लवंगी मिरची : चहापेक्षा किटली गरम | पुढारी

लवंगी मिरची : चहापेक्षा किटली गरम

दादा : राजकीय नेत्यांच्या गाड्यांना अपघात होताना दिसत आहेत. का रे भाऊ, काय कारण असेल?
भाऊ : अरे विशेष काही नाही. मागे भूत लागल्यासारखे गाड्या पळवतात, अपघात नाही तर दुसरे काय होणार?
दादा: तसं नाही रे कालच बापूंच्या, ते नाहीत का रे, काय डोंगार, काय झाडीवाले? त्यांच्या ताफ्यामधील एका गाडीला अपघात झाला आणि त्या गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. काही महिन्यापूर्वी एका राजकीय नेत्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. दुसरे एक राजकीय नेते अपघातामध्ये जायबंदी झाले. काय प्रकार असेल?
भाऊ : खरं सांगू , तसे पाहता मंत्री असो, आमदार असो व्यक्तिगत जीवनात खूप साधे असतात. अगदी सामान्य माणूस घरी भेटायला गेला, तरी त्याला भेटतात; पण त्यांच्याकडे काम करणारे जे लोक असतात ना, यांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे पीए म्हणजे निजी साहाय्यक आणि दुसरे म्हणजे यांचे ड्रायव्हर. म्हणजे बघ एक वेळ मंत्री भेटेल तुम्हाला, त्यांना वेळ असेल; पण पीए ला वेळ असेल की नाही सांगता येत नाही. कोणत्याही वेळी आणि कधीही बघा, कायम लगबगीत असतो.
दादा : अरे मंत्र्याचा, आमदाराचा वेळ म्हणजे महत्त्वाचा आहे की नाही? मिनिटा-मिनिटाचा खेळ असतो. जनतेची कामे करता करता दिवसाचे चोवीस तास कमी पडत असतील त्यांना.
भाऊ : अरे हो, मान्य आहे; पण ते काय जीवावर बेतण्यापेक्षा महत्त्वाचे आहे की काय? कधीही बघा, मंत्री निघाले की, त्यांच्या मागे दहा-बारा गाड्यांचा ताफा असतोच. समोर पोलिसाची गाडी, ती पण सायरन वाजवीत चालत असते. शांत चालणारी ट्रॅफिक या सायरनमुळे गोंधळून जाते. पोलिसाच्या गाडीमागे आणखी एखादी पांढरी शुभ- गाडी असते. त्याच्या मागे मंत्री साहेबांची गाडी आणि त्याच्या पाठीशी चार-पाच सरकारी अधिकार्‍यांच्या गाड्या आणि त्याच्या पाठीशी दहा-बारा कार्यकर्त्यांच्या गाड्या असतात. मला सांग, पंधरा-वीस गाड्या एकाच वेळेला सुसाट धावण्यासारखा रस्ता संपूर्ण देशात तरी कुठे असेल का रे?
दादा : म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मंत्र्यांनी वगैरे सामान्य माणसासारखं ट्राफिकमधून रस्ता काढत चालायला जायला पाहिजे? काय, काहीतरी बोलतो यार?
भाऊ : अरे जा ना, समजून घ्या ना सामान्य लोकांवर काय वेळ आली आहे ते. घर ते कार्यालय, कार्यालय ते मार्केट आणि मार्केट ते घर एवढं फिरता फिरता सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आलेला असतो. सामान्य लोकांसारखं जाल तर किमान कुणाचा जीव तरी जाणार नाही. इलेक्शन काळामध्ये आपण समजू शकतो की, मंत्री, आमदार यांना एकाच दिवशी पंधरा-पंधरा सभा गाठायच्या असतात. म्हणून गाडी वेगाने पळवली तर समजू शकते. पण, एरव्ही असे काय दिवे लावतात हे लोक की, यांना वेळ मिळत नाही आणि खरोखरच एवढं वेळेचं भान ठेवून काम केलं असतं, तर दर पाच वर्षाला निवडणुकांमध्ये नवनवीन फंडे काढण्याची गरजच नव्हती. वेळ कमी पडेल इतकी पाच वर्षे विकासकामे केली, तर प्रचार करायची गरजच पडणार नाही. मंत्र्याचा, आमदाराचा जो ड्रायव्हर असतो त्याला तर आपले साहेब म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष असल्यासारखे वाटत असते. जे गाड्या पळवतो आणि मग तो गाडी पळवतोय म्हटल्यानंतर ताफ्यामधील इतरांना मागे राहून कसे चालेल? तेही गाड्या पळवायला लागतात. अरे रस्ते कसे? तुम्ही चालवताय कसे? लोकांनी कसं चालायचं? टाकला गिअर की, निघाले दीडशेच्या स्पीडने सुसाट. वेळच नाही. अरे जा ना सावकाश. थोडे आधी नियोजन करा. वेळेचं नियोजन करा आणि निवांत जा. तुमचा जीव वाचेल आणि लोकांचे जीव पण वाचतील. तुमचे पीए आणि ड्रायव्हर यांना पण प्रशिक्षण द्या. पृथ्वीतलावरून प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचेच आहे. मग, जायचा दिवस येऊ द्या ना? आधीच का घाई करताय? साहेब लोकांना, आमदार, खासदारांना मंत्र्यांना घाई नसते; पण कधी कधी होतं ना, चहापेक्षा किटली गरम! सांभाळा रे बाबांनो!

-झटका

संबंधित बातम्या
Back to top button