भरारी : कठीण वज्रास भेदू ऐसे! | पुढारी

भरारी : कठीण वज्रास भेदू ऐसे!

‘वज्रादपि कठोराणि, म्रुदूनि, कुसुमादपि’ या संस्कृत सुभाषितामधून वर्णन केलेल्या वज्रापेक्षाही कठोर म्हणजेच अत्यंत टणक, कमालीचा संयम आणि टिकाऊपणा अंगी असणे. वज्र हा शब्द उच्चारला की, आठवतो तो चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खांद्यावर बॅट घेऊन एखाद्या पहाडासारखा उभा असलेला क्रिस गेल. फक्त 66 चेंडूंमध्ये नाबाद राहून वैयक्तिक 175 धावांचा डोंगर रचणारा गेल हा एखाद्या वज्रापेक्षा कमी कठोर नाही, हे त्याने तुफान फटकेबाजी करीत दाखवून दिले होते.

सध्या ‘आयपीएल’चा हंगाम जोरात सुरू आहे. चौकार आणि षटकारांच्या चर्चांचे वारे देशभर घराघरात आणि गल्लीगल्लींतून वाहत आहेत. असाच एक महाविक्रम 2013 सालच्या ‘आयपीएल’ हंगामात बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर घडला. रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना वेस्ट इंडिजचा स्टॉलवर्ट ख्रिस गेल पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांसमोर जणू काळ बनून उभा ठाकला. 66 चेंडूंत 17 उत्तुंग षटकारांचा पाऊस, 13 चौकारांचा वर्षाव आणि विश्वविक्रमी 263 धावांचा डोंगर. या 263 धावांमध्ये 175 धावा एकट्या भीमपराक्रमी गेलच्या. 27 व्या चेंडूला 11 वा सिक्सर मैदानाबाहेर भिरकावून गेलने अतिजलद शतक ठोकले होते. आजपर्यंत अबाधित असलेला स्वत:च्या 175 धावांचा विश्वविक्रमी डोंगर रचत त्याने संघाला अभेद्य अशी 263 धावांची भक्कम तटबंदी उभारून दिली. प्रतिस्पर्ध्यांसमोर हे अकल्पित आव्हान उभे करताना त्याने फक्त 5 एकेरी धावा काढल्या होत्या. आणखी एक आश्चर्य म्हणजे, 175 धावा कुटताना तो फक्त 4 डॉट बॉल खेळला. षटकार आणि चौकार ठोकताना भरभक्कम शरीराचा गेल केवळ उभा राहून सहज चेंडू सीमापार लिलया भिरकावत होता.

‘आयपीएल’मधील 2013 साली रचलेला 66 चेंडूत 17 षटकार, 13 चौकार, 263 सांघिक धावा आणि वैयक्तिक 175 नाबाद धावांचा क्रिस गेलचा सर्वकालिक महान असा हा विश्वविक्रम आज 10 वर्षांनंतरही कोणताही क्रिकेट संघ आणि कोणताच खेळाडू मोडू शकलेला नाही. तेव्हा क्रिस गेल हा वज्राहूनही कठीण होता, असेच म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या

गेलच्या विश्वविक्रमानंतर जगभरातील क्रीडा समीक्षक, समालोचक आणि क्रिकेटतज्ज्ञांनी त्याच्यावर अभिनंदन अन् कौतुकाचा वर्षाव केला. काहींनी त्याच्यातील अंगभूत गुण आणि बुद्धिचातुर्यावर चर्चासत्र घेतले. बहुतांश समीक्षकांनी क्रिकेटप्रति असलेले गेलचे समर्पण
(Dedication), कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा संयम ढळू न देता स्वत:वर ठेवलेले कमालीचे नियंत्रण (Controll), आपल्या संघाप्रती असलेली बांधिलकी (Commitment) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेलने त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे पुणे वॉरियर्सचे स्वीकारलेले आव्हान ( Challenge ) या गुणांची स्तुती केली.

परिस्थिती मैदानावरची असो की परीक्षेतील असो, ती बदलण्यासाठी नेटाने प्रयत्न केले आणि अशा प्रयत्नांना कठोर परिश्रमामध्ये बदलले, तर त्याचे केंद्र आपल्यात सातत्य ठेवते. तुमच्यात लढवय्येपणा नसेल, तर तो निर्माण करून बाणवावा लागतो. परिस्थिती पाहून रणनीती आखावी लागते. झुंजार लोक केवढे मोठे हे संकट असे म्हणून भयभीत, गर्भगळीत होण्यापेक्षा संकटातून निर्माण झालेल्या व्यापक नियंत्रण कक्षाच्या फळीवर उभे राहून त्या प्रसंगाकडे संकट म्हणून न पाहता आव्हान म्हणून पाहू लागतात. या संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्या गुणाचा वापर करावा, याचा विचार करून त्यानुसारच ते आव्हान स्वीकारतात आणि अशा लढाया ते सहज जिंकतात. परीक्षा कितीही अवघड असू दे, आव्हान स्वीकारून त्याला सामोरे जाणारेच शेवटी यशवंत ठरतात.

– देविदास लांजेवार

Back to top button