नशेच्या व्यापाराला लगाम हवा | पुढारी

नशेच्या व्यापाराला लगाम हवा

अमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा हा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. काही दिवसांपूर्वीच केरळच्या किनारपट्टीजवळ भारतीय समुद्राच्या हद्दीत सुमारे 2,500 किलो मेथाम्फेटामीन या अमली पदार्थाचा प्रचंड साठा जप्त केल्याने पुन्हा एकदा या गंभीर प्रश्नाकडे देशाचे लक्ष वेधले गेले.

भारत सरकारकडून अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध जोरदार कारवाई केली जात आहे. नौदल आणि अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरो (एनसीबी)ची संयुक्त कारवाई पाहता आपल्याकडील सरकारी संस्थांतील समन्वय लक्षात येतो. यात किनारपट्टी लाभलेल्या राज्यांचा गुप्तचर विभाग आणि पोलिस दलालादेखील सामावून घेतले आहे. तरीही अमली पदार्थांची तस्करी छुप्या मार्गाने सुरूच असल्याचे दिसून येते. सुमारे 12 हजार कोटी मूल्यांच्या मेथाम्फेटामीनची जप्ती ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ‘एनसीबी’चे उपसंचालक (ऑपरेशन्स) संजयकुमार सिंह म्हणतात की, ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’ यांतर्गत कारवाई करण्यात आली.

या कारवाईचा उद्देश अफगाणिस्तानमार्गे भारतात येणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीला लगाम घालणे. यंदा प्रथमच अफगाणिस्तानातून आलेल्या अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा पकडण्यात यश आले आहे. याचाच अर्थ ‘एनसीबी’ला आणखी कंबर कसावी लागणार असून, यानुसार संपूर्ण देशात या बाजाराला चांगलाच चाप बसवावा लागणार आहे. अफगाणिस्तान हा पूर्वीपासूनच अफूच्या शेतीसाठी कुख्यात आहे. 1990 च्या दशकात तालिबानने सत्ता हस्तगत केली तेव्हा त्यांनी अफूची संपूर्ण शेती नष्ट केली, असे म्हणतात. परंतु, त्यानंतर बंडखोरीच्या वीस वर्षांत अमली पदार्थांचा व्यापार हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन ठरले.

आता तालिबान म्हणतात की, अफूच्या व्यापारावर बंदी असून, त्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; पण संयुक्त राष्ट्रांच्या मते, 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये अफगाणिस्तानात अफूच्या शेतीत प्रचंड म्हणजे 32 टक्के वाढ झाली आहे. यामागचे कारण म्हणजे कोणताही देश किंवा समूह हा आपल्या सोयीनुसार व्यापार सुरू किंवा बंद करू शकत नाही. हा कुख्यात बाजार लगेचच फैलावतो. अफगाणिस्तानला जगातील अमली पदार्थांची राजधानी म्हणून ओळखले जाते. तेथे 40 दशलक्ष लोकसंख्येपैकी 3.5 दशलक्ष लोक अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.

अमली पदार्थ आणि दहशतवादाचा निकटचा संबंध जगाला ठाऊक आहे. दहशतवादी संघटना जसे की लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या अमली पदार्थांच्या व्यवसायात आकंठ बुडालेल्या आहेत. एवढेच नाही, तर पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे अधिकारीदेखील या धंद्यात सामील आहेत. हा व्यवसाय बक्कळ पैसा कमावून देणारा असून, अमली पदार्थांच्या सेवनातून निर्माण होणारी नशा ही तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर विपरित परिणाम करते. त्यांची बौद्धिक क्षमतादेखील संपते. त्यानंतर ते अमली पदार्थांची तस्करी करणारे दलाल,

दहशतवादी यांच्या हातचे बाहुले बनतात. त्यांचा वापर घातपाती कारवाया करण्यासाठी केला जातो. दहशतवादी म्हणून तयार केले जाते. पाकिस्तान जाणीवपूर्वक भारताच्या सीमाभागातील राज्यांत अडथळे आणण्यासाठी ‘नार्को टेररिझम’चा वापर केला जातो. पंजाबच्या सीमाभागात लष्कराने पाकिस्तानकडून येणारे असंख्य ड्रोन पाडले आहेत. या ड्रोनमध्ये अमली पदार्थांच्या पुड्या आढळून आल्या आहेत. आता अमली पदार्थांचा बाजार वाढविण्यासाठी समुद्रमार्गाचा उपयोग केला जात आहे.

‘एनसीबी’ने गेल्या दीड वर्षात दक्षिणेकडील समुद्र मार्गाने येणार्‍या अमली पदार्थांचे मोठे साठे पकडले आहेत. आतापर्यंत 3,200 किलो मेथाम्फेटामिन, 500 किलो हेरॉईन तसेच 529 किलो हशीश जप्त करण्यात आले आहे. ‘एनसीबी’ने एक ‘मदर शीप’ असल्याची माहितीदेखील उघड केली. या जहाजाच्या माध्यमातून विविध प्रकारचे अमली पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात समुद्री मार्गाने वितरित केले जातात. अर्थात भारत सरकारच्या विविध संस्था या अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी समन्वय साधत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत; पण यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अचूक माहिती मिळवणे आणि तातडीने कारवाई करणे हाच एकमेव अचूक मार्ग आहे.

– अनिल विद्याधर

Back to top button