लवंगी मिरची : गुडमॉर्निंग नव्हे शुभ प्रभात | पुढारी

लवंगी मिरची : गुडमॉर्निंग नव्हे शुभ प्रभात

काय रे मित्रा, काल मराठी राजभाषा दिन होता. साजरा केलास की नाही?
होय तर. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा दिन. हा दिवस मी एक संकल्प करून साजरा केलाय.
काय आहे तुझा संकल्प सांग तरी. कालपासून मी पिवर मराठी बोलायला सुरुवात केली आहे.
अरे प्युअर म्हणजे एकदम ओरिजनल. इथून पुढे जे काय बोलणार ते कम्प्लीट मराठीमध्ये बोलणार, त्याच्यामध्ये एकाही इंग्रजी शब्दाची एन्ट्री होणार नाही याची काळजी घेऊन बोलणार आहे. येथून पुढे गुड मॉर्निंग ऐवजी शुभप्रभात म्हणणार!
म्हणजे नेमकं काय केलंस तू? कळू तरी दे की, माय मराठीची सेवा तू नेमकी कशी करत आहेस ते?

सकाळी ब्रेकफास्टला, माफ कर, माफ कर मित्रा, सकाळी नाश्त्याला हॉटेलमध्ये गेलो आणि वेटरला, माफ कर, मित्रा, तिथे वाट पाहणार्‍या सेवकाला म्हणजे वाट पाहायला लावणार्‍या सेवकाला, ऑर्डर, माफ कर पुन्हा एकदा, आदेश दिला की, दोन प्लेट, माफ कर पुन्हा एकदा, दोन थाळ्या उपमा घेऊन ये म्हणून!

तेव्हा तो म्हणाला, आमच्याकडे थाळीमध्ये राईस प्लेट मिळते, उपमा छोट्या प्लेटमध्ये मिळतो.
मला काय म्हणायचे आहे, त्याला नेमके समजेना म्हणून म्हणून हॉटेलच्या किचनमध्ये गेलो. छोट्या दोन प्लेट आणल्या आणि खाणाखुणा करून त्याला सांगितले की या प्लेटमध्ये उपमा दे म्हणून!
बरं, मग नंतर काय केलेस?
घरी आलो, अंघोळ केली आणि बँकेत गेलो.

संबंधित बातम्या

अरे हो, पण बँक हा शेवटी इंग्रजी शब्द आला ना? बँकेला मराठीत काय म्हणतात मला तरी माहीत नाही, तुला माहीत असेल तर सांग.
सांगतो, बँकेला मराठीमध्ये अधिकोष असे म्हणतात. तर अधिकोशात गेलो. एक धनादेश होता तो माझ्या अकाऊंटला, माफ कर, माझ्या खात्यात जमा करायचा होता तो सादर केला. सोबतची स्लिप म्हणजे हिंदीत त्याला पर्ची म्हणतात, त्याला आपल्या मराठीत चिठ्ठी म्हणता येईल. ती चिठ्ठी भरून धनादेश सादर केला. तत्काळ तो धनादेश वटला आणि पैसे माझ्या अकाऊंटला, माफ कर माझ्या खात्यात जमा झाले.
छान प्युअर मराठी बोलतोयस तू!

बँक मॅनेजरच्या खनपटीला बसून डिमांड ड्राफ्ट ला मराठीत काय म्हणतात हे विचारले. त्याने बँकेतील सर्व कर्मचार्‍यांना बोलवले. कुणालाही उत्तर सांगता येईना. डिमांड ड्राफ्टला पर्यायी मराठी शब्द शेवटी एका रिटायरमेंट जवळ आलेल्या, माफ कर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणार्‍या एका ज्येष्ठ बँक कर्मचार्‍याने सांगितला आणि तो म्हणजे धनाकर्ष.
आता लक्षात ठेव डिमांड ड्राफ्ट म्हणजे धनाकर्ष.

आले लक्षात बँक म्हणजे अधिकोष, चेक म्हणजे धनादेश आणि डिमांड ड्राफ्ट म्हणजे धनाकर्ष. बरं, दरम्यान त्याने तुला टोकन दिले असेल ना?

हो तर! टोकन दिले; पण मी काही विचारण्यापूर्वीच बँक मॅनेजर मला म्हणाला की, साहेब, गर्दीची वेळ आहे. टोकन हा मराठीच शब्द आहे. टोकन हा मराठी शब्द आहे हे मी मान्य केले. एकदाचा मी पैसे घेऊन बाहेर पडलो तेव्हा त्या सगळ्यांनी जल्लोष केला.

बरं, मग नंतर काय केलंस? घरी आलो. दुपारची झोप घेतली आणि संध्याकाळी वॉकसाठी बाहेर पडलो, माफ कर मित्रा चालण्यासाठी बाहेर पडलो. इव्हिनिंग वॉकला सायंकालीन पदयात्रा म्हणता येईल का? रात्री डिनर मी लाईटच घेत असतो, माफ कर मित्रा, रात्रीच्या जेवणात हलकाच आहार घेत असतो. जेवण आटोपून घरातील सगळ्यांना गुड नाईट म्हणालो, माफ कर मित्रा, शुभ रात्री म्हणालो आणि झोपी गेलो. असा साजरा केला मराठी भाषा दिन!

– झटका

Back to top button