पैगंबर : एक आदर्श प्रेषित | पुढारी

पैगंबर : एक आदर्श प्रेषित

- शफीक देसाई

आज ईद-ए-मिलाद. त्यानिमित्त… वैश्विक व नैसर्गिक जीवनाशी तादात्म्य पावत जीवन जगण्याचे मार्गदर्शन व पैगाम देणारे मुहम्मद (स.) पैगंबर यांचे उदात्त जीवन हेच आपल्या समोर आदर्श जीवनशैलीचे उदाहरण आहे. ‘कुराण’मध्ये याचा विशेष उल्लेख आहे. ‘बेशक आपके अखलाक बुलंद हैं।’ ( कु. 68:4 ). पैगंबरांच्या आगमनापूर्वीचा काळ अज्ञान, अंधकार, स्वार्थ, हिंसा, चमत्कार, बुवाबाजी, भ्रष्टाचार, भेदभाव आदींनी ग्रासलेला व दुभंगलेला होता. समाज अज्ञानमुलक व नैतिकद़ृष्ट्या अगदी अध:पतित होता. पैगंबरांनी या सर्व गोष्टींमध्ये क्रांतिकारक बदल घडवून समग्र समाज परिवर्तन घडवून आणले. पैगंबरांनी जीवनाचे मर्म जाणले. माणसाला जगण्यासाठी सन्मान, शांती व सुरक्षितता हवी. प्रत्येक व्यक्ती एक माणूस म्हणून उच्च व श्रेष्ठ दर्जापर्यंत पोहोचला पाहिजे, तरच सर्वार्थाने एक उन्नत समाज उदयाला येईल, हे त्यांचे तत्वज्ञान. पैगंबरांना समाजामध्ये जे काही बदल घडवायचे होते, ते स्वतःच बदल बनले. स्वतःचे जीवन उच्च नैतिकता व उदात्त चारित्र्याने (बुलंद अखलाक) जगले.

समाजात उच्च व श्रेष्ठ दर्जाची वैश्विक मूल्ये रुजवत बदल व परिवर्तन घडवणे गरजेचे आहे. समाजाला सांस्कृतिकद़ृष्ट्या उच्च स्थानापर्यंत नेणे जरुरीचे आहे. अर्थातच, अशा समाजातील प्रत्येक माणूस उच्च नैतिकता व उदात्त चारित्र्य संपन्न असला पाहिजे. नेमके हेच ध्येय व उद्देश घेऊन इस्लाम आपल्या अनुयायांना व समाजाला उन्नत अवस्थेप्रत नेण्याचे कार्य करतो.

पैगंबर स्वतः निरक्षर होते. परंतु, त्यांच्या जीवनसंघर्ष व चिंतनातून ज्ञानाचे महत्त्व लक्षात आले. त्यांनी ज्ञानाला प्रथमस्थानी आणले. त्यांच्याकडे श्रेष्ठ गुण, उच्च नैतिकता आणि स्तुत्य सवयी होत्या. त्यांचे चारित्र्य निर्मळ, निष्कलंक व संशयातीत होते. त्यांच्या प्रामाणिक, खरेपणा व सचोटीने त्यांना तरुणपणीच ‘अलअमीन’ (विश्वासू) ही उपाधी मिळाली. पैगंबरांच्या तरुणपणी ‘हिल्फ उल फजूल’ नावाचे आघाडी संघटन स्थापन झाले होते, जे समाजातील दुर्बल लोकांवर होणार्‍या शोषण, जुलूम, अन्याय, अत्याचार, हिंसा यापासून त्यांचे संरक्षण व सहाय्य करील. समाजातील पवित्र गोष्टींचा अनादर व बेकायदेशीर गोष्टींपासून अटकाव करील. या आघाडीमध्ये पैगंबर सामील झाले. यातून ते चांगलेच प्रभावित झाले. पैगंबर म्हणजे गरीब, कमजोर, अनाथ, गुलाम यांचे सच्चे मित्र व रक्षकच होते. हाच तर इस्लाम व ‘कुराण’चे सार आहे.

संबंधित बातम्या

पैगंबर एक आदर्श वैश्विक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याजवळ श्रेष्ठ मानवी मूल्यांचा खजिनाच होता. त्यांच्याजवळ सजगता, आत्मविश्वास, आशावाद, ठाम निश्चय होते. त्यांचे विचार आणि कृतीमध्ये कधीच फरक नव्हता. त्यांच्या कार्याची व्यापकता व स्वरूप लक्षात घेता ते एक आदर्श प्रेषित होते. त्यांच्यावर सोपवलेले कार्य त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केले. कोणतेही काम नाउमेदीने अपूर्ण सोडले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शारीरिक, मानसिक, नैतिक अशी कोणत्याही प्रकारची दुर्बलता नव्हती. त्यांच्याजवळ असलेली सहनशीलता व संयम वाखाणण्यासारखी होती. कारण, जीवनामध्ये त्यांनी अनेक कठीण व दुर्धर प्रसंगांना तोंड दिले. पैगंबरांजवळ असलेली क्षमाशीलता म्हणजे एक उत्तम नमुनाच होय. त्यांना संपत्ती व सांसारिक साधन सामग्रीबाबत कोणतीही इच्छा नव्हती. आराम व सुखासिनतेचीही आस नव्हती. त्यांचे राहणे, खाणे व पेहराव अतिशय साधा असे. कोणतेही काम कमी दर्जाचे नाही, असे ते म्हणत. स्वतःचे काम स्वतः करीत. स्वतःचे कपडे शिवणे, चप्पल दुरुस्ती, घरकामात मदत, खड्डे काढणे, बांधकाम करणे असली कामे स्वतःच करीत. त्यांच्या जीवनाचे अतिशय बारकावे उपलब्ध आहेत. त्यांची उक्ती, कृती, प्रवचने व शिकवण यांच्या सर्व नोंदी आहेत. त्यांच्या जीवनात कोणतेही गूढ, गुपित किंवा रहस्ये नाहीत. त्यांनी जी तत्त्वे व शिकवण दिली, त्याचेच आचरण स्वतः केले.

पैगंबरांनी अतिशय साधे-सोपे परंतु तर्कबुद्धीसंगत व व्यवहार्य तत्त्वज्ञान सांगितले. सर्वश्रेष्ठ उत्कृष्टता व महत्तम परिपूर्णता त्यामध्ये होती. सत्य, अस्सल, खरा व शुद्ध एकेश्वराचा मार्ग त्यांनी दाखवला. पैगंबरांनी सर्वोत्तम धार्मिक, आध्यात्मिक, नैतिक व भौतिक विचारांच्या योगदानाने संपूर्ण मानवजातीचे आमूलाग्र उन्नयन, प्रगती व सुधारणा घडवून आणली. पैगंबरांनी एक उदात्त नैतिक जीवन व चारित्र्य याचा आदर्श आपल्या समोर ठेवला.

Back to top button