तेलबियांचे उत्पादन वाढविण्याची गरज | पुढारी

तेलबियांचे उत्पादन वाढविण्याची गरज

बहुतांश खाद्यान्नांच्या उत्पादनात आपण केवळ आत्मनिर्भरता मिळवलेली नाही, तर जागतिक बाजारपेठेतदेखील वर्चस्व प्रस्थापित केले आहे. परंतु, डाळी आणि तेलबियांसाठी आपण अन्य देशांवर अवलंबून आहोत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे या पिकांच्या लागवडीचे घटते क्षेत्रफळ.

डाळी आणि तेलबियांच्या पिकांचा विकास होण्यासाठी आजवर अपेक्षेप्रमाणे कामही झाले नाही. आता सरकारने याद़ृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यात या पिकांना किमान आधारभूत मूल्य देण्याची प्रक्रिया सुरू झाली. कृषी शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन सुरू केले आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षांत तेलबियांच्या उत्पादन्नात विक्रमी वाढ होताना दिसून येत आहे. मोहरीच्या शेतीला कमी खर्च लागतो आणि सिंचनाचीदेखील फारशी गरज भासत नाही. आजकाल मोहरीच्या शेतीकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढत आहे. कारण, यात रोखीच्या पिकांप्रमाणेच फायदा पदरात पडतो.

आपल्या देशात तेलबियांचे उत्पादन हे बहुतांशवेळा पाऊस असलेल्या भागातच घेतले जाते. यानुसार त्याचे एकूण क्षेत्रफळ 26 दशलक्ष हेक्टर आहे. क्षेत्रफळाचा विचार केल्यास एकूण क्षेत्रफळाच्या 34 टक्के वाटा सोयाबीनचा, 27 टक्के वाटा शेंगदाण्याचा आणि 27 टक्के वाटा मोहरीचा आहे. त्याचवेळी तेलबियांच्या उत्पादनात मोहरीचे योगदान 8.43 दशलक्ष टन आहे. मोहरी उत्पादन घेणारी प्रमुख राज्ये म्हणजे राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, गुजरात आणि पश्चिम बंगाल आहे. पंजाब, बिहार, झारखंड आणि आसाममध्येदेखील मोहरीचे उत्पादन घेतले जात आहे. महाराष्ट्रातही मोहरीचे पीक घेतले जाते. मोहरीच्या एकूण पिकांपैकी 25 टक्के पीक पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता अधिकच राहते. म्हणून त्याचे सरासरी उत्पादन कमी आहे. खाद्य तेलाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मोहरीचे क्षेत्रफळ वाढविण्याची, उत्पादन वाढविण्याची गरज आहे. मोहरीचा उपयोग तेल तयार करण्यासाठी आणि भाज्यांना फोडणी देण्यासाठी केला जातो. शिवाय या बियांचा उपयोग मसाले, लोणचे, साबण, ग्लिसरॉल तयार करणे तसेच त्याच्या ऑईल केकचा (खली) उपयोग जनावरांच्या खाद्यांसाठी तसेच जैविक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठीही केला जातो. औषधी तत्त्वांमुळेदेखील मोहरीच्या तेलाचा अनेक मार्गाने उपयोग केला जातो.

संबंधित बातम्या

खाद्यतेलात दोन प्रकारचे आम्ल असतात सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते पूर्ण भोजनातून शरीराला मिळणार्‍या ऊर्जेचा दहा टक्केच भाग हा सॅच्युरेटेड आम्लपासून मिळवायला हवा. मोहरीच्या तेलात 60 टक्के एकल अनसॅच्युरेटेड आणि 12 टक्के सॅच्युरेटेड आम्ल आहे. एवढेच नाही, तर त्यात 40 ते 60 टक्क्यांपर्यंत इरुसिक अ‍ॅसिड, दहा ते बारा टक्क्यांपर्यंत ओलिक अ‍ॅसिड, सहा ते आठ टक्क्यांपर्यंत ओमेगा-3 , अल्फा लीललेनिक आणि दहा ते पंधरा टक्के ओमेगा-6 आढळून येते. अलीकडेच विकसित देशांनी विकसित केलेल्या पदार्थात कमी प्रमाणात इरुसिक आम्ल असल्याचे आढळून आलेे.

या प्रकारच्या तेलाला अधिक मागणी आहे. मोहरीचे तेल हे ओमेगा-3 चा चांगला स्रोत आहे. या कारणांमुळे डोळे, हृदय चांगले ठेवण्याबरोबरच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी मुकाबला करण्याची क्षमता शरीरात विकसित करते. राई धान्य आणि मोहरी या व्यतिरिक्त अन्य तेलांत सॅच्युरेटेड चरबी आणि ट्रान्स फॅट हे रक्तवाहिन्यात चरबीजन्य पदार्थ साचविण्याचे काम करतात. त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता राहते. कॉलेस्ट्रॉलचे खराब प्रमाण वाढविण्याचे कामही अन्य तेल करतात. एका आकडेवारीनुसार, देशात प्रति व्यक्तीला सुमारे 21.70 किलो तेलाची गरज भासते. या मागणीची पूर्तता करण्यासाठी देशाला दरवर्षी सुमारे 33.20 दशलक्ष टन खाद्यतेलाची गरज भासते. देशात 2021-22 मध्ये पहिल्या आणि दुसर्‍या स्रोतांकडून सुमारे 17.03 दशलक्ष टन तेलाचे उत्पादन झाले आहे. त्याचवेळी 16.13 दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात करावी लागली आणि हे अंतर कमी करण्याची गरज आहे.

– पद्मश्री अशोक भगत

Back to top button