खुडलेल्या कळ्यांचे वर्तमान | पुढारी

खुडलेल्या कळ्यांचे वर्तमान

कोणत्याही देशाचे मूल्यमापन करताना त्या देशाची अर्थव्यवस्था, तेथील रोजगाराची स्थिती, सुशासन आदी बाबींचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. त्या जोडीला कुणी लोकशाही मूल्ये, माध्यमस्वातंत्र्य आदी बाबींचा सोयीनुसार दाखला देऊ शकेल. या सगळ्यावरून त्या देशाचे म्हणून एक चित्र काढता येऊ शकते. जगातल्या विविध देशांची अशी चित्रे काढून त्यावरून जगाचे म्हणूनही एक चित्र आकाराला येत असते. त्या चित्रातल्या सुंदर जागा आणि विद्रूप जागा यांची तुलना करून विद्रूपतेच्या ठिकाणी सुंदरता निर्माण करण्यासाठीची प्रेरणा निर्माण केली जाते. जगाचे मूल्यमापन करण्याच्या ज्या अनेक कसोट्या आहेत, त्या कसोट्यांमधे सर्वात महत्त्वाची कसोटी कोणती असेल तर ती आहे, बालकांच्या आरोग्याची. पृथ्वीतलावर जन्म घेणारा जीव किती निरोगी आणि सुद़ृढ आहे, यासारखी जगाच्या मूल्यमापनाची दुसरी कोणतीही प्रभावी कसोटी ठरू शकत नाही. कारण जन्मणारा जीव सुद़ृढ नसेल किंवा त्याच्या जगण्याची हमी जर मिळणार नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी फिजूल ठरतात.

अर्थव्यवस्थांचे ट्रिलियन डोलारे, सोशल मीडियावरील रणसंग्राम, धनिकांच्या संपत्तींमध्ये होणारी वाढ, खेळांच्या मैदानातील विश्वविक्रम किंवा बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंतचा झगमगाट यांसारख्या अनेक गोष्टींमधला फोलपणा जाणवल्यावाचून राहणार नाही. बाकी सगळ्या क्षेत्रांमधली प्रगती प्रशंसनीय असली तरी आपले प्राधान्यक्रम चुकताहेत की काय, अशी शंका बालकांचे आरोग्य आणि मृत्यूच्या आकड्यांवरून येते. त्यात पुन्हा राज्य म्हणून आपण कुठे आहोत, देश म्हणून आपण कुठे आहोत, असे प्रश्नही उपस्थित होतात आणि आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करावयास भाग पाडतात. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार 2021 मध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या सुमारे 50 लाख मुलांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये एक ते चार महिने वयाच्या 27 लाख मुलांचा समावेश आहे. याचा अर्थ एवढ्या संख्येने कळ्या फुलण्याआधीच खुडल्या आहेत. बाकी 23 लाख मृत्यू हे नवजात अर्भकांचे होते.

जागतिक पातळीवर पाच वर्षांहून कमी वयाच्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण हजारामागे 38 होते. त्याच वर्षी बालके, किशोरवयीन मुले आणि 24 वर्षांपर्यंतच्या मुलांचे 21 लाख मृत्यू झाले आहेत. या सगळ्याचा नीट खोलात जाऊन विचार केला आणि अर्थ समजून घेतला तर लक्षात येईल की, जगाच्या पाठीवर प्रत्येक 4.4 सेकंदाला एका मुलाचा किंवा तरुणाचा मृत्यू झाला आहे. याच अहवालातील आणखी एक वेदनादायी माहिती म्हणजे याच कालावधीत जवळपास 19 लाख मृत मुले जन्माला आली आहेत. ग्लोबल युगातले हे विषण्ण करणारे चित्र आहे. एकूणच मूलभूत प्रश्नांसंदर्भात समाज म्हणून आपल्याला अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेच हे निदर्शक आहे. केवळ राज्यकर्त्यांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकता येणार नाही, हेही लक्षात घेण्याची गरज आहे.

जगभरातील चित्र समोर आल्यानंतर ही आकडेवारी सर्व देशांच्या नावावर सरासरी पद्धतीने थोपवता येणार नाही. कारण विषमता हे आपल्या समाजरचनेचे मूळ आहे आणि त्याच विषमतेच्या पायावर समाजाची इमारत उभी राहिलेली असते. बालकांचे आरोग्य आणि मृत्यूंच्या बाबतीतही याच विषमतेचे प्रतिबिंब दिसते. एक जग जंक फूडच्या अतिरिक्त सेवनाने स्थूलपणाच्या संकटाचा सामना करीत असताना दुसरे जग कुपोषण आणि आरोग्य सेवांच्या अभावामुळे मृत्यूला कवटाळताना दिसते ते त्याचमुळे. पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूचे हे जे प्रमाण आहे ते आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये 80 टक्के आहे. तर पाच ते 24 वयोगटातल्या मुलांचे हे प्रमाण या दोन प्रदेशांमध्ये 70 टक्के आहे. लाखो आई-बाप आपल्या मुलांच्या मृत्यूचा आघात सहन करतात. जन्मलेल्या मुलाने पहिला श्वास घेण्याआधीच अनेकदा हा आघात होत असतो. मुलांच्या मृत्यूमागची कारणे ज्ञात नाहीत, असे नाही. त्यांची सातत्याने जागतिक पातळीवर चर्चा होत असते. परंतु राज्यकर्त्यांचे प्राधान्यक्रम हाच यातील प्रमुख अडथळा ठरत आहे.

प्राथमिक आरोग्य सुविधांच्या मजबुतीकरणासाठी जी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागते, तिचा सगळीकडेच अभाव दिसून येतो. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातही त्याचा निर्देश करण्यात आला आहे. पाच वर्षांहून कमी वयाच्या बालकांचे मत्यू होण्याची कारणे विषद करताना अहवालात म्हटले आहे की, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा, लसीकरण, योग्य आहार, शुद्ध पाणी आणि स्वच्छता या मूलभूत गरजांच्या पूर्ततेअभावी हे मृत्यू झाले आहेत. काही संसर्गजन्य आजार नियंत्रणात ठेवणे शक्य असतानाही त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना न केल्यामुळे या वयोगटातल्या मुलांच्या मृत्यूंमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे. मुलांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवणारी एक सक्षम यंत्रणा असायला पाहिजे, परंतु त्याकडेही लक्ष दिले जात नाही. आरोग्य, पोषण आणि लोकसंख्याविषयक तज्ज्ञ जुआन पाब्लो उरीबे यांच्या म्हणण्यानुसार अशा अहवालांमधून फक्त आकडेवारी समोर येते, त्यावरून परिस्थितीचे गांभीर्य समजण्यास मदत होते, हे खरे आहे.

परंतु या आकडेवारीच्या पाठीमागे लाखो कुटुंबे असतात, ज्यांनी आपल्या पोटच्या गोळ्यांना गमावले आहे किंवा ज्यांना मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले गेले आहे. या एकूण परिस्थितीतली वाईट गोष्ट म्हणजे मृत्यूंची जी आकडेवारी समोर आली आहे, त्यातील बहुतांश मृत्यू रोखणे शक्य होते. काही घटनांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अशक्यप्राय असते किंवा ते रोखणे कुणाच्याच हातात नसते. इथे मात्र तसे नाही. आपल्या एकूण व्यवस्थेची निष्क्रियता, उदासीनता यातील अनेक मृत्यूंसाठी जबाबदार आहे. अहवालात म्हटल्यानुसार जन्माच्यावेळची उत्तम देखभाल, लसीकरण, आहार, पाणी आणि स्वच्छतेसंदर्भातील प्रभावी हस्तक्षेपामुळे हे मृत्यू रोखणे शक्य होते. ते रोखले गेले नाहीत, ही वस्तुस्थिती काळीज विदीर्ण करणारी आहे.

Back to top button