मंदिरे : मनमंदिरा ! | पुढारी

मंदिरे : मनमंदिरा !

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यभरातील प्रार्थनास्थळे खुली झाली. कोरोनाच्या दोन वर्षांत 14 महिने मंदिरे बंद राहिली. तिसर्‍या लाटेचा धोका टळला, याची खात्री करून घेत सरकारने देऊळबंदी उठवण्याचे पाऊल टाकले. आता मंदिरांमध्ये आणि त्यातही राज्यभरातील भक्‍त एकवटतात अशा तीर्थक्षेत्री गर्दी उसळल्याच्या बातम्या सुरू होतील. या गर्दीच्या तोंडावर मास्क होता की नव्हता, याचीही चर्चा केली जाईल. मुळात सरकारला अशा बातम्यांची अपेक्षा नाही. त्यामुळेच देवाच्या दारात गर्दी उसळणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारने देवांचे व्यवस्थापन सांभाळणार्‍या विश्‍वस्तांवर टाकली आहे. त्याचा परिणाम असा झाला की, जितके देव तितके नियम मंदिर उघडण्यापूर्वीच जाहीर झाले. तुळजापूर, पंढरपूर, साई संस्थान शिर्डी असेल किंवा सिद्धिविनायक, प्रत्येक मंदिराच्या व्यवस्थापनाने आपापल्या तर्‍हेने दर्शनाचे नियम जाहीर केले. आता हे दर्शनही तसे हायटेक झाले आहे. प्रत्यक्ष डोके टेकवायला मिळत असले, तरी या उराउरी भेटीची नोंदणी मात्र ऑनलाईन करणे बंधनकारक ठरले. सिद्धिविनायकाने तर क्यूआर कोड सक्‍तीचा केला. हा कोड सिद्धिविनायकाच्या अ‍ॅपशिवाय मिळत नाही आणि या क्यूआर कोडशिवाय सिद्धिविनायक भेटत नाही. असेच नियम सर्वच मंदिरांच्या व्यवस्थापनांनी जाहीर केले. त्या नियमांचे पालन करण्याशिवाय भक्‍तांसमोर पर्याय नाही. नियम पाळाल तरच देवदर्शन, हा दंडकच असल्यामुळे पुन्हा मंदिरे बंद करण्याची वेळ कोणत्याही देवस्थानावर आणि त्यातही राज्य सरकारवर येणार नाही, अशी आशा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ती बोलून दाखवली. आपल्या आचार-विचारांमध्ये असे बदल करू की, पुन्हा मंदिरे बंद करण्याची परिस्थितीच उद्भवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांचा हा निरोप महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील भक्‍तांपर्यंत पोहोचला आहे, असे समजण्यास हरकत नाही. नियमांचा निरोप किती महत्त्वाचा असतो, हे गेली दोन वर्षे आपण अनुभवत आहोत. कोरोना हा एक साथीचा आजार जरुर आहे. तो आपल्या वागण्याच्या तर्‍हांनी जन्माला घातला नाही; मात्र कोरोना फोफावला तो आपल्या बेहिशेबी, गचाळ वागण्यामुळेच. मास्क लावायचा नाही, हात धुवायचे नाहीत, सुरक्षित अंतर धावणार्‍या दोन गाड्यांमध्ये असते हे माहिती होते, दोन माणसांमध्येही हे अंतर राखायचे असते, हे सांगूनही ऐकायचे नाही, चारचौघांत बिनधास्त शिंकायचे. या बेजबाबदार वागण्यातून कोरोना फोफावला. आज मंदिरे, शाळा उघडतानाही सरकारने पुन्हा पुन्हा जबाबदारीची जाणीव करून दिली, नियमांची आठवण करून दिली. ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ असे नवे अभियानच मुख्यमंत्र्यांनी सुरू केले. याआधी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असे अभियान सरकारने राबवले. मंदिरे उघडताना देवाची जबाबदारी मात्र सरकारने भक्‍तांवर टाकली नाही आणि भक्‍तांनाही देवाच्या हवाली सोडले नाही. भक्‍तांनी भक्‍तांची काळजी घेतली, तर देवदर्शन घडेल. देवाच्या घरी जाण्याची वेळ येणार नाही, हे बटबटीतपणे सांगितलेच पाहिजे, असे नाही. त्यामुळेच मंदिरे बंद करण्याची वेळ पुन्हा आणू नका, हा सरकारचा निरोप मंदिरांच्या व्यवस्थापनांसाठी आणि देवाच्या दारात गर्दी करणार्‍या भक्‍तांसाठीही तितकाच महत्त्वाचा ठरतो.

कोणतेही संकट माणसाला नवा आकार देते, नवा विचार देते, असे म्हणतात. कोरोनाच्या काळात मंदिरे बंद होती. घरातील देव्हार्‍यांना मात्र कुलूप लावलेले नव्हते. प्रदीर्घ काळ माणसे घरात अक्षरश: कोंडलेली होती, तरीही घरातील देव्हार्‍यांनी या भक्‍तांचे समाधान होत नव्हते. घरातल्या देव्हार्‍यासमोर उभे राहा की, मंदिराच्या गाभार्‍यात! डोळे बंद केले की, माणूस एकटा होतो आणि देवाच्या समीप जातो, असे म्हणतात. मनाला मंदिर म्हटले जाते, ते उगाच नाही. मनाचे मंदिर उघडले, तर देव कुठेही दिसतो, कुठेही अन् कसाही भेटतो. ‘अव्यक्‍त निराकार नाही ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजे ॥ ’ हे साधे तत्त्वज्ञान खरे तर कोरोनामुळे अधिक रुजायला हवे होते. तसे झाले काय, हा प्रश्‍न आहे. प्रत्येकाच्या अंतर्मनात एक देव्हारा असूनही भक्‍तांना पाहिजे होती छोटी-मोठी मंदिरे. मंदिरांतील रांगा, प्रसंगी दर्शनरांगेतील रेटारेटी. एका प्रसादासाठी एकाच वेळी पुढे आलेले डझनभर हात आणि हातावर प्रसाद पडणार्‍या काहीच नशिबवान हातांमध्ये आपलाही हात असावा या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याची ऊर्मीदेखील. भक्‍तांच्या रांगा नाहीत म्हणून मंदिरे अस्वस्थ झाल्याचे वृत्त नाही. भक्‍त मात्र बेचैन झाले. भक्‍तांच्या मतांसाठी झुंजणारे राजकारणीही अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतून मंदिरे उघडा म्हणून हाक दिली गेली. चौकाचौकांत घंटानाद झाले. महाआरत्या झाल्या. याचे कारण देवभक्‍तीचीही एक अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेवर देव अवलंबून नाही. देवांचे भक्‍त मात्र प्रचंड अवलंबून आहेत. नारळ-फुले, कापूर-उदबत्त्या विकणार्‍यांपासून तर देवाच्या दारात गंधाची वाटी घेऊन येईल त्या भक्‍ताच्या भाळी आपल्या पोटापाण्याचा टिळा लावणार्‍या पोरासोरांपर्यंत एक मोठी साखळी देवाच्या नावे चालणार्‍या अर्थव्यवस्थेवर पोसली जाते. कोरोनाच्या लॉकडाऊनने प्रचलित अर्थव्यवस्थेचे जसे तीन तेरा वाजवले, तद्वतच भक्‍तिमार्गाची अर्थव्यवस्थाही या देऊळबंदीने पार आडवी केली. ती आता उभी राहावी. देवाच्या भरवशावरच उभी केलेली, लाखो जीव पोसणारी ही भक्‍तिमार्गी अर्थव्यवस्था आहे. तिला पुन्हा टाळे ठोकण्याची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आता भक्‍तांवर येऊन पडली आहे. देवदर्शनासाठी आता नवी आचारसंहिता पाळलीच पाहिजे. विनाकारण गर्दी करून, गोंधळ माजवून नवा प्रश्‍न निर्माण करण्याचे कारण नाही. ही जबाबदारी सरकारने टाकली, असे समजण्याचेही कारण नाही. ‘माझा देव, माझी जबाबदारी’ असेच हे परमेश्‍वरी अभियान होय!

संबंधित बातम्या
Back to top button