लवंगी मिरची : असेही चोर | पुढारी

लवंगी मिरची : असेही चोर

मित्रा, मला असे वाटते की, आपण भारतीय लोकांना फुकट काही मिळत असेल, तर त्याचे फार मोठे आकर्षण असते. फुकट मिळत असेल, तर चोरी करून पण ते नेण्याची किंवा घेऊन जाण्याची त्यांची तयारी असते. म्हणजे हेच बघ ना, रेल्वेच्या स्लीपर कोचमधून यावर्षीच्या जानेवारी ते मे महिन्यात तब्बल वीस लाख रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. स्लीपर कोचमध्ये प्रवास करणारे म्हणजे, सुखवस्तू लोक असतात हे आपल्याला माहीत आहे. कारण, तेवढे पैसे जास्त भरून त्यांनी ते तिकीट काढलेले असते. स्लीपर कोच हे वातानुकूलित असतात आणि नावाप्रमाणेच स्लीप करण्यासाठी म्हणजेच झोपण्यासाठी याच्यामध्ये तरतूद असते. ‘एसी’चे तापमान खूप थंड असल्यामुळे बर्‍याच लोकांना ते सहन होत नाही. अशा लोकांना रात्रीच्या वेळी अगदी स्वच्छ असे ब्लँकेट, पांढरे शुभ— अभ—े असलेल्या उशा, तसेच ड्राय क्लीन केलेले परीटघडीचे पांढरे शुभ— टॉवेल्स वापरण्यासाठी दिलेले असतात. रेल्वेचे हे सर्व सामान प्रवाशांनी उतरण्यापूर्वी परत करणे आवश्यक असते. या सामानावरच डल्ला मारून प्रवाशांनी वीस लाख रुपयांची चोरी केली आहे, असे निदर्शनास आले आहे.

असेल, असेल, सहज शक्य आहे हे. आजकाल आपले भारतीय लोक जगभरात पर्यटनासाठी फिरत आहेत. विशेषत: सिंगापूर, मलेशिया, थायलंड, बाली या ठिकाणी भारतीय लोक पर्यटनासाठी जाण्याचे प्रमाण मोठे आहे. तिथे त्यांची राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेल्समध्ये केली जाते. आता या फाईव्ह स्टार हॉटेलची पद्धत तुला माहीत आहे का? हे लोक रूममध्ये मशिनवर चहा करण्यासाठी चहा पत्ती, साखर, दूध पावडर आणि आंघोळीसाठी दररोज साबण, शाम्पू अशा असंख्य गोष्टी ठेवत असतात. भारतीय लोक समजा चार-पाच दिवसांसाठी आले असतील, तर पहिल्या दिवशी आलेला साबण शेवटच्या दिवसापर्यंत वापरतात आणि दररोज आलेला साबण उचलून आपल्या बॅगेत टाकतात. मध्यंतरी चेक आऊट करून निघालेल्या म्हणजे, हॉटेल सोडताना बाहेर पडलेल्या भारतीय कुटुंबाचे सामान हॉटेल मालकाने संपूर्ण तपासले तेव्हा त्यात या अशा गोळा केलेल्या साबण, शाम्पू, चहापत्ती आणि साखरेच्या पुड्या भरपूर आढळल्या. अरे पण ते एक वेळेस समजू शकतो की, विदेशातील संपत्ती त्यांनी आपल्या देशात चोरून आणली; पण इथे भारतीय रेल्वेतर आपलीच आहे ना? तिथे चोरी करायची म्हणजे, या लोकांची कमालच आहे.

रेल्वे खाते तरी कुठे-कुठे नजर ठेवणार? समजा पहाटे सहा वाजता मुंबईला पोहोचणारी रेल्वे असेल तर तुम्ही ठाणे, कल्याण, दादर या ठिकाणी त्यांच्याकडून सामान परत घेऊ शकाल; पण असलेली गर्दी पाहता ते सामान गोळा करता येत नाही आणि याचाच गैरफायदा घेऊन बरेच लोक ते सामान आपल्या ब्यागांमध्ये भरतात आणि घरी घेऊन जातात. मध्यंतरी त्यावर एक विनोद आला होता. एका गृहस्थांना आपण परदेशी गेलो तेव्हा कोणत्या हॉटेलमध्ये उतरलो होतो ते नाव आठवत नव्हते. त्यांनी त्या हॉटेलचे नाव त्यांच्या सौभाग्यवतींना विचारले. त्या म्हणाल्या, तिथला एक चमचा मी आणलाय तो बघून तुम्हाला सांगते. भारतीय रेल्वे दिवसेंदिवस नवनवीन सुधारणा करीत अत्यंत कमी पैशात लोकांचा प्रवास सुखकर करत आहे. मला असे वाटते की, आपण लोकांनी पण रेल्वेला सहकार्य करून जगातील उत्तम रेल्वे ठरण्याचा मान मिळवून दिला पाहिजे. हे बघ सहकार्याची काही गरज नाही. फक्त रेल्वेने आपल्याच करामधून खरेदी केलेल्या आणि आपल्याच वापरासाठी असलेल्या वस्तू चोरून नेणे बंद केले, तरी देशाची मोठी सेवा होऊ शकते.

संबंधित बातम्या
Back to top button