लवंगी मिरची : वरात आणि डान्स | पुढारी

लवंगी मिरची : वरात आणि डान्स

एका लग्न समारंभाला गेलो होतो मित्रा. लग्नाचा मुहूर्त दहा वाजताचा होता आणि साडेअकरा वाजायला आले तरी वरात कार्यालयात पोहोचली नव्हती. याचे कारण म्हणजे नवरदेव घोड्यावर बसलेला होता आणि समोर पन्नास एक लोक डीजेच्या तालावर नाचत होते.

अरे, हे तर काहीच नाही. परवा उत्तर प्रदेशमध्ये एका नवरदेवाने भर मांडवातून निघून स्वतःचेच लग्न मोडले याचे कारण हे नाचणेच होते. म्हणजे झाले असे की वरातीमध्ये नवरीची आई डीजेच्या तालावर इतकी भन्नाट आणि इतका वेळ नाचली की नवरदेव सुद्धा कंटाळून गेला. होणार्‍या वधूची आई जर इतके बेफाम नाचत असेल तर हिच्या पोरीबरोबर लग्न न केलेले बरे, असे समजून ते लग्न त्याने तिथेच मोडले.

मला तर असे वाटायला लागले आहे की लोकांना लग्न कुणाचेे, कुणाशी आहे यापेक्षा लग्नात नाचायला मिळेल की नाही याची काळजी असते. हे बघ, नवर्‍याचे आणि नवरीचे आई-वडील म्हणजे दोन्ही बाजूचे व्याही आणि विहिणबाई मिळून नाचत असतात. मला असे वाटते की ही राहून गेलेली हौस असावी. म्हणजे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी यांचे लग्न झाले असेल तेव्हा अशा प्रकारच्या मिरवणुकांमध्ये नाचण्याचे प्रमाण कमी असायचे.

संबंधित बातम्या

परदेशातील लोक जेव्हा रस्त्यावर नाचतात तेव्हा आपल्याला कधी काळी ते चुकीचे वाटले होते. ते आता सर्वसंमत आणि समाजमान्य झाले आहे. शिवाय आजकाल नवरा नवरीचे आई-वडील बर्‍यापैकी तरुण असतात, कारण की पन्नाशी हे काही थकण्याचे वय नाही, किमान थकलेले दिसण्याचे वय नाही. त्यामुळे वरात निघाल्याबरोबर काही लोकांच्या अंगात नृत्यदेवता संचारते आणि ते बेभान नाचायला सुरुवात करतात आणि नाचण्याच्या धुंदीमध्ये वेळेचे भान हरपते आणि मुहूर्त हुकतो, पण काहीही म्हण मला असे वाटते की हळूहळू आपले भारतीय लोक जगण्याचा आनंद घ्यायला शिकत आहेत. कदाचित अशा वरातींचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की आपल्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स खूप चांगला आहे. उगाच आपण निराश लोक आहोत म्हणून आपली जगभर बदनामी होते आहे.

हॅपीनेस इंडेक्स काढणार्‍या लोकांना माझी विनंती आहे की भारतात या, विशेषतः महाराष्ट्रात या आणि लग्नाच्या वराती किंवा मिरवणुका पाहा आणि मग बघा की जगात आनंदी लोक कसे आणि कुठे राहतात? नृत्य हा आनंद झाल्यानंतरचा सर्वात पहिला आविष्कार असावा. एखादी शिकार सापडल्यानंतर आदिमानव सुद्धा डान्स करत असेल, असे वाटते. त्यामुळे डान्स करणे ही जर नैसर्गिक प्रेरणा असेल तर वरातीसमोर नाचले तर त्यात बिघडले कुठे?

तसे नाही रे. यात खरा प्रॉब्लेम होतो लग्न लावण्यासाठी येणार्‍या लोकांना. ते बिचारे ठरलेल्या वेळेला येऊन बसतात आणि मग तास दीड तास वरातीचे बँड ऐकत बसण्याची वेळ त्यांच्यावर येते. ज्यांची कुणाची कार्यालय किंवा इतरत्र जाण्याची वेळ ठरलेली असेल त्यांना निघून जाण्याशिवाय पर्याय नसतो. बरेचदा लोक लग्नाच्या आधी जेवण करून घेतात आणि लग्नाच्या पहिल्या मंगलाष्टकाला अक्षता टाकून तिथून निघून जातात.

ते काहीही असो, पण विनाकारण बदनाम होत असलेल्या आपल्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स तपासला तर भारतीय लोक खूप आनंदी आहेत, असे लक्षात येईल. विशेषत: एखादा पन्नाशीचा माणूस एखाद्या वरातीमध्ये नागीन डान्स करत असेल आणि त्याचा नागीन डान्स पाहून आणखी पाच पंचवीस जण संगीताच्या तालावर बेधुंद नाचत असतील तर लक्षात घे, आपल्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स खूप खूप वर आहे आणि याच गोष्टीचा मला खूप आनंद होतो. (झटका)

Back to top button