उत्कंठावर्धक तपासकथा! | पुढारी

उत्कंठावर्धक तपासकथा!

सध्या जमाना वेब सीरिजचा आहे. चित्रपटांच्या माध्यमातून होणारे मनोरंजन आणि दूरचित्रवाणी मालिकांमुळे निर्माण होणारी उत्कंठा वेब सीरिजपुढे कुठल्याच पातळीवर टिकत नाही. वेब सीरिजचा अवकाशही कमी पडावा, असा मालमसाला दीड वर्षांपूर्वी घडलेल्या आर्यन खान प्रकरणामध्ये होता, हे आता बरेचसे स्पष्ट झाले आहे. आर्यन खानला खोट्या प्रकरणात अडकवल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर आणि त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर रुढार्थाने हा विषय संपायला हवा होता. कारण, विनाकारण तुरुंगात खितपत पडणारी व्यक्ती निर्दोष सुटल्यानंतर पडद्यावर ‘दी एंड’ची पाटी पडत असते. परंतु, इथे एक चित्रपट संपल्यानंतर त्याचा पुढचा भागही प्रदर्शित झाला. ज्या अधिकार्‍याने कारस्थान करून निर्दोषांना अडकवले, त्यांच्या कारवायांचे पितळ उघडे करण्याचे काम या दुसर्‍या भागातून झाले. अमली पदार्थविरोधी विभागाचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केंद्रीय अन्वेषन विभागाने (सीबीआय) दाखल केलेला गुन्हा म्हणजे अधिकारांचा गैरवापर करणार्‍या, सरकारी यंत्रणा, पद आणि अधिकारांचा मनमानीपणे वापर करणार्‍या आणि व्यक्तिगत हितसंबंध जोपासत सरकारच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवणार्‍या अधिकार्‍यांसाठी हा इशाराच म्हणावा लागेल.

खरे तर हे प्रकरण चव्हाट्यावर येण्याचे तसे कारणही नव्हते; परंतु ज्यांना या प्रकरणात अडकवण्यात आले, त्यांनी ते उजेडात आणले आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने ते कोणत्याही दबावासमोर न झुकता तडीस नेले. या प्रकरणात तत्कालीन मंत्र्याचा जावईही अडकला होता. (सध्या हे तत्कालीन मंत्री दुसर्‍या प्रकरणात कोठडीत आहेत.) जावयाला कोणताही गुन्हा नसताना त्यात अडकवण्यात आल्याचा त्यांचा दावा होता. दुसर्‍या प्रकरणात चित्रपट अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्यातून एनसीबीविरोधातील आयते पुरावे हाती आले. के. पी. गोसावी नामक पंचाचा आर्यन खानसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यामुळे या प्रकरणातील अनेक त्रुटी समोर आल्या.

ताब्यात घेतलेल्या संशयितांना खासगी व्यक्तींच्या सोबत एनसीबीच्या कार्यालयात आणणे, खासगी व्यक्तींनी संशयितांची चौकशी करणे, त्यांच्या घरी फोन लावून देणे असे अनेक प्रकार घडल्याचे उघड झाले. एनसीबीसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा असलेल्या संस्थेच्या द़ृष्टीने हे संस्थेच्या व्यावसायिक चौकटीचा भंग करणारे होते. त्यामुळे प्रारंभीच्या काळात वानखेडे यांची आणि त्यांनी केलेल्या तपासाची पाठराखण करणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नंतरच्या काळात त्यापासून स्वतःला वेगळे करून घेतले. शाहरूख खानचा मुलगा आणि एका अभिनेत्रीचा पती असलेला अधिकारी यांच्यापुरते हे प्रकरण सर्वसामान्यांसाठी मर्यादित असले, तरी त्याची व्याप्ती खूप मोठी होती. एनसीबी ही संस्था अमली पदार्थविरोधी मोहिमेत जगभरातील अनेक संस्थांसोबत समन्वय राखून काम करीत असते. अशा संस्थेच्या प्रतिमेची मोठ्या प्रमाणावर हानी या प्रकरणामुळे झाली.

अनेक राजकीय कंगोरे असूनसुद्धा ‘एनसीबी’ने प्रकरण धसास लावले. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला आणि विविध ठिकाणी छापे टाकले असले, तरीसुद्धा मुळात ‘एनसीबी’च्या दक्षता पथकाचा अहवाल यासंबंधी महत्त्वाचा ठरला. अहवालाच्या आधारेच समीर वानखेडे यांच्यासह ‘एनसीबी’चे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंह, तत्कालीन गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन यांच्यासह खासगी पंच के. पी. गोसावी, सॅन्विल डिसोझा आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात सीबीआयने खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात स्वतंत्र पंच असलेल्या के.पी. गोसावीने आर्यन खानला सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे 25 कोटींची मागणी करून 18 कोटींवर तडजोड केल्याचे आणि त्यापैकी पन्नास लाख रुपये स्वीकारल्याचे अहवालात म्हटले आहे.

त्याव्यतिरिक्त इतरही काही गोष्टी अहवालातून समोर आणण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2 ऑक्टोबर 2021 रोजी अमली पदार्थविरोधी कारवाई करण्यात आली, तेव्हा काही संशयितांची नावे पहिल्या माहिती अहवालातून वगळून इतर काही आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. पहिल्या माहिती अहवालात 27 संशयितांच्या नावांचा समावेश होता; मात्र सुधारित अहवालातून त्यातील काही नावे वगळण्यात आली होती. संशयितांची संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली; मात्र त्याबाबत कागदोपत्री नोंद करण्यात आली नाही.

काही संशयितांना गुपचूप सोडून देण्यात आल्याचाही आरोप आहे. समीर वानखेडे यांनी आपल्या अधिकारांत के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांना कारवाईत स्वतंत्र पंच म्हणून घेण्यास मान्यता दिली होती. तसेच संशयित आरोपींना हाताळण्यासाठी गोसावी याला परवानगी दिली होती. त्यामुळे संशयित हे गोसावी याच्याच ताब्यात असल्याचे चित्र उभे करण्यात आले होते. या सर्व बाबी मर्यादाभंग करणार्‍या आणि एनसीबीच्या कार्यपद्धतीला हरताळ फासणार्‍या होत्या. वानखेडे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये काहीही नियमबाह्य आढळले नसल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे; मात्र वानखेडे यांना आपल्या परदेश दौर्‍यांचे नीट स्पष्टीकरण देता आलेले नाही, तसेच परदेश दौर्‍यांवरील खर्चाची चुकीची माहिती दिल्याचे उघड झाले आहे.

आपल्या परदेश दौर्‍यांचे स्रोतही त्यांनी जाहीर केलेले नाहीत. वानखेडे यांनी विभागाला न कळवता महागड्या मनगटी घड्याळांची विक्री आणि खरेदी केल्याचेही चौकशीत आढळले. यंत्रणांचा गैरवापर करून सामान्य लोकांना कशारीतीने छळले जाते, याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आर्यन खान प्रकरणाकडे पाहता येते. अधिकारी स्वप्रतिमेच्या प्रेमात पडले की, संस्थेची प्रतिष्ठा पणाला लावत असतात. या प्रकरणाचे जे तपशील समोर आले, त्यातून अधिकार्‍यांची मनमानी सिद्ध झाली असली, तरी शेवटी संस्थाच श्रेष्ठ असते, यावरही शिक्कामोर्तब झाले. या सगळ्या काळामध्ये मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीला म्हणजे बॉलीवूडलाही आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल झाले असले, तरी न्यायालयाच्या पातळीवर ते कसे सिद्ध होतात, हे पाहावे लागेल.

Back to top button