उत्तराखंडमधील वणवा

उत्तराखंडमधील वणवा

उत्तराखंडमधील जंगलात पेटणारे वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील सर्व पर्वतीय जिल्हे हे आगीच्या विळख्यात अडकत आहेत. मग गढवाल क्षेत्र असो, कुमाऊं, अलकनंदा जमीन संरक्षण वन विभाग क्षेत्र असो, लॅसडाऊन असो, चंपावत असो, अल्मोडा असो, पिठोरागड असो किंवा केदारनाथचा विभाग असो, या सर्व ठिकाणी आग धगधगत आहे. आतापर्यंत राज्यात आगीच्या 575 पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत आणि 6899.89 हेक्टरपेक्षा अधिक वनसंपदा नष्ट झाली आहे.

उत्तराखंडमधील जंगलात पेटणारे वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यातील सर्व पर्वतीय जिल्हे हे आगीच्या विळख्यात अडकत आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी लष्कराने पुढाकार घेतला आहे. 'एनडीआरएफ'ची तुकडीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. हवाई दलाची हेलिकॉप्टर पाण्याचा शिडकावा करत आहेत. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांत दक्षतेचा इशारा दिला आहे. पिठोरागडमधील अस्कोट हरीण अभयारण्याचे जंगल, गॅरसेन येथील आयुर्वेदिक रुग्णालय, जीआयसीही आगीपासून वाचू शकले नाही. शेकडोच्या संख्येने अक्रोड, सफरचंद, पेरूसह इतर फळांची हजारो झाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गोचरमध्ये सिरकोट, बाभनटिका, धुंधला आणि गौरीछालचे जंगलही आगीने व्यापले आहे.

वैजनाथाच्या रांगातील गैरलेख, पुरडा, अमोल आणि धौलादेवी ब्लॉक वन पंचायत, छल्ली, पनुवानोला, धन्या, बातकुना तसेच धमरधर आणि पौडी बँडजवळील जंगलातही धुमसत आहे. गोपेश्वरच्या सिरोसिनजी जंगलाचा निम्म्यापेक्षा अधिक भाग 'स्वाहा' झाला आहे. चंपावत येथील क्रांतेश्वरचे जंगलही बेचिराख झाले आहे. टनकपूर येथे आगीमुळे नागरी वस्त्या आणि जंगल धुमसत आहेत. पहाडपाणी, दिनी पंचायत, धारीचे जंगलही होरपळून निघत आहेत. नैनितालच्या आगीने आकाशात निळसर धुराचा स्तर निर्माण झाला आहे. वन विभागाच्या कर्मचार्‍यांना पाण्याचे टँकर, एअर ब्लोअर, मशिन आणि आग आटोक्यात आणणारे उपकरणे दिली आहेत.

वास्तविक उत्तराखंडच्या जंगलातील शुष्क वातावरण, मानवाचा वावर, वीज कोसळणे, हवामान बदल यासारख्या कारणांमुळे दरवर्षी सतत आगीच्या घटना घडत असतात. उत्तराखंडच्या पर्वतरांगा देवदार झाडांनी भरलेल्या आहेत. आगीचे प्रमुख कारण म्हणजे देवदार झाडाच्या गळून पडणार्‍या फांद्या. याशिवाय देवदारमधून पडणारा लिसा नावाचा पातळ पदार्थ हा आग लागल्यानंतर पेट्रोलप्रमाणे काम करतो, आग वेगाने पसरवतो. देवदारची झाडे ही प्रामुख्याने कोरड्या आणि शुष्क जमिनीवर वाढतात. तेथे पाण्याची गरज भासत नाही. ते झाड मातीचा घट्टपणा मोकळा करत पाण्याचा स्रोत संपवून टाकते.

उन्हाळ्यात त्याची पाने लगेचच आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात आणि काही मिनिटांत आगीचे रौद्ररूप धारण होते. सध्याचा काळ हा पर्वतरांगांवरील शेतीतील काडीकचरा गोळा करण्याचा असतो. शेतीची साफसफाई करून कचरा एकत्र केला जातो आणि तो पेटवून दिला जातो. वार्‍यामुळे ती आग एका जंगलातून दुसर्‍या जंगलात पसरते. त्यामुळे केवळ वित्तहानीच नाही तर हजारो, लाखो एकरांवरील जंगले नष्ट होतात. हरित संपदा, जैव विविधता, कीटक, वन्यजीव असंख्य प्रजातींनाही त्याचा फटका बसतो. आगीमुळे नष्ट झालेला भाग पुन्हा उभा करण्यासाठी सरकारला दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.

आगीसाठी देवदारची झाडे आणि चिक कारणीभूत असल्याचे लक्षात घेता या भागात ओकची झाडे लावण्याची मागणी केली जात आहे; मात्र याबाबत सरकार उदासीन आहे. ओकची झाडे ही उत्तराखंडमध्ये समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर आढळून येतात. वातावरणातील आर्द्रता शोषून ती जमिनीर्यंत पोहोचविण्याचे काम करणारे ओक हे जगातील एकमेव झाड आहे. या कारणामुळे ओकची झाडे असणार्‍या ठिकाणी पाण्याचे प्रमाणही चांगले असते. नैसर्गिक असंतुलनाच्या काळात पाण्याचे स्रोत आटत असताना ओकची झाडे लावणे ही काळाची गरज आहे. त्याची पाने पावसातील पाण्याच्या तीव्र प्रवाहाला रोखण्याचे काम करतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news