लवंगी मिरची : निसर्ग देवतेला नम्र आवाहन! | पुढारी

लवंगी मिरची : निसर्ग देवतेला नम्र आवाहन!

अरे मित्रा, गेल्या महिन्याभरापासून मी पाहत आहे की, प्रत्येक गोष्टीला वेळ लागत आहे. म्हणजे, कालचेच बघ ना? गावाकडे जायचे म्हणून मी बस स्टॅन्डवर आलो. दुपारी तीन वाजता निघणे अपेक्षित असलेली बस, संध्याकाळी सहा वाजत आले, तरी आली नाही. तीन तास ताटकळत बसून कंटाळून गेलो; पण पर्याय नसतो आपल्याला. सामान्य माणसांच्या हातात कोणत्याच गोष्टी नसतात.
बरोबर आहे तू म्हणतोस ते. म्हणजे, महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या गोष्टींची यादी केलीस, तर किमान दोन पाने तरी भरतील. म्हणजे, हेच बघ ना. सात जून रोजी अपेक्षित असणारा पाऊस अजूनपर्यंत आलेला नाही, पडलेला नाही. मान्सूनचे आगमन लांबणीवर अशा बातम्या ऐकून, वाचून कंटाळासुद्धा आला.
भेगाळलेल्या जमिनीवर बसून, आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी हे दरवर्षीचे अतिशय विदारक चित्र याही वर्षी पाहायला मिळाले. मान्सून लांबणीवर पडल्यानंतर जे हाल होतात त्याला सीमा नसते. पेरणी लांबली म्हणून दुष्काळ पडतो. नागरी आणि शहरी भागांतील लोकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. म्हणजे, लांबणीवर पडलेल्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रमध्ये सध्या मान्सून पहिल्या क्रमांकावर आहे. येणार, येणार, आला, मुंबईपर्यंत आला, केरळपर्यंत आला, या सर्व अंदाजांना हुलकावणी देत मान्सून कुठे गायब झाला आहे ते समजत नाही.
पण महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती पाहशील, तर तुझ्या लक्षात येईल की राजकारणी लोकांना याच्याशी काही घेणे-देणे नाही. एखाद्या पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्याला जर तू बोललास आणि मान्सून लांबणीवर पडला, असा विषय काढलास तर तो मान्सूनचे सोडून द्या राज्यातील निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत, याविषयी काळजी व्यक्त करील.
हो रे बाबा. आपल्याला मान्सूनचे पडलेले असते आणि त्यांना निवडणुकांचे पडलेले असते. जसा मान्सून हा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा श्वास आहे, तशा निवडणुका हा सर्वपक्षीय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचा श्वास आहे.
अरे पण सांगताना तर ते सांगतात की, निवडणुका निमित्त मात्र आहेत. परंतु, त्यांना जनसेवेची आस आहे. जनतेची प्रगती होण्याचा ध्यास आहे.
कशाची आस आणि कशाचा ध्यास? कुणी काही केले म्हणून जनतेची प्रगती झाली असा प्रकार अद्याप घडलेला नाही. आता उदाहरणार्थ, महानगरपालिका निवडणुकांचे घे. कोणीही निवडून आले, तरी जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, त्यांची प्रगती होत नाही. जर प्रगती कुणाची होत असेल, तर निवडून आलेल्या उमेदवाराची होते. म्हणजे, जो साध्या मारुती गाडीमध्ये फिरत असतो, निवडून आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये तो फॉर्च्युनर आणि तत्सम वैभवशाली गाड्यांमध्ये फिरायला लागतो. म्हणून तर लवकर निवडणुका व्हाव्यात, यासाठी तगादा लावलेला असतो. निवडणुका आल्या की पैशाचे चलनवलन वाढते आणि त्या प्रक्रियेमध्ये असणारे बरेचसे लोक आपले उखळ पांढरे करून घेतात. राजकारणी लोकांच्या मते महाराष्ट्रात लांबणीवर पडलेल्या समस्यांमध्ये निवडणुका पहिल्या क्रमांकावर आहेत आणि मान्सून तिसर्‍या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात लांबणीवर पडलेला हा मान्सून लवकरात लवकर राज्यभर बरसावा, यासाठी निसर्गदेवतेकडे प्रार्थना करणे एवढेच आपल्या हाती आहे.

Back to top button