महात्मा गांधी जयंती : गांधी विचारांमागील प्रेरणाशोध | पुढारी

महात्मा गांधी जयंती : गांधी विचारांमागील प्रेरणाशोध

- कुमार कलानंद मणी (लेखक ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)

मोहनदास करमचंद गांधी यांचे रूपांतर महात्मा गांधींमध्ये होऊन ते जगन्मान्य व्यक्तिमत्त्व अखेर कोणत्या कारणामुळे बनले? गांधीजींचे व्यक्तिमत्त्व केवळ एकाच स्वरूपात बांधता येत नाही. त्यांची अनेक रूपे, योग्यता आणि योगदान यांची यादी तयार करायचे ठरविल्यास ते अशक्य आहे. आज गांधी जयंती, त्यानिमित्त…

‘सत्याचे प्रयोग’ म्हणजेच आत्मकथा हे महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र जगातील सर्वाधिक चर्चित पुस्तकांमधील एक आहे. सर्वाधिक वाचल्या गेलेल्या आत्मचरित्रांमध्येही त्याचा जगात पहिला क्रमांक आहे. त्याचे कारण म्हणजे लोकांना जीवनातील सत्याचा आरसा दाखविणारे आणि नैतिक मूल्यांवर जगण्याची प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. त्यामुळेच जगातील शंभर आध्यात्मिक पुस्तकांमध्येही त्याला स्थान मिळाले. मोहनदास करमचंद गांधी यांचे रूपांतर महात्मा गांधींमध्ये होऊन ते जगन्मान्य व्यक्तिमत्त्व कोणत्या कारणांमुळे बनले? स्वयंसुधारणेपासून सुरू झालेली त्यांची जीवनयात्रा अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या मार्गावर अग्रेसर झाली. ही यात्रा धार्मिक, सामाजिक, देश यांच्यात सुधारणा आणि त्यानंतर देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्राची निर्मिती अशा दिशेने बापूजींच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहिली. कौटुंबिक मूल्यांचा हा पालनकर्ता संपूर्ण जगात शाकाहार आणि अहिंसा यांचे प्रतीक बनून गेला. अहिंसेचा केवळ जप न करता त्यांनी मानवी जीवनात ती स्थापित करण्याचे तंत्र बनविले. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या अहिंसात्मक आंदोलनात प्रतिकार, मिलाफ, संवाद, प्रेम, द़ृढता, संघर्ष, सेवा, साधेपणा, सहकार्य, त्याग आणि समानता या मूल्यांचा अजोड मिलाफ आढळतो.

नातालमध्ये जेव्हा गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला झाला तेव्हा तेथील साम्राज्यवादी सरकारसुद्धा हादरले. लंडनच्या वृत्तपत्रांत त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर तेथील राज्यकर्त्यांनी आफ्रिका सरकारला तार करून हल्लेखोरांना पकडण्यास सांगितले. गांधीजींना तेथील मंत्र्यांनी बोलावले आणि हल्लेखोरांची नावे सांगायची विनंती केली. परंतु, गांधीजींनी नावे सांगायला नकार दिला. एखाद्या व्यक्तीला शिक्षा करणे हे समस्येला उत्तर नसून ज्या कारणांमुळे हल्ले होतात, ती बदलली पाहिजेत, असे गांधीजींनी या मंत्र्यांना सांगितले होते. बॅरिस्टर मोहनदास कुटुंबीयांसाठी पैसा कमवायला आफ्रिकेत गेले होते. परंतु, मानवाधिकारांचे रक्षक बनून स्थानिक आणि ब्रिटिश शासकांपुढे त्यांनी आव्हान उभे केले. त्यांची लढाई विचार, द़ृष्टी बदलण्यासाठी, विषमता संपुष्टात आणण्यासाठी होती. बोअर युद्धात त्यांनी समर्पित भावनेने हजारो जखमींना मदत केली. ज्यावेळी तेथे महामारी आली, तेव्हाही गांधीजींनी स्वतःची सुरक्षितता विसरून गरिबांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

सुमारे 21 वर्षांच्या संघर्षमय जीवनानंतर जानेवारी 1915 मध्ये गांधीजी मायदेशी आले, तेव्हा ते आजारी होते. परंतु, त्यांनी नेहमी निसर्गोपचारांचाच आधार घेतला. त्यावेळी त्यांचे नाव आणि कर्तृत्व जगभरात पसरले होते. डोक्यावर अपेक्षांचे प्रचंड ओझे होते. काशी विद्यापीठातील त्यांच्या भाषणाने अनेकांच्या मानसिकतेत परिवर्तन झाले. त्यानंतर नीळ कारखानदारांनी गुलाम बनवून टाकलेल्या शेतकर्‍यांसाठी त्यांनी चंपारण्यात सत्याग्रहाचा यशस्वी प्रयोग केला. त्यानंतर लगेच गुजरातमधील खेडा येथे शेतकर्‍यांवर लादलेल्या जुलमी कराविरोधात त्यांनी आवाज उठविला. अहमदाबादमधील गिरणी कामगारांचा संप अहिंसक मार्गाने जाईल, याची काळजी घेऊन कामगार चळवळीपुढे आदर्श उभा केला. भारतात परतल्यानंतर खादी आणि ग्रामोद्योगाची सुरुवात आणि ही सर्व आंदोलने यात अडीच वर्षे निघून गेली. परंतु, मायदेशी परतल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी व्हॉइसरॉय चेम्सफोर्ड यांना पत्र लिहून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती.

1918 नंतर तीन महत्त्वाच्या समस्या उभ्या ठाकल्या. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांचा सहभाग, स्पॅनिश फ्लू, तसेच भारतीयांवर रोलट अ‍ॅक्ट लादून त्यांना गुलाम बनविण्याचा ब्रिटिश सरकारचा हिणकस प्रयत्न. भारतीयांना त्यांचे अधिकार देण्यात येतील, या ब्रिटिशांच्या आश्वासनावर भरवसा ठेवून गांधीजींनी पहिल्या महायुद्धात त्यांना साथ दिली. भारतीय सैनिक बोटीतून मुंबई बंदरावर उतरले तेव्हा त्यांना महामारीची लागण झाली होती. त्यांच्या माध्यमातूनच महामारी भारतात पसरली आणि सुमारे दीड कोटी लोकसंख्येचा घास तिने घेतला. प्लेगच्या काळात गांधीजींसह 800 भारतीयांना आफ्रिकेला घेऊन जाणारे जहाज समुद्रातच 23 दिवस उभे केले होते. स्पॅनिश फ्लूचा भारतात झालेला फैलावही याच मार्गाने रोखता आला असता. संसर्ग असणार्‍या सैनिकांना घेऊन येणारे जहाज मुंबईत पोहोचू देण्यामागील हेतू स्पष्ट होते. एकीकडे महामारी वाढत गेली आणि दुसरीकडे भारतीयांचे शोषणही वाढत गेले. महात्मा गांधींचा खेडा सत्याग्रह तेव्हा सुरू होता आणि त्याचवेळी महामारीचा फैलाव हेतूपुरस्सर करण्यात आला. गांधीजींची थोरली सून गुलाब आणि थोरल्या नातीचा महामारीत मृत्यू झाला. गांधीजींना या महामारीचा त्रास झाला नसला, तरी पोटाचा विकार बळावला. मृत्यूच्या दरवाजापर्यंत गेलेले गांधीजी पुन्हा बरे झाले. तोपर्यंत रोलट अ‍ॅक्ट देशवासीयांवर लादून आणीबाणीसद़ृश परिस्थिती निर्माण केली गेली होती. एकीकडे स्पॅनिश फ्लूचे तांडव आणि दुसरीकडे भारतीयांचे शोषण सुरू होते आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे रोलट अ‍ॅक्ट होता. देशाला निर्धनतेकडे नेण्याबरोबरच ब्रिटिशांनी या निमित्ताने आपली पकड मजबूत केली. या कायद्यामुळे कोणालाही अटक करून विनाचौकशी तुरुंगात डांबले जाऊ लागले. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली.

अशा काळात गांधीजींनी मानवाधिकार पुनःप्रस्थापित करण्यासाठी रोलट अ‍ॅक्टला विरोध करणे, तो परत घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढविणे आणि त्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 1919 मध्ये मुंबईत सत्याग्रह सभेची स्थापना झाली. त्यानंतर देशभरात शांततापूर्ण आंदोलने सुरू झाली. हजारो आंदोलकांना अटक झाली. या अटकेविरुद्ध आंदोलन करणार्‍यांवर जालियानवाला बागेत गोळीबार झाला. सुमारे हजार निरपराध लोकांचा सरकारने बळी घेतला. त्यावेळी भारतीय समाजाने महामारीने मरण्यापेक्षा सरकारच्या दडपशाहीतून स्वतःला स्वतंत्र करण्यासाठी लढण्याचा निर्धार केला आणि त्याचे नेतृत्व गांधीजींकडे दिले. पुढील 28 वर्षे भारत गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली निडरपणे अहिंसात्मक आंदोलन करीत राहिला आणि अखेर साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारपासून मुक्ती मिळवलीच. त्यांच्या या लढ्याचे स्मरण नेहमीच प्रेरणादायक ठरते.

Back to top button