ग्रामीण ग्राहकांसमोरील आव्हाने

ग्रामीण ग्राहकांसमोरील आव्हाने

'सेंटर फॉर मॉनटरिंग इंडियन इकॉनॉमी'च्या (सीएमआयई) अलीकडेच झालेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात ग्राहकांच्या मागणीत वेगाने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. ग्रामस्थांची खरेदी क्षमता वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यात ग्रामीण भागात वाढलेले उत्पन्न हा एक महत्त्वाचा घटक. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील जीवनमान उंचावले आहे. सरकारने यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत.

'सेंटर फॉर मॉनटरिंग इंडियन इकॉनॉमी'च्या (सीएमआयई) अलीकडेच झालेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात ग्राहकांच्या मागणीत वेगाने वाढ होत आहे. टीव्ही, फ्रीज, कूलर, पंखा, एसी आदींची मागणी कोरोना काळानंतर 25.82 टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल 2020 चा काळ हा टीव्ही, फ्रीज, कूलर, एसी, पंखे, ट्रॅक्टर, दुचाकी वाहन आदी खरेदीसाठी चांगला असल्याचे 2.03 टक्के ग्रामीण भागातील ग्राहकांना वाटत होते; परंतु आता चित्र बदलले आहे. आता 27.85 टक्के ग्रामीण ग्राहकांना सध्याचा काळ हा खरेदीसाठी सर्वोत्तम काळ असल्याचे मानले आहे. एप्रिल 2019 मध्ये ग्रामीण भागातील 29.74 टक्के नागरिकांना स्वत:ची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे वाटत होते; मात्र मे 2021 मध्ये असे मत मांडणार्‍यांचे प्रमाण केवळ 2.93 टक्क्यांवर आले. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मार्च 2024 नंतर ही संख्या वाढत ती 31.60 टक्के झाली.

वाहन उद्योगांतही ग्रामीण ग्राहकांची सक्रियता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी, आर्थिक वर्ष 2020-23 च्या दुसर्‍या तिमाहीत दुचाकी वाहनांची विक्री 30.3 टक्क्यांनी आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत 16.1 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले होते. यावरून वाहन खरेदीत ग्रामीण ग्राहकांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येते. ग्रामस्थांची खरेदी क्षमता वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यात ग्रामीण भागात वाढलेले उत्पन्न हा एक महत्त्वाचा घटक. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील जीवनमान उंचावले आहे. सरकारने यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. यात गरिबी आणि सामाजिक असमानता दूर करणे, सामाजिक सुरक्षा, उत्पन्नाच्या संधी, उपजीविकेचे पर्याय उपलब्ध करून देणे आणि देशातील वंचित गटांचे जीवन उंचावण्यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध विकासकामांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. 87.8 कोटी नागरिक खेड्यात राहतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात ग्राहक आहेत. शहरीकरणाचे प्रमाण वाढत असतानाही 2040 पर्यंत देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या गावातच राहील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची क्रयशक्ती आणि खर्चाची क्षमता वाढवणे देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. परिणामी, उत्पादनात वाढ होईल. उत्पादन वाढले तर रोजगार वाढेल आणि शेवटी प्रति व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होईल. या गोष्टी जीडीपी वाढविण्यात महत्त्वाचे योगदान देतील आणि देशाला आर्थिक महासत्ता करण्यात मदत करतील.

ग्राहकांची मागणी वाढण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागात अधिकाधिक ग्रामीण बँका, सहकारी समिती, शाळा यांची संख्या वाढवत सामाजिक-आर्थिक पायाभूत रचनेचा विकास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, वीज, ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य सुविधा यासारख्या सामुदायिक सेवा आणि सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि व्याप्ती आवश्यक आहे. कृषी उत्पन्न वाढविणे, अधिकाधिक पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण हस्तशिल्प उत्पादनांना प्रोत्साहित करणे आणि त्यांचे सक्षमपणे वितरण करण्याची व्यवस्था उभी करणे यासारखे प्रभावीपणे उपाय करणे आवश्यक आहे, तरच ग्रामीण भागातील उत्पादन, मागणी आणि उत्पन्नात वाढ होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news