तोडीस तोड संघटनेमुळे काँग्रेसला यश | पुढारी

तोडीस तोड संघटनेमुळे काँग्रेसला यश

सुरेश पवार  

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नेत्रदीपक यश मिळाले आणि मरगळलेल्या काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी प्राप्त झाली. निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही बाजूंनी अनेक मुद्दे पुढे आणले गेले आणि हिरीरीने ते जनतेपुढे मांडण्यात आले. भाजपने सर्व शक्तीनिशी आपली सारी संघटना प्रचारात उतरविली आणि काँग्रेस संघटनेनेही आपली सारी ताकद पणाला लावली. काँग्रेस विजयाची आणि भाजपच्या पराभवाची कारणे इतरही अनेक आहेत. पण कर्नाटकात काँग्रेस संघटना अन्य काही राज्यांप्रमाणे खिळखिळी न होता चांगल्या स्थितीत राहिली. काँग्रेसच्या विजयाच्या समीकरणात संघटनात्मक ताकद हाही मुद्दा महत्त्वाचा म्हटला पाहिजे.

उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या मोठ्या राज्यांत काँग्रेस संघटना नगण्य स्वरूपात उरली असताना कर्नाटकात मात्र काँग्रेस संघटनेने आपली ताकद टिकवून ठेवली आहे. काँग्रेसचे 2004 मध्ये 65, 2008 मध्ये 80, 2013 मध्ये 122, 2018 मध्ये 80 आणि आता 2023 मध्ये 135 आमदार निवडून आले. त्यात संघटनेचा महत्त्वाचा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. याच काळात काँग्रेसची मतदानाची टक्केवारीही 35 ते 39 टक्क्यांपर्यंत कायम राहिली. याउलट भाजपची मतदानाची टक्केवारीही 30 ते 36 या दरम्यान राहिली. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदानाच्या टक्केवारीत तब्बल चार टक्क्यांनी वाढ झाली तर भाजपची मतदान टक्केवारी एक टक्क्याने घसरली. मतदान टक्केवारी सातत्याने राखण्यात आणि ती वाढविण्यात संघटनेचा हातभार लागलेला आहे, हे निर्विवाद.

भाजपमधील गटबाजी

गटबाजी ही काँग्रेसच्या पाचवीला पुजलेली आहे, असे नेहमी सांगितले जाते. एकेकाळी काँग्रेस संपूर्ण देशात बलाढ्य होती, तेव्हा काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते, असे म्हटले जात असे. एकेकाळी शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये अलीकडे गटबाजीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकातील भाजपमध्ये गटबाजीचा प्रादुर्भाव दिसून आला. या पक्षात आता किमान पाच गट असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकात पक्ष वाढवण्यात महत्त्वाचा वाटा असलेले माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचा गट आणि धर्मनिरपेक्ष जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा गट हे दोन प्रमुख गट. बसवराज बोम्मई हे जनता दलाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय एस. आर. बोम्मई यांचे चिरंजीव. या दोन गटाशिवाय भाजपचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते स्व. अनंतकुमार यांचे सहकारी बी. एल. संतोष यांचा तिसरा गटही पक्षावर वर्चस्व ठेवण्यात आघाडीवर आहे. स्व. अनंतकुमार यांना पक्षात महत्त्वाचे स्थान होते. तसेच आपल्याला मिळावे, यासाठी संतोष यांचे प्रयत्न असतात. यावेळी झालेल्या तिकीट वाटपात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले माजी मंत्री सी. टी. रवी हे आणखी दोन गट आहेत. पार्टी वुईथ डिफरन्स म्हटल्या जाणार्‍या भाजपमधील या गटबाजीचा परिणाम निकालावर झाला असल्यास आश्चर्य वाटायला नको.

कर्नाटक काँग्रेस पक्षातही डी. के. शिवकुमार आणि जनता दलातून आलेले सिद्धरामय्या असे दोन प्रबळ गट आहेतच. तथापि, यावेळी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी परस्पर समजुतीने आणि सहकार्याने निर्णय घेतले. गटबाजीला थारा मिळाला नाही. काँग्रेसच्या यशाचे हेही महत्त्वाचे कारण म्हणता येईल.

भारत जोडो यात्रा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात 3,570 किलोमीटर एवढी भारत जोडो यात्रा काढली. कर्नाटकातील विधानसभेच्या 21 मतदारसंघांतून या यात्रेने प्रवास केला. त्यात वीसपैकी 15 मतदारसंघांत काँग्रेसला यश मिळाले. राहुल गांधी यांच्या यात्रेने संघटनेत चैतन्य निर्माण झाल्याने हे यश त्याचे द्योतक म्हणता येईल.

काँग्रेसने 40 टक्क्याचे सरकार या मुद्द्यावर रान उठवले; तर भाजपने हिंदुत्वाचा नारा दिला. या प्रचाराच्या गदारोळात मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसकडे वळली, असा निष्कर्ष निघू शकतो. प्रचाराच्या मुद्द्यांचा मतदारांवर परिणाम झाला असणारच; पण मतदार बाहेर काढायला आणि मतदान घडवून आणायला सक्षम संघटनाच आवश्यक असते. भाजपकडून नेहमी बूथवार नियोजन केले जाते. काँग्रेस पक्षाने त्याला तोडीस तोड उत्तर दिल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसच्या मतदानाच्या टक्केवारीत चार टक्क्यांची वाढ झाली. त्यात संघटनात्मक ताकदीचा महत्त्वाचा वाटा म्हटला पाहिजे. ज्या राज्यात काँग्रेसची संघटना सक्षम आहे, तिथे काँग्रेसला यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची नामोनिशाणी दिसत नाही आणि तिथे विधानसभेच्या दोन अंकी जागा गाठताना काँग्रेसची दमछाक होते. या उलट राजस्थान, छत्तीसगड येथे काँग्रेस सत्तेवर आहे. मध्य प्रदेशातील पक्षाची सत्ता गटबाजीने गेली. तरी तिथे संघटना टिकलेली आहे. आता या तीन राज्यांत प्रचाराचे मुद्दे काहीही असले, तरी मतदार वळविण्याचे आव्हान काँग्रेस संघटनेपुढे आहे.

Back to top button