मैत्रीचे नवे पर्व | पुढारी

मैत्रीचे नवे पर्व

जगातील सर्वात जुना लोकशाही देश अमेरिका आणि सर्वात मोठा लोकशाही देश असलेला भारत यांच्यातील संबंध एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या अमेरिका दौर्‍याने साधले. दोन्ही देशांमधील मैत्री लोकशाहीच्या भवितव्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास या दौर्‍याने निर्माण केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून अधिकृत सरकारी भेटीवर आलेल्या मोदी यांचे अमेरिकेत सरकार आणि नागरिकांकडून झालेले स्वागत डोळ्यांचे पारणे फेडणारे आणि भारतीयांचा अभिमान उंचावणारे ठरले. जगातील एका महासत्तेने भारतीय पंतप्रधानांना दिलेला हा सन्मान देशातील 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली, ती सार्थच म्हणावी लागेल. मध्यंतरी नेपाळचे पंतप्रधान भारताच्या दौर्‍यावर आले तेव्हा, भारत-नेपाळ संबंध हिमालयाच्या उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. भारत-अमेरिका संबंधांच्या निमित्ताने तोच धागा पुढे नेण्यात आला. परंतु, तो केवळ शाब्दिक पातळीवर नव्हे, तर कृतीच्या स्वरूपात. मोदींच्या या दौर्‍यात झालेल्या करारांमुळे भारत-अमेरिका संबंधांनी शब्दशः अवकाशात भरारी घेतली असे म्हणावे लागेल. आकाशालाही मर्यादा असते, असे एरव्ही म्हटले जाते. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी आकाश अमर्याद असल्याची प्रतिक्रिया या करारांनंतर दिली, ती त्यामुळेच महत्त्वाची ठरते. दोन्ही देशांकडून संरक्षणविषयक महत्त्वपूर्ण करारांवर मुद्रा उमटवण्यात आली. जनरल इलेक्ट्रिकचा हिंदुस्थान एरोनॉटिक्ससोबत लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन बनवण्याचा पहिला महत्त्वपूर्ण करार आहे. त्यापुढची झेप अर्थातच चंद्राच्या आणि मंगळाच्या दिशेने आहे. 2025 पूर्वी चंद्रावर माणूस पाठवण्याच्या अमेरिकेच्या मोहिमेमध्ये भारताला समाविष्ट करून घेण्यासंदर्भातील ‘नासा’सोबतचा दुसरा करार आहे. या दोन्ही करारांमुळे भारत-अमेरिका यांच्यातील संबंध केवळ जमिनीपुरते मर्यादित राहिले नसून, अवकाशातही त्यांची घट्ट वीण जुळली. विकसनशील देश पूर्वी भारताची दारिद्य्र, अंधश्रद्धा आदी कारणांमुळे हेटाळणी करीत असत. परंतु, भारत हा विज्ञाननिष्ठ देश आहे आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी सतत पुढे झेपावण्याचा प्रयत्न भारताने केला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञाननिष्ठेची रुजवणूक केली आहे, तो रोपाचा वेलू गगनावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेसोबत झालेले दोन ताजे करार त्याचेच निदर्शक असून, भारताचा वैज्ञानिक आणि प्रगतीशील द़ृष्टिकोन जगावर बिंबवण्याचे काम या दोन करारांनी केले आहे. मोदींच्या दौर्‍यातील आणखी एक महत्त्वपूर्ण भेट ठरली ती जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले उद्योजक, टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ट्विटरचे मालक अ‍ॅलन मस्क यांची. मोदींनी त्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित केले आणि मस्क यांनीही भारतात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. देशातील बड्या उद्योजकासोबत झालेल्या बैठकीतून भारतातील उद्योग विकास आणि रोजगार वाढीसाठी निश्चितच फायदा होऊ शकेल.

जो बायडेन यांनी अधिकृत सरकारी भेटीसाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करून भारत-अमेरिका संबंधांचा एक नवा अध्याय सुरू केला. अशाप्रकारे अमेरिकेने सन्मान दिलेले मोदी हे भारताचे फक्त तिसरे पंतप्रधान आहेत. नोव्हेंबर 1961 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी पंडित नेहरू यांना निमंत्रित केले होते, त्या दौर्‍यात इंदिरा गांधीही सहभागी झाल्या होत्या. बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर पहिल्यांदा कुणा देशाच्या प्रमुखांना अधिकृत सरकारी पाहुणे म्हणून निमंत्रण दिले असेल, तर ते भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना. डॉ. सिंग यांनी सरकार पणाला लावून, म्हणजे सरकारला पाठिंबा देणार्‍या डाव्यांचा विरोध मोडून अणुकरार केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांना हा अधिकृत सरकारी पाहुणे बनण्याचा बहुमान मिळाला. भारताकडे ‘जी-20’ चे अध्यक्षपद असताना मिळालेला हा बहुमान विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक राजकारण बदलले असल्याच्या पार्श्वभूमीवरील मोदींच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. अमेरिका आणि अनेक देश रशियाच्या विरोधात एकवटले असताना  भारताने मात्र त्या गटापासून दूर राहून रशियाशी असलेले संबंध कायम राखले आणि त्याचवेळी युक्रेनशीही संबंध टिकवले. प्रारंभीच्या काळात भारताच्या भूमिकेवरून अमेरिका नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु, भारताने त्याची कधीही पर्वा केली नाही. भारत-पाकिस्तान संबंध आणि त्यातील अमेरिकेची भूमिका सातत्याने चर्चेत असते. विशेषत:, पाकिस्तानच्या बाबतीत अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरते. मोदींच्या दौर्‍यानिमित्त अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावले, जो बायडेन आणि नरेंद्र मोदी यांनी सीमेपलिकडील दहशतवादाचा, दहशतवादी कृत्यांचा तीव— निषेध केला. पाकिस्तानने त्यांच्या देशाचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी होणार नाही, याची खात्री करण्याचे आणि त्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. व्हाईट हाऊसच्या निवेदनात त्यासंदर्भात स्पष्ट उल्लेख करण्यात आला. मोदी यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून विविध संघटनांपर्यंत अनेक घटकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. बायडेन आणि मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतात मुस्लिम आणि अल्पसंख्याकांबाबत होणार्‍या कथित भेदभावावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मोदींनी ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र घेऊन भारत पुढे चालला असल्याचा निर्वाळा दिला. भारत हा लोकशाही देश आहे. भारत आणि अमेरिकेच्या ‘डीएनए’मध्ये लोकशाही आहे. संविधानाच्या रूपात आमच्या पूर्वजांनी त्याला शब्दस्वरूप दिले आहे. कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला आमच्या लोकशाहीत जागा नाही. ज्या ठिकाणी मानवी मूल्यांना जागा नाही तिथे लोकशाही असू शकत नाही. धर्म किंवा जातीच्या आधारे भारतात कुठलाही भेदभाव होत नसल्याचे मोदींनी ठणकावून सांगितले. ते अधिक महत्त्वाचे.

Back to top button