काँग्रेस-आप बेबनाव | पुढारी

काँग्रेस-आप बेबनाव

लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत दिल्लीच्या गादीवर कब्जा मिळवण्यासाठीची लढाई दिवसेंदिवस रंगतदार बनत चालली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसचा सहभाग असलेली इंडिया अशा दोन आघाड्यांमध्ये ही लढाई झडणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. या लढाईत परस्परविरोधी गटातील दोन्ही गटांनी किंवा पक्षांनी एकमेकांची ताकद आजमावण्यासाठी प्रयोग करायला हवेत. परंतु, दुर्दैवाने विरोधकांच्या इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील संघर्ष पाहता हे दोन पक्ष परस्परांचीच ताकद आजमावू लागले असल्याचे दिसते. खरे तर विरोधकांची आघाडी उभी राहात असताना त्यात प्रमुख भूमिका बजावणार्‍या काँग्रेस पक्षाने सर्वांना सोबत घेतानाच विश्वास देण्याची आवश्यकता असताना नेमके उलटे घडते आहे. दिल्लीची सत्ता मिळवण्याच्या लढाईत दिल्ली शहर हाच कळीचा मुद्दा ठरू लागला आहे आणि भयगंडाने पछाडलेली काँग्रेस अनावश्यक वाद निर्माण करून विरोधकांच्या आघाडीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत असताना दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील संघर्षाने आघाडीला आणखी हेलकावे बसू लागले आहेत. निवडणुकीला अवकाश असल्यामुळे सध्याच्या काळातील या संघर्षाला फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण नाही, अशी सारवासारव कुणाला करता येईल. परंतु, सुरुवातीच्या काळातच आघाडीत अविश्वासाचे वातावरण असेल आणि सोबत चालण्याऐवजी

शह-काटशहाचे राजकारण केले जात असेल, तर आघाडीला भविष्यात त्याचा फटका बसू शकतो. कारण, समोर शत्रू बलवान असताना त्याच्याविरुद्ध लढताना सैन्याची एकजूट तर असायलाच पाहिजे. परंतु, त्याच्या मनात कोणताही संभ्रम असता कामा नये. परंतु, दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर जो वाद निर्माण झाला त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीपुढे संकट उभे राहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले असून, बैठकांचे सत्र सुरू आहे. तशाच प्रकारे काँग्रेसची बैठक झाली. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असल्यामुळे स्वाभाविकपणे ती महत्त्वाची होती. या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी माहिती दिली, ती आघाडीत बिघाडी करण्यास कारणीभूत ठरली. दिल्लीत काँग्रेस पक्ष मजबूत करण्याबरोबरच दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा लढण्याची तयारी काँग्रेस पक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 च्या निवडणुकीत सर्व सातही जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. दिल्लीतील जागांसंदर्भात थेट दावा केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या गोटात खळबळ उडणे आणि पक्षाच्या नेत्यांनी बिथरणे स्वाभाविक होते. तसेच झाले आणि केवळ दिल्लीच्या राजकारणातच नव्हे, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीतही खणाखणी सुरू झाली. एरव्ही आम आदमी पक्षाने जी आगळीक करायला हवी होती, ती काँग्रेसने केल्यामुळे मामला अधिक गंभीर बनला.

काँग्रेसच्या दाव्यानंतर आम आदमी पक्षाकडून तातडीने आणि तीव्र प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते आणि तशा त्या आल्यासुद्धा. काँगे्रसला दिल्लीत आघाडी करायची नसेल, तर लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या नावाखाली जी आघाडी बनवायचे चालले आहे, त्या आघाडीचा भाग बनण्यात आम आदमी पक्षाला रस नाही, अशा भावना आम आदमी पक्षाकडून व्यक्त करण्यात आल्या. अशावेळी एकाने खडा टाकून अंदाज घेतल्यानंतर दुसर्‍याने सावरून घ्यायचे असते. जसे काँग्रेसकडूनही अलका लांबा यांच्या विधानानंतर इतर नेत्यांनी सारवासारव केली, तशीच आम आदमी पक्षाकडूनही छोट्या नेत्यांच्या मताला आम्ही महत्त्व देत नाही, असे म्हणून सौरभ भारद्वाज यांनी सारवासारव केली. दोन पक्षांच्या नेत्यांमधील कलगीतुरा असताना इथेही भारतीय जनता पक्षाला मध्ये ओढण्यात आले. भारतीय जनता पक्षाला मदत करण्याच्या उद्देशाने यासंदर्भातील वादाला प्रसारमाध्यमांनी खतपाणी घातल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. अर्थात, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील हा काही पहिलाच संघर्ष नाही.

दिल्ली सेवा विधेयकाच्या आधी काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी आम आदमी पक्षाने बराच थयथयाट करून ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच दोन्ही पक्षांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण का होत नाही, दोन्हीकडून उथळपणे व्यवहार करून संबंधांत कटुता निर्माण करण्यासाठीच प्रयत्न का केले जातात, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली, तेव्हा काँग्रेसला दोन जागा देण्यासाठी आम आदमी पक्षाची तयारी होती, काँग्रेस तीन जागेसाठी आग्रही होती, त्यातून आघाडी होऊ शकली नव्हती. त्यावेळी राज्यातील सत्तेत आम आदमी पक्ष असला, तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 23 टक्के आणि आम आदमी पक्षाला 18 टक्के मते मिळाली. सद्यःस्थितीत ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसला सामोपचाराने ही चर्चा पुढे न्यायची आहे. परंतु, ‘आप’ची प्रकृती पाहता त्यांना थोडे उपद्रवमूल्य दाखविल्याशिवाय ते सरळ येणार नाहीत, हे काँग्रेसला ठाऊक आहे. त्याचमुळे खडे टाकून अंदाज घेण्याची, परस्परांना जोखण्याची कवायत सुरू आहे.

काँग्रेसचे दिल्लीतील बहुतेक नेते ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल यांचा तीव्र विरोध करतात. परंतु, प्रश्न केवळ दिल्लीपुरता नाही, तर देशाच्या पातळीवरील राजकारणाचा असल्यामुळे काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व सबुरीने गुंते सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, आम आदमी पक्षाची आजवरची भूमिका संशयास्पद राहिली आहे. काँग्रेसचे नुकसान करून भाजपला फायदा पोहोचविण्यासाठी केजरीवाल यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. यावेळी देशपातळीवर दगाफटका करून त्यांनी आघाडी कमकुवत करू नये, एवढीच काँग्रेसची इच्छा असावी, त्यासाठीच स्वबळाचे दबावतंत्र वापरले जात असावे.

Back to top button