काँग्रेसची नाचक्की | पुढारी

काँग्रेसची नाचक्की

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली असताना दुसरीकडे पक्षाच्या प्रादेशिक पातळीवरील नेत्यांनी त्यांची ही मोहीम जणू हाणून पाडण्याचाच निर्धार केलेला दिसतो! नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून जे नाट्य घडले, त्याचा तोच अर्थ निघतो. खरेतर एका पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि तेथील एका पक्षाची उमेदवारी हा दखलपात्र विषय ठरू शकत नाही. तेथील माघार घेतलेले उमेदवार किंवा अर्ज दाखल केलेले उमेदवार हेही राज्याच्या राजकारणात दखल घ्यावी असे म्हणता येत नाहीत; परंतु त्यानिमित्ताने जे राजकारण शिजले, जे नाट्य घडले, त्यातून जे विश्वासघाताचे राजकारण घडले, या नाट्यामध्ये प्रत्यक्ष रंगमंचावर आणि पडद्यामागे ज्या कलावंतांचा सहभाग राहिला, त्यामुळे त्याला गांभीर्य प्राप्त होते. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक नेते, त्यांच्या घराण्यांनी दीर्घकाळ सत्तापदे भूषवली. सत्ता गेल्यानंतर या पक्षाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाचा मार्ग पत्करला.

2019च्या लोकसभा निवडणुकीच्याआधी अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा उरल्या सुरल्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची उभारणी झाल्यामुळे भाजपमध्ये गेलेल्यांना सत्तापदे मिळाली नाहीत; परंतु केंद्रातील सत्तेमुळे त्यांना मोठा राजकीय आधार मिळाला. याउलट राज्याच्या सत्तेतील मंडळींना सत्ता असूनही त्यांची झोप उडाली होती. ही मंडळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये असली तरी ती भाजपच्या विरोधात कधीच ठाम भूमिका घेत नव्हती. उलट भाजपच्या नेत्यांशी संधान साधून होती. सत्तांतराच्या आधी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा झाला.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला मतदान केले, त्या घटनेची चौकशी काँग्रेसकडून झाल्याचे ऐकिवात नाही आणि झाली असली तरी त्यासंदर्भाने कुणावरही कारवाई झालेली नाही. एकीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याच आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला डिवचणारी वक्तव्ये करायची आणि बाकी काँग्रेस नेत्यांनी भाजपशी संधान साधून आपले राजकारण चालवायचे, अशी विचित्र स्थिती काँग्रेसमध्ये पाहायला मिळाली. विधान परिषदेतील फुटिरांवर कारवाईबाबत पक्षाने कठोर भूमिका घेतली नाही, त्याची परिणीती म्हणून या ताज्या गोंधळाकडे पाहता येते. डॉ. सुधीरतांबे यांचे निलंबन केले असले तरी सत्यजित तांबे यांचे काय करणार, हे स्पष्ट न केल्यामुळे काँग्रेसच्या पातळीवरील संभ्रम कायम दिसतो.

संबंधित बातम्या

नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये डॉ. सुधीर तांबे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तीन टर्म त्यांना काँग्रेसने तेथून उमेदवारी दिली. यावेळीही त्यांचीच उमेदवारी निश्चित होती आणि ती पक्षाने जाहीरही केली होती. डॉ. तांबे म्हणजे राज्याचे माजी महसूलमंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विद्यमान विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे. डॉ. तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे हे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्या काळात त्यांनी राज्यातील युवकांचे संघटन उत्तमरितीने बांधले. आमदारकीसाठी आपण किती काळ वाट पाहायची, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. त्याअर्थाने पाहिले तर हा मुद्दा काँग्रेस पक्षापेक्षाही थोरात आणि तांबे कुटुंबापुरता मर्यादित होता. मात्र, त्यांनी खिंडीत पकडून काँग्रेसची नाचक्की केली. एखादे षड्यंत्र रचल्याप्रमाणे ऐनवेळी खेळी करून काँग्रेसची मानहानी केली. डॉ. तांबे हे विद्यमान आमदार होते आणि त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होते.

तरीही सत्यजित तांबे यांना निवडणूक लढायची होती, हे महत्त्वाचे. त्यांनी वडिलांना तसे आधी सांगितले होते काय, पक्षाचे नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडेही शब्द टाकला होता काय, डॉ. तांबे यांनी अखेरच्या क्षणी माघार का घेतली, त्यांनी आधीच माघारीचा निर्णय का घेतला नाही, आपल्याला उमेदवारी नको, त्याऐवजी आपले पुत्र सत्यजित यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी आधीच का केली नाही, केली असेल तर नकार मिळाला होता काय, सत्यजित तांबे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी पडद्यामागे चर्चा केली होती काय, यांसारख्या प्रश्नांना राजकारणात आजघडीला कोणतेही उत्तर नाही. या घडामोडींचा अंतिम परिणाम महत्त्वाचा.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही काहीतरी वेगळे घडत असल्याचे आपल्या कानावर येत होते आणि आपण बाळासाहेब थोरात यांना त्याची कल्पना दिली होती, असे सांगितले आहे. याचा अर्थ एकच निघतो, तो म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसची हक्काची जागा काँग्रेसच्या पारड्यात जाऊ नये यासाठी आधीच कारस्थान शिजले होते! या कारस्थानामध्ये बाळासाहेब थोरात यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता की नव्हता? अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता किंवा नव्हता, हे जसे गूढ बनले आहे, तसेच बाळासाहेब थोरांताच्या खात्यावर एक गूढ जमा झाले आहे! सत्यजित तांबे कितीही सांगत असले की, आपण काँग्रेसचेच आहोत, तरी काँग्रेसला मात्र त्यांच्या या खेळीने मोठा धक्का बसला. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय नेत्याने काँग्रेसशी दगाफटका केल्याचा संदेश पक्षाला घायाळ करणारा आहे. आता केवळ सुधीर तांबे यांच्या निलंबनाने काय होणार?

Back to top button