एका तारांकित उठावाचा अर्थ! | पुढारी

एका तारांकित उठावाचा अर्थ!

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दोन घोटाळे गाजत आहेत. एक नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाचा आणि दुसरा वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन विक्रीचा. नागपुरातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे भूखंड बिल्डरांना स्वस्तात बहाल केले आणि त्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.

विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी न्यायालयीन मनाई असताना वाशीमच्या गायरान जमिनीचा सौदा केला. तेव्हा ते महसूल राज्यमंत्री होते. हे दोन्ही घोटाळे तसे महाविकास आघाडी सरकारच्या काळातले. कोणतीही फाईल मुख्यमंत्र्यांकडे येत नव्हती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच मंत्रालयात फारसे येत नसत. स्वतःच्या जबाबदारीवर आपापल्या खात्याचे निर्णय घेण्याचे अधिकार ठाकरेंनी मंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्री क्वारंटाईन अन् मंत्र्यांचे अधिकारी मात्र मास्क भिरकावून देत गायरान चरत असतानाच्या काळातली ही दोन प्रकरणे.

कमरेच्या चाव्या कारभारणीने दुसर्‍याच्या हाती दिल्याने काय होते, याचा धडा उद्धव ठाकरे यांना आता मिळाला; मात्र या प्रकरणांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे त्यांनी ठरवले. नागपुरातील 83 कोटींचे सरकारी भूखंड बिल्डरांना फक्त दोन कोटी रुपयांत दिले म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांना घेरले ते अर्थात वरच्या सभागृहात. शिंदे यांचा राजीनामा मागायचा किंवा नाही, यावर म्हणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा महाविकास आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद झाले. उद्धव हे वरच्या सभागृहाचे सदस्य आहेत. याच विधान परिषदेतून त्यांनी मग शिंदे यांचा कथित भूखंड घोटाळा ऐरणीवर घेतला. गेल्या सहा महिन्यांत शिंदे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा साधा आरोप करण्याची संधी कधी शिवसेनेला मिळाली नाही. रोज टी- ट्वेन्टीची मॅच, निर्णयांची संख्याही प्रचंड, जारी झालेल्या शासन निर्णयांचा स्कोअर बोर्ड तर थक्क करणारा. असे असताना शिंदे-फडणवीस जोडीने अशी एकही फट कुठे ठेवली नाही की, विरोधक बोट घालतील आणि आत डोकावतील. ही संधी उद्धव राजवटीतल्या दोन प्रकरणांनी विरोधकांना दिली.

मुख्यमंत्री शिंदे कधी कचाट्यात सापडतात, याची तर ठाकरे सेना कधीची वाट पाहत होती. ठाकरेंच्या सोबत निष्ठेने शिल्लक राहिलेल्या शिवसेनेने असे दबा धरून बसणे समजण्यासारखे आहे; पण शिंदे यांचे एखादे प्रकरण कधी बाहेर येते आणि कधी आपण तुटून पडतो, असे मनसुबे बाळगणार्‍यांमध्ये भारतीय जनता पक्षाचेही नेते आहेत ही मोठी चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणायची. ज्या भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना फोडली, उद्धव ठाकरेंना राजकीय क्षितिजावरून अस्तंगत करण्यासाठी 2022 चा ऐतिहासिक उठाव घडवून आणला, ज्या भाजपने अत्यंत लोकप्रिय चाणाक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दुय्यम स्थान देत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवले, तोच भाजप आपणच बसवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कसा? विधानसभेत स्वतः फडणवीस तारसप्तकात शिंदेशाहीची खिंड लढवत असताना विधान परिषदेत मात्र भाजप नेत्यांनीच तारांकित प्रश्न मांडला आणि शिंदे यांच्या चौकशीची मागणी केली. ही मागणी करणारे कोण आहेत? ते भाजपचे नवखे किंवा राजकारणात अडाणी असलेले नेते नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या तारांकित उठावाचे नेतृत्व केले.

सोबतीला भाजपचे आणखी दोन आमदार प्रवीण दटके आणि नागोराव गाणार होतेच. मुख्यमंत्री शिंदे यांची पाठराखण करण्याची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी प्रदेश भाजपवर टाकली असताना खुद्द प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तारांकित उठाव करतात! हा उठाव कुणाच्या इशार्‍यावरून झाला, हे कदाचित कधीच समोर येणार नाही. राजकारणात आणि विशेषतः फंदफितुरीच्या राज्यात अनेक प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नसतात.

नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री शिंदेंविरोधात उठाव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्लीचे पाचारण आले. त्या आधी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सहकुटुंब भेटले. सोबत छोटा रुद्रांश होता. पंतप्रधान रुद्रांशसोबत खेळले. त्याचे गालगुच्चे घेतले आणि रुद्रांशनेदेखील मोदींना दिलखुलास टाळी दिली. याच भेटीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे कान उपटा आणि मुख्यमंत्री शिंदे यांना रोज न चुकता टाळी देणे त्यांना सक्तीचे करा, असे तर खासदार शिंदे यांनी मोदींना सांगितले नसावे? त्यानंतर फडणवीस दिल्लीत अचानक कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर बावनकुळे यांनी नागपुरात बसून देऊन पाहिले.

महाराष्ट्राच्या अनेक प्रकल्पांचे पैसे दिल्लीत अडकले आहेत. त्यासाठी फडणवीस दिल्लीला गेलो, असे त्यांनी ठोकून दिले. त्यावर कोण विश्वास ठेवणार? तात्पर्य, फडणवीस दिल्लीला का गेले, कुणाला भेटले, काय बोलणे झाले? पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचले. बाल वीर दिवसाच्या कार्यक्रमाशिवाय आणखी काय घडले, या प्रश्नांची खरी उत्तरे कधीच मिळणार नाहीत. काही ठिपके जोडूनच ती मिळवावी लागतात.

हिवाळी अधिवेशन सुरू होत असतानाच भाजपची बैठक नागपुरात झाली. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे बावनकुळे जाहीरपणे बोलले. अजिबात रिकामे नसलेल्या मुख्यमंत्रिपदाबद्दल अलीकडे ते सतत बोलताना दिसतात. मुख्यमंत्री शिंदे हे फडणवीस यांचे बोट धरून भाजपच्या सत्ताकारणात शिरले.

आज मात्र ते भाजपच्या दिशेने फार पुढे निघून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई हे आता मुख्यमंत्री शिंदे यांना थेट फोन करतात. भाजपचे पक्षादेश शिंदे यांच्यापर्यंत थेट पोहोचतात. समृद्धी एक्स्प्रेसच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदींपासून मुख्यमंत्री शिंदे अंतर राखून आदबीने उभे होते. मोदी यांनीच त्यांना जवळ ओढून घेत कॅमेर्‍याच्या फोकसमध्ये उभे केले. फोटोच्या मध्ये मध्ये येतो म्हणून फेसबूकचा मालक मार्क झुकेरबर्गला खसकन बाजूला करणारे मोदी शिंदे यांना मात्र ओढून जवळ उभे करताना महाराष्ट्राने पाहिले. सरसंघचालक मोहन भागवतदेखील शिंदे यांच्यावर खूश आहेत. एकूणच दिल्ली दरबारी शिंदे यांचे वाढते वजन हा प्रदेश भाजपमधील अनेकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. एकनाथ शिंदे उद्या प्रदेश भाजपचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात, ही भीती अगदीच अनाठायी नाही. यातून भयचकित झालेल्या बावनकुळे प्रभुतींनी हा किंचित उठाव करण्याचा प्रयत्न केला असू शकतो.

– विवेक गिरधारी

Back to top button