मुंबईचे रणांगण आखले : सहा मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट | पुढारी

मुंबईचे रणांगण आखले : सहा मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांतील लढतींचे चित्र महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला स्पष्ट झाले. काँग्रेसने उत्तर मुंबईत प्रवक्ते भूषण पाटील यांना उतरवले असून, शिवसेना शिंदे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतून आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदेंची शिवसेना आणि भाजपा मुंबईत प्रत्येकी तीन-तीन जागा लढणार असून प्रत्येकी तीन जागांवर शिंदे गट व ठाकरे गट आमने-सामने आहेत.

येत्या 20 मे रोजी अखेरच्या टप्प्यात मुंबईत मतदान होत असून, पुढील अठरा दिवस संपूर्ण महामुंबईत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 18 दिवसांत प्रचार पूर्ण करण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. या दिवसात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या सभांनी मुंबई ढवळून निघणार आहे. मुंबईत 3 मे रोजी म्हणजे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. ही मुदत जवळ येवून ठेपली तरी काही मतदारसंघ उमेदवारांच्याच प्रतीक्षेत होते. मंगळवारी शिंदे गटाने व काँग्रेसने मुंबईतील आपल्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा केली आणि ही प्रतीक्षा मंगळवारी संपली.

भाजपची दक्षिण मुंबईत माघार

दक्षिण मुंबई मतदारसंघावरुन महायुतीत भाजप आणि शिंदे गटात वाद होता. भाजपाने ही जागा प्रतिष्ठेची करत येथून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा या दोघांपैकी एकाला निवडणूकीच्या मैदानात उतरविण्याची तयारीही केली होती. त्यांना प्रचाराला लागण्याचे आदेशही दिले होते. मात्र, शिंदे गटाने दक्षिण मुंबईवरील आग्रह कायम ठेवल्याने भाजपला येथून माघार घ्यावी लागली. त्यानुसार शिंदे गटाने येथून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देत येथील वादावर पडदा टाकला आहे. त्यांचा सामना आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे.

काँग्रेसने रिंगणात उतरविला नवखा उमेदवार

काँग्रेसने सुरुवातीला सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबईच्या जागेचा पर्याय शिवसेना ठाकरे गटाला दिला होता. हा पर्याय पुढे न सरकल्याने काँग्रेसने विनोद घोसाळकर अथवा त्यांची स्नुषा तेजस्विनी घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर उत्तर मुंबईतून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ठाकरे गटाने तो अमान्य केल्याने काँग्रेसने नव्याने उमेदवाराचा शोध सुरू केला होता. काँग्रेस उत्तर मुंबईतून एखाद्या सेलिब्रिटीची उमेदवारी देईल, अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा निराधार ठरवत काँग्रेसने भूषण पाटील यांना पियूष गोयल यांच्या विरोधात उतरविले आहे. पाटील हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवित असून ते मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.

महायुतीला बदलावे लागले उमेदवार

महायुतीने आपल्या विद्यमान खसादारांना नारळ दिला. सर्वेक्षणात हे उमेदवार जिंकणार नाहीत, अशी माहिती मिळाल्याने हे उमेदवार बदलावे लागल्याचे सांगितले जात आहे. भाजपने आपले तीनही विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक व पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारली. शिवसेना(शिंदे) गटाकडील गजानन कीर्तीकर यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला तर दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार ठाकरे गटासोबत असल्याने शिंदे गटाला नवा चेहरा द्यावा लागला. महाविकास आघाडीकडूनही वर्षा गायकवाड, भूषण पाटील, अमोल कीर्तीकर व अनिल देसाई हे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

आवाज बुलंद करणार : वायकर

दिल्लीचे स्वप्न मी कधीच पाहिले नव्हते. मला महाराष्ट्रातच काम करायचे होते. मात्र, राजकारणात आणि विधिलिखीत काहीही घडू शकते, असे सांगतानाच रविंद्र वायकर म्हणाले, मी चारवेळा नगरसेवक, तीनवेळा आमदार असून ही अविरत सेवा झाल्याने वायकर म्हणजे काम हे समिकरण आहे. मी लोकसभेत शेवटच्या बाकावर बसायला जात नसून पहिल्या किंवा दुसर्‍या बाकावर बसून महाराष्ट्र आणि मुंबईचा आवाज बुलंद करून अनेक कामे मार्गी लावणार आहे.

विश्वास सार्थ ठरवणार – यामिनी जाधव

मला उमेदवारी मिळाल्याबद्दल मी महायुतीचे आभारी आहे. माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक, महायुतीचे घटक पक्ष मिळून हा विश्वास नक्कीच सार्थकी लावला जाईल, असा विश्वास यामिनी जाधव यांनी व्यक्त केला. प्रत्येक निवडणूक आव्हानात्मक असते आणि हा विचार करूनच निवडणूक लढायची असते, अशी जिद्दही त्यांनी बोलून दाखवली.

वायकरांमुळे लढाई सोपी : सचिन अहिर

रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन आमची उत्तर पश्चिम मुंबईची लढाई आणखी सोपी केली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे. मी शिंदे गटाचे अभिनंदन करतो. तुम्ही आम्हाला ही निवडणूक सोपी करुन दिली. रवींद्र वायकर हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी कुठल्या परिस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या जोगेश्वरीमधून रवींद्र वायकर निवडून येत होते, तिथेच आम्हाला पहिले मताधिक्य प्राप्त होईल ही निवडणूक आता आम्हाला सोपी झाली, असा टोला अहीर यांनी शिंदे गटाला लगावला.

ठाणे, नाशिक, पालघरचा पेच कायम

भाजपने दक्षिण मुंबईत नमते घेतले असले तरी ठाणे, पालघर आणि नाशिकच्या जागेबाबत भाजप माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे या तीन जागांचा पेच कायम आहे. ठाण्याची जागा शिंदे गटाला सोडली जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी नाशिक आणि पालघरच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याविषयी असलेली नाराजी आणि सर्वेक्षण अहवालाच्या निष्कर्षाचे दाखले देत भाजपने नाशिकची जागा लढविण्याची तयारी केली आहे. पालघर, नाशिकसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या 3 मे रोजी संपत आहे. त्यामुळे दोन दिवसात गुरुवारपर्यंत या दोन जागांचा निर्णय महायुतीला घ्यावा लागणार आहे.

मुंबईत पुढील 18 दिवस प्रचाराचा उडणार धुरळा
तीन मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना
दोन मतदारसंघांत काँग्रेस विरुद्ध भाजप लढणार
मुंबई उत्तर पूर्वमध्ये मात्र ठाकरेंचा भाजपशी सामना

उत्तर पश्चिम मुंबई

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल गजानन कीर्तिकर यांच्याविरुद्ध कुणाला उभे करायचे असा यक्षप्रश्न शिंदे गटासमोर होता. तो मंगळवारी सुटला. कीर्तिकरांची टक्कर आता जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांच्याशी होईल.

उत्तर मध्य मुंबई

उत्तर मध्य मुंबईत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड असा सामना होऊ घातला आहे.

उत्तर मुंबई

उत्तर मुंबईत भाजपचे केेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी काँग्रेसचे भूषण पाटील लढत देतील.

ईशान्य मुंबई

मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईत भाजपचे आमदार मिहीर कोटेचा विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील अशी लढत होत आहे.

दक्षिण मध्य मुंबई

दक्षिण मध्य मुंबईत विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई अशी लढत आधीच जाहीर झालेली आहे.

दक्षिण मुंबई

दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांची लढत आता शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याशी होईल.

Back to top button