रक्तरंजित मार्गावर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’

रक्तरंजित मार्गावर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’
Published on
Updated on

'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणार्‍या जोडप्यात विसंवाद उद्भवल्यावर त्याचे पर्यावसन पुरुष सहकार्‍याकडून महिला सहकार्‍याच्या हत्येमध्ये होण्याचे प्रकार अलीकडील काळात वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 'लिव्ह इन रिलेशनशिप' या प्रकाराची वाटचाल रक्तलांच्छित मार्गाकडे चालली आहे काय, असा प्रश्न समाजधुरिणांपुढे उभा राहिला आहे. सामाजिक स्वास्थ्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यताही नजरेआड करता येत नाही.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2020-2021 या दोन वर्षांत देशभरात महिलांच्या घरगुती व जोडीदाराकडून होणार्‍या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या हिंसाचारात बळी पडणार्‍या महिलांमध्ये 11 टक्के संख्या 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणार्‍या तरुणींची आहे. देशभरात दाखल होणार्‍या महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्येही 'लिव्ह इन'मुळे मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या नावाखाली फसवणूक करून लैंगिक शोषण करणे, मारहाण करणे, आर्थिक शोषण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांतदेखील मोठी वाढ झाली असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी मोठी बोलकी आहे.

पाश्चिमात्य देशांतील चंगळवादी संस्कृतीचे अंधानुकरण भारतात होऊ लागल्यापासून ज्या जीवनशैली भारतात रूढ झाल्या, त्यातील एक म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप' ही लग्नाशिवाय स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची पद्धती. अमेरिका आणि पाश्चात्त्य राष्ट्रांत फोफावलेल्या या मुक्त सहजीवन पद्धतीने भारतातही हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. एकूणच समाज जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

देशभरातील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असतानाच, 'लिव्ह इन रिलेशनशिप'मधील खुनांच्या गुन्ह्यातही मोठी वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 'लिव्ह इन रिलेशनशिप'मधील खून झालेल्या तरुणींच्या इतक्या अमानुषरीतीने, पाशवी पद्धतीने हत्या करण्यात आल्या आहेत की, साक्षात मृत्यूचाही थरकाप उडावा. मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यातील क्रौर्य मानवतेला काळिमा फासणारे आहे. परस्परांतील मतभेद, भांडण आणि संघर्षाची परिणती एवढ्या भयभीषण पद्धतीने होत असल्याचे पाहता 'लिव्ह इन'च्या नात्याला काही अर्थ होता की नाही, असाही प्रश्न उभा राहतो. हत्या प्रकरणातून 'लिव्ह इन'ची वाटचाल रक्तरंजित तर होत नाही ना आणि त्यातून रुजू घातलेली 'लिव्ह इन'मधील ही हिंसक प्रवृत्ती समाजाला कोणत्या दिशेने भरकटत नेणार, असाही सवाल पुढे येतो.

'लिव्ह इन रिलेशनशिप'वर ज्यांचा विश्वास आहे, त्यांची श्रद्धाच नष्ट होईल, असे एक प्रकरण उदाहरण म्हणून देता येईल. ते आहे, दिल्लीतील श्रद्धा वालकर या तरुणीच्या अघोरी हत्याकांडाचे. श्रद्धा मूळची पालघरची! श्रद्धा वालकर आणि आफताब अमीन पूनावाला यांच्या लग्नाला घरातून विरोध झाला. तेव्हा ते दिल्लीत आले. 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू लागले.

काही वर्षे सुरळीत गेली आणि छोट्या-छोट्या चकमकींचे संघर्षात रूपांतर झाले आणि एक दिवस क्रूरात्मा आफताबने तिची हत्या केली. एवढ्यावर हा क्रूरकर्मा थांबला नाही. त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. 300 लिटरचा फ्रीज आणून त्यात त्याने ते तुकडे ठेवले. रोज मध्यरात्रीनंतर जंगलात जाऊन ते तुकडे तो फेकून देत असे. सहा महिन्यांनंतर खुनाला वाचा फुटली. श्रद्धाचा असा काय गुन्हा होता की, तिच्या दैवी असा निर्घृण मृत्यू यावा!

क्रूरकर्मा आफताबने श्रद्धाची हत्या करून आणि मृतदेहाचे तुकडे करूनही समाधान झाले नाही. फ्रीजमध्ये श्रद्धाचे शिर आणि तिचे इतर अवयव त्याने ठेवले होते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या शिराला तो अनेकदा थोबाडीत मारत असे, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. क्रौर्यानेही मान खाली घालावी, असे हे भयभीषण पाशवी कृत्य आहे. 'लिव्ह इन'ची वाटचाल कुठे जाऊ शकेल, याची ही झलक म्हणता येईल.

प्रेम सहजीवनात हा जो काटेरी मार्ग आला, त्याची कारणमीमांसा काय? 1992 पासून देशात आर्थिक उदारीकरणाचे धोरण अमलात आले आणि व्यवसाय, उद्योग, व्यापाराला ऊर्जितावस्था आली. उद्योग, व्यवसायात नवे भांडवल येऊ लागले. व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि बाजारपेठांच्या विस्ताराला चालना मिळाली. याबरोबरच समाजातील आर्थिक स्तरातही बदल होऊ लागला. 1990 पूर्वी देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी खूप मोठी होती आणि मध्यमवर्गीयांची संख्या मर्यादित होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा दारिद्य्ररेषेखालील लोकांची संख्या 80 टक्के होती. 2011-12 साली हीच संख्या 22 टक्क्यांवर आली. ही माहिती लोकसभेत देण्यात आली आहे.

दारिद्य्ररेषेखालील टक्केवारी कमी होत असतानाच, मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गाचा गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. 1990 मध्ये सर्वसाधारण मध्यम वर्ग एक टक्के एवढा होता. तो चौदा वर्षांनी पाच टक्क्यांवर गेला. आणखी 15 वर्षांनी हीच आकडेवारी 28 टक्क्यांवर गेली. शहरी आणि ग्रामीण भागात असा नवा सधन वर्ग तयार झाला. त्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आल्याने आर्थिक उलाढाल वाढली.

सर्वसामान्यांना विलासी राहणीचे आकर्षण असतेच. जीवनमान आणि राहणीमान वाढले, तशी विलासी राहणी, त्यातून आलेली नवी जीवनशैली, याकडे या नवश्रीमंतातील काही ओढले गेले. तरुण वर्गातील काही पॉर्न फिल्मकडे आकर्षित झाले. काहींचा व्यसनाकडे कल वळला. टी. व्ही. वरील काही मालिकांनी जीवनशैलीचे नवे वळण आपल्या मालिकांतून पुढे आणले. चित्रपटातील उत्तान द़ृश्ये वाढली. तरुणाईच्या मानसिकतेवर त्याचा प्रभाव पडला असल्यास त्यात आश्चर्य नाही.

एकत्र कुटुंब पद्धती हे भारतीय समाज व्यवस्थेचे वैशिष्ट्य होते. दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच महिला नोकरीसाठी बाहेर पडल्या आणि शहरी भागात एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस आली. गेल्या 50 वर्षांत शहरी भागात क्वचितच एकत्र कुटुंब दिसते, तर ग्रामीण भागातही आता विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत चालली आहे. शहरी भागात विशेषतः, महानगरात विभक्त कुटुंबात लहान, तरुण मुलांवर लक्ष ठेवायला कोणी वडीलधारे राहिलेले नाही. बहुतांश, कुटुंबांत पती-पत्नी दोघेही नोकरदार असतात. अशावेळी तर मुलांचे संगोपन हा एक यक्षप्रश्नच बनतो. स्वाभाविकच नव्या पिढीवर संस्कार काय होत आहेत. ही पिढी कोणत्या वातावरणात वाहत आहे, त्यांचा मित्र परिवार कोण, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.

चित्रपट, टी.व्ही. मालिका यांचा पगडा बसलेल्या या पिढीला शारीरिक आकर्षणाचा कसलाही विधीनिषेध राहत नसल्याचे वास्तव आहे. शारीरिक आकर्षण म्हणजेच प्रेम अशी समजूत या पौगंडावस्थेतील पिढीला वाटते. चित्रपटांत, मालिकांत 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट' दाखवले जाते. स्वप्नाळू मनाला ते खरेच वाटते. नवतरुण पिढी अशाच भ्रमातून 'लिव्ह इन रिलेशनशिप'कडे वळल्याची उदाहरणे आहेत.

नवतरुणांप्रमाणे प्रौढ वयातही 'लिव्ह इन'चे प्रस्थ दिसून येत आहे. करिअरच्या मागे लागून योग्य वयात लग्न न होणे आणि त्यातून एकाकी राहणे, यातून 'लिव्ह इन'कडे कल वळू शकतो. आवडी-निवडी आणि स्वभाव जुळले तर ठीक; पण तसे न होता, केवळ अल्प परिचयात 'लिव्ह इन'ची बेडी अडकवून घेतली, तर नंतर ती काचायला लागते. शारीरिक आकर्षण म्हणजेच प्रेम हा भ्रम प्रौढांनाही नडतो.

आई-वडिलांनी ठरवलेल्या, परस्पर पसंतीने झालेल्या लग्नातही अलीकडे बिघाड येत चालल्याचे, त्याची परिणती घटस्फोटात होत चालल्याचे दिसून येत आहे. अद्याप हे प्रमाण गंभीर नाही. युरोप-अमेरिकेसारखे बळावलेले नाही; पण 'लिव्ह इन'मधील हिंसाचाराप्रमाणे, नियमित पद्धतीने झालेल्या विवाह बंधनानंतरचे अत्याचारही गंभीर वळणावर चालल्याचे दिसत आहे. समाजधुरिणांनी आत्मचिंतन करावे, असा हा गंभीर प्रश्न आहे.

– सुरेश पवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news