लवंगी मिरची : अतिगुप्त भेट! | पुढारी

लवंगी मिरची : अतिगुप्त भेट!

काय रे मित्रा, आज अचानक भेटीसाठी बोलावलेस? काही विशेष आहे का? आणि तेही कुणाला न कळू देता गुपचूप ये म्हणालास! काही भलती भानगड करून ठेवली नाहीस ना?

अरे, नाही रे यार! तसं तर आपण रोज आणि नेहमीच भेटतो; पण आजकाल गुप्त भेटींचा सिलसिला सुरू आहे ना? कुणाच्याही डोळ्यावर न येऊ देता आणि विशेषत: पत्रकारांपासून लपून छपून भेटण्याची पद्धत आपल्या राज्यामध्ये हळूहळू रुजत आहे. पूर्वीच्या बादशाहीच्या काळामध्ये गुप्त सल्लामसलती होत असत, तशा आजकाल गुप्त भेटी होत आहेत. तसे तर तू आणि मी एकमेकांपासून कधी काही लपवून ठेवत नाहीत; पण मी विचार केला की, चला, गुप्त भेटीचा थरार कसा असतो तो तर अनुभवूयात! लोकांनी मला ओळखू नये म्हणून मी ही मफलर गुंडाळली आहे आणि डोळ्यावर गॉगल पण लावलेला आहे. चक्क मी घरी गेलो, तर माझी बायकोसुद्धा मला ओळखू शकणार नाही, यालाच म्हणतात गुप्त भेट!

हो पण गुप्त भेटीमध्ये भेटणारे राजकीय नेते सतत गाड्या का बदलत असतात? एरव्हीच तर त्यांच्या गाड्यांना काळ्या काचा असतात. त्यामुळे आतमध्ये कोण बसलेले आहे, हे दिसण्याचा मार्ग नसतो. एक गाडी घ्यायची, रंकाळ्यापर्यंत जायचे, रंकाळ्याला त्या गाडीतून उतरायचे आणि दुसर्‍या गाडीत बसून जयसिंगपूरला जायचे आणि तिथे कुणाच्या तरी फार्म हाऊसवर एकमेकाला भेटायचे, असे गुप्त भेटीचे प्लॅनिंग असते म्हणे! ही भेट गुप्त ठेवण्याचे कारण म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले दोन नेते कधी राजरोस समोरासमोर येऊ शकत नाहीत. म्हणून लपूनछपून अशा भेटी घेतल्या जातात. पत्रकार बांधव, जागोजागीचे वार्ताहर आणि न्यूज चॅनेलचे कॅमेरे या नेत्यांवर कायम रोखलेले असतात. म्हणजे घरातून बाहेर पडल्यापासून ते थेट घरी परत येईपर्यंत किमान एक किंवा दोन कॅमेरे त्यांच्या पाठीशी असतात. त्यामुळे असे मोठे नेते कुणालाही भेटले की, त्याची चर्चा होत असते. पत्रकारांना हुलकावणी देण्यासाठी मग गाड्या बदलल्या जातात आणि ठरलेल्या ठिकाणी दोन्ही नेते भेटत असतात, अशा भेटीला गुप्तभेट असे म्हणतात; पण मी काय म्हणतो, ही चर्चा प्रत्यक्ष भेटीतच का व्हावी लागते? फोनवर घरी बसून चर्चा केली, तर कुणालाच कळणार नाही ना!

संबंधित बातम्या

मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोन पण टॅप केले जात असतात. शिवाय अशा टॅप केलेल्या फोनवर दोन नेते संगनमताने काही नियोजन करू लागले, तर त्यांच्या संभाषणाची ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप अवघ्या काही तासांत व्हायरल होऊ शकते. त्यामुळे एवढी काळजी घेऊन अशा मसलती गुप्त ठेवल्या जातात.

होय, तू म्हणतोस ते बरोबर आहे. अशीच एक भेट सध्या गाजत आहे . काल दिवसभर कोणतेही मराठी न्यूज चॅनेल लावले, तरी अप इकडून निघाले, शप तिकडून आले. अपने दोन वेळेला गाड्या बदलल्या, दोघेही एका उद्योजक मित्राच्या बंगल्यावर भेटले, त्यांनी अर्धा तास चर्चा केली आणि त्यानंतर दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले म्हणे! हा सगळा घटनाक्रम न्यूज चॅनेलचे पत्रकार इतके उत्साहाने दाखवत होते की, जणू काही बायडेन आणि पुतीन भेटत आहेत. दिवसभर एकच दळण चालू होते; पण माझे काय म्हणणे आहे की, भेटले असतील तर भेटू द्या ना त्यांना? कधी कधी मला असे वाटते की, ही भेट गुप्त झाली किंवा होणार आहे, हे रहस्य कदाचित हेच लोक पत्रकारांना आधी सांगत असतील. म्हणजे अशा गुप्त भेटी गाजावाजा करून उघड केल्या जातात. मग, त्यांना खरेच गुप्त म्हणता येईल का, हा खरा प्रश्न आहे.

Back to top button