शिक्षण क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता | पुढारी

शिक्षण क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

प्रा. एम. जगदीश कुमार, अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन फायदे अनेक आहेत. परंतु, शिक्षक या नात्याने शिक्षणाच्या मूळ उद्देशाबाबतचा विचार केंद्रस्थानी ठेवावा लागेल. शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला, तर अध्यापन आणि ज्ञानार्जनात व्यापक बदल होऊ शकतो. आपण सर्वजण एका साचेबद्ध व्यवस्थेतून बाहेर पडू आणि व्यक्तिकेंद्रित शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करू शकू. यात विद्यार्थ्यांची गरज आणि त्यांच्या आवडीचा प्रामुख्याने विचार केला जाईल.

आज तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की, एखाद्या लहानशा उपकरणातही शेकडो पुस्तकांचा डेटा साठवता येतो. इंटरनेटवरही बरीच माहिती उपलब्ध आहे; मात्र त्याचा गरजेनुसार वापर केला, तरच त्या माहितीचा उपयोग होईल. म्हणूनच विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय बाळगावी आणि त्यात काय हवे आहे, काय नको, याचाही विचार करायला हवा. विद्यार्थ्यांची जडणघडण करणारे आणि आयुष्यभर मार्गदर्शन करणारे शिक्षण मोलाचे असते. शिकण्याबरोबरच ज्ञानार्जनाला प्रोत्साहित करणारे, कौशल्य विकासाला चालना देणारे, आयुष्यात तसेच करिअरमध्ये उपयुक्त ठरणारे, अडचणींवर मात करणारे शिक्षण हे नेहमीच उपयुक्त ठरते. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना एकाहून एक सरस संधी उपलब्ध होतात आणि एकाअर्थाने समाज तसेच अर्थव्यवस्थेत त्यांचे आणि कुटुंबाचे पालनपोषण होते. एक चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी प्रशिक्षित आणि कुशल शिक्षक असणे महत्त्वाचे आहे.

शिक्षकांना अध्यापनासाठी सातत्याने नवनवीन मार्ग शिकणे आणि आत्मसात करणे गरजेचे आहे. विशेषत: शिक्षणात, अध्यापनात एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने शिकवण्याच्या तंत्रात कायापालट होऊ शकेल. त्याचवेळी शिकण्याची शैलीही बदलेल. स्वित्झर्लंडचे मानसोपचारतज्ज्ञ कार्ल गुस्ताव जंग यांनी म्हटले आहे की, एकाच आकाराची चप्पल दुसर्‍या व्यक्तीला फिट होऊ शकत नाही. तसेच आयुष्यातही एकच गोष्ट सर्वांनाच लागू होऊ शकत नाही. ही बाब शिक्षणालाही लागू होते. वास्तविक, शिक्षण व्यवस्था ही दीर्घकाळापासून एक साचेबद्ध मार्गाने चालताना दिसते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणारी क्षमता आणि गरज याची ओळख न करता शिक्षण देतो. अर्थात, अलीकडच्या काळात उच्च शिक्षणाची अपेक्षा बाळगून असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. समूह शिक्षणाऐवजी व्यक्तिकेंद्रित शिक्षण देण्याबाबतही आग्रही राहणे गरजेचे आहे.

एखाद्या वर्गात विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल, तर अशा ठिकाणी व्यक्तिकेंद्रित शिक्षण देणे हे एक आव्हान राहू शकते. परंतु, शिक्षणात एआयचा वापर केला गेला, तर अध्यापन आणि ज्ञानार्जनात व्यापक बदल होऊ शकतो. आपण सर्वजण एका साचेबद्ध व्यवस्थेतून बाहेर पडू आणि व्यक्तिकेंद्रित शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करू शकू. यात विद्यार्थ्यांची गरज आणि त्याच्या आवडीचा प्रामुख्याने विचार केला जाईल. विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याबरोबरच शिक्षणाची गोडी वाढेल या द़ृष्टीने एआय उपकरणे विकसित करणे आवश्यक आहेत. चांगले शिक्षण उपलब्ध करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा शैक्षणिक धोरणात समावेश करायला हवा.

काही जणांना एआयच्या तंत्रज्ञानाची धास्ती वाटते आणि त्यामुळे शिक्षकांच्या रोजगारावर गंडांतर येईल, अशी भीती वाटत आहे; मात्र अशी कोणतीही शंका दिसत नाही. मानवी शिक्षक असणे खूपच गरजेचे आहे आणि त्यात कोणत्याही स्थितीत बदल करता येणार नाही. अर्थात, एआयच्या शिक्षणातून अध्यापनाची प्रक्रिया खूपच सुलभ आणि रंजक राहू शकते. एआय तंत्रज्ञान हे शिक्षण व्यवस्था, व्यवस्थापन, तपासणी आदी कामांत साह्यभूत ठरू शकते. एआय हे तीन मार्गांनी विद्यार्थ्यांना एक गुणवान विद्यार्थी करू शकते. पहिले म्हणजे एआय निर्देशित शिक्षण. यात एआय निर्देशित मशिनमध्ये एखाद्या शिक्षकाला असणार्‍या माहितीचा डेटा सामील केला जाईल. त्यानंतर ही मशिन एखाद्या शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांना संपूर्णपणे माहिती सादर करेल. एआय संचलित शिक्षणात एआय उपकरण हे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षणाचा मार्ग निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करू शकते. हे मशिन वर्गाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ट्यूटर म्हणूनही मदत करेल; मात्र अशा उपकरणाच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ एकतर्फी ज्ञानार्जन करू शकतील. याशिवाय शिक्षणात एआयचा वापर करण्यासाठी आणखी काही मार्ग आहेत.

शिक्षणात एआयचा वापर करण्याचा दुसरा मार्गदेखील आहे. एआय पुरस्कृत शिक्षण. या पद्धतीत विद्यार्थी आणि एआय मशिन यांच्यात देवाणघेवाण होते. विद्यार्थ्यांसमवेत चर्चा करताना मशिन डेटाचे संकलन करते. या डेटाच्या आधारे मशिन विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील प्रगतीच्या आधारे अध्यापनाचे कार्य करत असते. त्याचे ध्येय हे विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार निश्चित केलेले असते आणि एआय मशिन व्यक्तिकेंद्रित शिक्षणाच्या पद्धतीत क्षमतेनुसार काठिण्य पातळी कमी -जास्त करू शकते. यात विद्यार्थी आणि एआय उपकरण हे एकत्रपणे काम करतील.

एआय शिक्षणाची तिसरी पद्धत म्हणजे एआय संचलित शिक्षण. अशा शिक्षण व्यवस्थेत अनेक जण एकत्र येऊन काम करतात. यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समावेश असतो. अनेक विद्यार्थी एकत्र येऊन किचकट समस्यांवर तोडगा काढतात. अशा पद्धतीत शिक्षक व्यावहारिक फिडबॅक आणि सल्ला देतात आणि त्यानुसार शिक्षणासाठी एक चांगले वातावरण निर्माण होते. या पद्धतीत सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच विद्यार्थ्यांची प्रभावी क्षमता आणि रचनात्मकता महत्त्वाची असते. एआय हे शिक्षण क्षेत्रात नक्कीच महत्त्वाचा भाग ठरू शकते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिकेंद्रित शिक्षणासाठी नव्याने एआय अ‍ॅप्लिकेशनचा वेगाने विकास केला जात आहे. शिक्षणात एआयच्या उपयोगाचे दीर्घकालीन आणि अल्पकालीन लाभ आहेत. अर्थात, शिक्षक असल्याने शिक्षणाच्या वास्तविक उद्देशाबाबतही विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोणत्याही शिक्षणाचा उद्देश हा एखाद्या माणसाला विचार करणे, विश्लेषण करणे आणि विचारपूर्वक व्यवहार करण्याची क्षमता वाढविणे हाच असतो. या कौशल्यांचा विकास झाल्यानंतर विद्यार्थी आयुष्यात यशस्वीपणे वाटचाल करतात. यामुळेच शिक्षणात एआयचा उपयोग करताना नैतिक बाजूंबाबतही सजग राहणे आवश्यक आहे.

Back to top button