युतीचं ठरलंय, आघाडीचं काय? | पुढारी

युतीचं ठरलंय, आघाडीचं काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर दौर्‍यात आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजपच्या विजय संकल्प रॅलीमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही उपस्थित होते, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शहा यांनीच शिवसेना-भाजप युती ‘एनडीए’ म्हणूनच निवडणूक लढवणार असून, आपल्याला राज्यातल्या 48 जागांवर यश मिळवायचे आहे, असे सांगत मंडलिक व माने यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले. आता हे देघेही मूळ धनुष्यबाण चिन्हावर लढणार की, हाती कमळ घेणार? हे निवडणुकीतच स्पष्ट होईल. आघाडीला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. ‘आमचं ठरलंय’ म्हणत गेल्या निवडणुकीत मंडलिक यांना पाठिंबा देणार्‍यांना आता नव्यानं ठरवावं लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ताकद वापरली आहे. त्यांना कोल्हापुरात आपली राजकीय ताकद निर्माण कारायची आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यात मित्रपक्षांचे सहकारी घेतले आहेत. कमळाचा आमदार नसला, तरी 10 पैकी 3 आमदार मित्रपक्षाचे आहेत. भाजपमध्ये नेते भरपूर आहेत; मात्र कार्यकर्ते कुठेच दिसत नाहीत. कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागतील; अन्यथा येणार्‍या महापालिका निवडणुकीसह अन्य निवडणुकांत महाडिक यांना भाजपची सूत्रे हलवावी लागतील.

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील महसूल, सहकारसह अर्धा डझन खात्यांचे मंत्री झाले. मात्र, त्यांनीही कार्यकर्ता मायक्रोस्कोपमधून शोधावा लागतो, अशी खंत व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांचे जाळे त्यांना निर्माण करता आले नाही. ज्यांच्यावर त्यांची भिस्त होती त्यांनाही पक्ष वाढवता आला नाही, हे वास्तव आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना निवडून आणण्यासाठी भाजपने सर्व नेत्यांना प्रचारात उतरवले. भाजपचे राज्यातील बहुतेक आमदार प्रचारत उतरले होते; तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. आता चित्र बदलले आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले आहेत. याची घोषणा अमित शहा यांनी कोल्हापुरात भाजपच्या विजय संकल्प रॅलीत केली. संजय मंडलिक व धैर्यशील माने या शिवसेनेच्या दोन खासदारांसह भाजपला पाठिंबा दिलेले ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांना भाजपने आपल्या व्यासपीठावर आणले. यातून भाजपने राजकीय शक्तिप्रदर्शन घडवले. भाजपमागे कोण? ते आता स्पष्ट झाले आहे. याशिवाय शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हेही त्यांच्यासोबत सुरुवातीपासून आहेत.

तीन आमदार आणि दोन खासदारांचे बळ अमित शहा सांगत असलेल्या ‘एनडीए’मागे आताच आहे. आता येणार्‍या निवडणुकीत मंडलिक आणि माने ‘एनडीए’चे उमेदवार असले, तरी ते हातात कमळ घेणार की मूळच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार? याचे उत्तर निवडणुकीतच मिळेल. शहा यांनी राज्यात शत-प्रतिशत भाजपची घोषणा केल्याने या चर्चेला सुरुवात झाली आहे. आता निवडणुकीच्या वाटाघाटी कशा होतात, त्यावेळी ते स्पष्ट होईल. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. तो योग्यवेळी जाहीर करू, असे सांगून सारे काही गुलदस्त्यात ठेवले आहे.

भाजपने जिल्ह्यात राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवली. त्यांच्या दौर्‍यांपाठोपाठ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचाही कोल्हापूर दौरा झाला आणि आता अमित शहा यांनी कोल्हापुरात येऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली. महाविकास आघाडीला विद्यमान खासदारांना टक्कर देऊन निवडून येतील, अशा चेहर्‍यांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यांच्या मागे बळ उभे करावे लागणार आहे. त्यासाठी नव्याने राजकीय फेरमांडणी करावी लागेल.

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर वार्तापत्र

Back to top button