लवंगी मिरची : रणकंदन | पुढारी

लवंगी मिरची : रणकंदन

काय तात्या, आज उशीर केलात यायला? काही काम लागले की काय? रामभाऊ, काम काही नाही. पेन्शनर माणसाला कसले आले आहे काम? दोन वेळ जेवायचे, टीव्ही पाहायचा आणि राजकारणावर गप्पा मारायच्या. काही म्हण गड्या, काल डोळे भरून आपले संसदेमधले रणकंदन पाहिले. आपले खासदार संसदेमध्ये जाऊन किती गोंधळ करतात, हे मी ‘याची देही याची डोळा’ पाहिले. कधी क्रिकेट मॅच पाहत नाहीस, मग हे लाईव्ह टेलिकास्ट पाहायला इतका कसा जोर आला तुला?

म्हणजे बघ, विरोधी पक्षांनी केलेल्या युक्तिवादामुळे मला असे वाटायला लागले की, केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत देशाचा पूर्ण सत्यानाश करून ठेवलेला आहे आणि मग पाठोपाठ सत्ताधारी पक्षाचे आणि विशेषतः पीएम साहेबांचे भाषण ऐकले की, देशाने कशी अफाट प्रगती केली आहे ते समजले. लाईव्ह टेलिकास्ट पाहिल्यानंतर पाठोपाठ विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया होत्या आणि त्या संपल्या की, स्वयंघोषित राजकीयतज्ज्ञ समोर आले आणि त्यांनी झालेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेची चिरफाड करायला सुरुवात केली.हे राजकीयतज्ज्ञ असेच असतात. आपल्यासारखेच टीव्हीवर चर्चा पाहून पाहून ते तयार झालेले असतात आणि यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर तुम्ही कुठल्याही निष्कर्षाला येऊ शकत नाही.

पण, या वेळेला एका तरुण खासदाराने हनुमान चालिसा खाडखाड म्हणून दाखवली. म्हणजे ज्या विचारसरणीचा पुरस्कार तुम्ही करता त्याची तुमची तयारी असली पाहिजे. हनुमान चालिसा तुम्हाला येते का, असे कोणीतरी विचारल्याबरोबर त्याने जी सुसाट एक्स्प्रेस सोडली ती पाहून भल्याभल्यांचे डोळे मोठे झाले.

संबंधित बातम्या

यावरून आणखी एक गोष्ट आठवली बघ! परवा मराठी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात एका उच्चविद्याविभूषित म्हणजे एम.ए.एम.एड. आणि दहा-बारा वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकेला शिवराज्याभिषेक कोणत्या गडावर झाला, याचे उत्तर देण्यासाठी लाईफलाईन वापरावी लागली. इथे हनुमान चालिसा म्हणून दाखवून त्या तरुण खासदाराने विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घातले.

पण का रे, विरोधी पक्षांनी आणलेला हा अविश्वास ठराव म्हणजे हात दाखवून अवलक्षण असेच म्हणावे लागेल. त्यात पुन्हा शेवटचे भाषण पंतप्रधानांचे होते. अविश्वास ठरावाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो आणि या चर्चेचा शेवट मंत्रिमंडळ प्रमुखांच्या भाषणाने होत असतो, हे माहीत असतानाही विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणला. हे म्हणजे अटीतटीच्या वेळी शेवटच्या चेंडूवर कसलेल्या फलंदाजाला फुलटॉस टाकण्यासारखे आहे. अनुभवी बॅटस्मन अशा चेंडूवर थेट षटकार मारत असतो, हे ओळखण्यात गोलंदाजी करणारा संघ अपयशी ठरला. अपेक्षेप्रमाणे पीएम साहेबांचे भाषण तडाखेबंद आणि जोरदार झाले. त्यांनी चक्क विरोधी पक्षांची बोलती बंद केली आणि मैदानातच चीतपटचा फैसला करून टाकला.

हे बघ भारतातील राजकीय लोक जनतेला मूर्ख समजतात ही त्यांची पहिली चूक आहे. कोणाचे काय चालले आहे, यावर जनतेचे अत्यंत बारकाईने लक्ष असते. त्यांचे निर्णय ठरलेले असतात. जनतेचा काय निर्णय ठरलेला आहे, याचा निकाल 2024 मध्ये मतपेट्या, म्हणजे पूर्वी मतपेट्या होत्या, आता मतदान यंत्रे उघडल्यानंतरच कळेल. या यंत्रामध्ये दडलंय काय, याचा शोध घेण्याची तयारी म्हणून कालचा अविश्वास ठराव ही ट्रायल होती. ये ‘तो ट्रेलर था मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी हैं!’

Back to top button