लवंगी मिरची : संक्रांत असते कुणावर? | पुढारी

लवंगी मिरची : संक्रांत असते कुणावर?

संक्रांत ते रथसप्तमी हा कालावधी ग्रामीण भागात महिला चैतन्य पंधरवडा असतो. महानगरांतील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही. गावभर साड्यांचे चालते बोलते प्रदर्शन असते. अत्यंत उत्साहात भगिनीवर्गाच्या झुंडीच्या झुंडी दुपारी तीन वाजल्यापासून भन भन,भन भन गावभर फिरत असतात. दररोज नवी साडी, हातात पर्स आणि पायात चपला घातल्या की, माऊली जे निघते ते पार रात्री आठ वाजता खिचडी टाकायलाच घरी पोहोचते. बरे दुपारी निघतानाचा आविर्भाव फॅशन शोसारखा स्टेजवर चालण्याचा असतो. संध्याकाळी घरी परतेपर्यंत कपाळ जगदंबेसारखे कुंकवाने माखलेले असते. साडी जमिनीला टेकून खराब होऊ नये म्हणून उचलून धरताना हात दुखतात तिचे.

दरम्यानच्या काळात कुंकवाचा धनी आणि लेकरेबाळे हवालदिल झालेली असतात. तीबिचारी काल परवाच्या आईच्या वाणात काही खायचे आले आहे का, याचा निष्फळ शोध घेतात. त्या दिवशीचे हळदी-कुंकू संपवून घरी परत आल्यानंतर बोलून बोलून तिच्या घशाला कोरड पडलेली असते. तिला शांतपणे पिण्यासाठी पाणी आणून द्यावे. हाश-हुश्य झाले की, संपूर्ण वृत्तांत ती सादर करते. अमुक एक बाई, किती श्रीमंत, पण वाणात लुटले (वाटले) काय तर रुपयाच्या शाम्पूच्या पुड्या, तमुक बाईकडे दिलेले दूध इतके पांचट होते की, मला तर तिथेच कसेतरी होऊ लागले. संपूर्ण पिऊच शकले नाही मी. पुढचा डायलॉग संपूर्ण कुटुंबाला सुखावणारा असतो, कधी एकदा रथसप्तमी येते असे झाले आहे. त्यामुळे कधी एकदाची रथसप्तमी येते, असे घरातील मुलांना आणि पुरुषवर्गालाही झालेले असते. हे थकव्याचे वैराग्य जेमतेम बारा तास टिकते. नवा दिवस, नवी साडी आणि तोच उत्साह दुसर्‍या दिवशी असतोच असतो.

त्यात पुन्हा दूर अंतरावरील प्रतिष्ठित घरी हळदी-कुंकू असेल तर नवरोबाला तिला गाडीवर बसवून न्यावे लागते. तू पटकन हळदी-कुंकू घेऊन ये, तोवर मी इथे कोपर्‍यावर उभा राहतो. यावर, ‘आलेच पाच मिनिटांत’ असे म्हणून ती अदृश्य होते. दहा, पंधरा, वीस मिनिटे होतात. याचे बिचार्‍याचे व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक पाहून होते तरी हिचा पत्ता नाही. त्या घरात गेलेली आपली माऊली कधी बाहेर येते याची वाट पाहत तो निरागस जीव इतका कंटाळतो की, इतक्या प्रतीक्षेने तर विठुमाऊलीचेसुद्धा दर्शन झाले असते, असे त्याला वाटायला लागते. बरे कोपर्‍यावर असे आगंतुक उभे राहणार्‍या पुरुषाला जाणार्‍या-येणार्‍या महिला विचित्र नजरेने पाहतात. त्यामुळे त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते. इतर महिला एकमेकींना, बघ ते कसे बेशरमसारखे उभे आहेत बायका पाहात, असे म्हणत असाव्यात असा संशय त्याला येतो.

मग तब्बल चाळीस-पंचेचाळीस मिनिटे झाल्यावर आपले मॉडेल येताना दिसते. बायकोच्या भन भन,भन भन फिरण्याला कंटाळलेला पती मग फन फन, फन फन करतो. ‘उद्यापासून तुला वाटले तर तू जा, मी अज्जिबात येणार नाही,’ अशी युती तोडल्यासारखी गर्जना तो करतो. यावर ती गालातल्या गालात हसते. कारण, तिला माहीत असते की, आज नाहीतर उद्या पुन्हा युती होणारच आहे. या दिवसात एखादा मध्यमवयीन पुरुष सायंकाळच्या वेळी विमनस्कपणे रस्त्यावर फिरताना दिसला तर हमखास समजावे की, आज याच्या घरी हळदी-कुंकू आहे म्हणून. म्हणजे ज्याच्या नावाने कुंकू लावले जाते, त्यालाच घराबाहेर काढणारा सण म्हणजे संक्रांत होय. आपल्याच घरी जाण्याची सोय नसलेला हा कुटुंबप्रमुख (?) मग नियंत्रण सुटलेल्या उपग्रहासारखा भरकटत राहतो. या दिवसात थिएटरमध्ये संध्याकाळी सहाच्या शोला आलेले एकटे पुरुष हे असेच ‘हळदी-कुंकू के मारे’ असतात.

– झटका

Back to top button