचे नेते ए. राजा, कर्नाटकचे गृहमंत्री जी. एम. परमेश्वर आदी नेत्यांनी मागील काही दिवसांत केलेल्या विधानांवरून राळ उडालेली आहे. द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना यांसारख्या वेगवेगळ्या रोगांची नावे देत, तो समाप्त झाला पाहिजे, असे म्हटले आहे; तर परमेश्वर यांनी हिंदू धर्माची उत्पत्ती कधी झाली? असा सवाल उपस्थित केला आहे. थोडक्यात, सनातन आणि हिंदू हे देशात राजकीय सुंदोपसुंदीचे नवे विषय बनले आहे.
सनातन धर्मावर वर टीका-टिप्पणी करण्याची द्रमुकची ही काही पहिली वेळ नाही. पक्षाच्या स्थापनेपासून ‘सनातन’ हा विषय द्रमुकच्या अजेंड्यावर राहिलेला आहे. सामाजिक समानतेच्या मार्गात सनातन हा अडथळा असल्याचे द्रमुक नेत्यांचे म्हणणे आहे. उदयनिधी यांनी ‘सनातन’ला डेंग्यू, मलेरिया संबोधत त्याच्या समूळ नायनाटाची गरज असल्याचे सांगितल्यानंतर एकच गदारोळ उडाला. तर, ए. राजा यांनी त्याही पुढे जात सनातन धर्माची तुलना एड्स आणि कुष्ठरोगासोबत केली. इंडिया आघाडीतील मोठ्या पक्षांमध्ये द्रमुकचा समावेश होतो. उदयनिधी, स्टॅलिन आणि राजा हे वारंवार करीत असलेल्या विधानांना विरोधी आघाडीतील कोणत्याही प्रमुख नेत्याने पाठिंबा दिलेला नाही.

Back to top button